'लिकरकिंग' विजय मल्ल्या

ND
विजय मल्ल्या यांना भव्य दिव्यतेचे वेड आहे. प्रत्येक गोष्ट वाजत गाजत करायला त्यांना आवडते. त्यामुळे मल्ल्या काही करत आहेत, ही बातमी अगदी वाजत गाजत माध्यमांत येते. किंगफिशर हा मद्याचा व्यवसाय असो की एअरलाईन्स या सगळ्यांत मल्ल्या यांचा खास 'टच' दिसून येतो. 'लॅव्हिश' रहाणीमान असलेल्या मल्ल्यांना सौंदर्याचेही वेड आहे. म्हणूनच अल्पवस्त्रांकित ललनांची वेगवेगळ्या बीचेसवर टिपलेली छायाचित्र ही किंगफिशरच्या कॅलेंडरची ओळख बनली आहे. ही कॅलेंडर मिळवून आपल्या ऑफिसमध्ये दर्शनी भागात लावणे अनेकांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.

मल्ल्या यांचा जन्म 18 डिसेंबर 1955 साली उद्योजक कुटुंबातच झाला. त्यांचे वडील राज्यसभेचे खासदार तर होतेच पण एक कुशल उद्योगपतीही होते. त्यांचे नाव विठ्ठल मल्ल्या. वडिलांची परंपरा पुढे चालवत मल्ल्या हेही एक अत्यंत यशस्वी उद्योगपती बनले आहेत. युनायटेड ब्रुअरीज या समूहाचे ते संचालक आहेत. याच सोबत किंगऱफिशर उद्योगसमूह, किंगफिशर एअरलाईन्सचेही ते संचालक आहेत. त्यांच्या कंपनीचा किंगफिशर बिअर हा ब्रॅन्ड अत्यंत लोकप्रिय आहे.

आपल्या कुशल व्यवस्थापनाच्या बळावर मल्ल्या यांनी जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 2007 मध्ये स्थान मिळवले. त्यांच्या कंपनीला दीड अब्ज डॉलर्सचा निव्वळ नफा झाला होता.

वैयक्तिक आयुष्य
कोलकात्यामधील 'ला मारर्टीनरी बॉईज कॉलेजमध्ये मल्ल्या यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी कोलकाता विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. कॅलिफोर्नियातील सॉसॅलिटो येथे त्यांचे घर आहे. तेथे अनेकदा ते आपल्या महागड्या मर्सिडिझ बेन्झमधून फेरफटका मारताना दिसतात. त्यांना तीन मुले आहेत.

व्यवसाय
मल्ल्या यांनी 1983 साली युनायटेड ब्रुअरीजच्या संचालकपदी नियुक्ती झाली. मल्ल्या यांनी कंपनीची धुरा हातात घेतल्यानंतर त्याची वार्षिक उलाढाल 439 टक्क्यांनी वाढली असून ती 1998-99 मध्ये 1.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहंचली आहे. सध्या मल्ल्या यांच्या नेतृत्वाखाली कंपनी अल्कोहोल, शेती, तंत्रज्ञान, केमिकल, माहिती आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रात अग्रेसर आहे. 2007 मध्ये तर माल्या यांनी प्रसिद्ध व्हाईट मॅके व्हिस्की ही कंपनीही 4 हजार 819 कोटींमध्ये विकत घेतली. यावरुनच त्यांच्या व्यवसायिक कौशल्याची झलक मिळते.

वेबदुनिया वर वाचा