मेंदूची 'वाट' लावणाऱ्या या 11 सवयी ताबडतोब थांबवा

मंगळवार, 5 मार्च 2024 (14:00 IST)
असे बरेच लोक आहेत ज्यांना आता बाहेर जायला आवडत नाही. काहींना अंधाऱ्या खोलीत पडून वेळ घालवायला आवडतं किंवा हेडफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकायला आवडतं.
 
पण तुमच्या अशा वागण्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतोय, असं काही संशोधनातून समोर आलं आहे.
 
या लेखात आपण आपल्या अशा 11 सवयींची चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पोहोचत आहे. त्यासोबत अशा सवयींवर मात कशी करायची, हेही जाणून घेणार आहोत.
 
या लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे.
 
1) अपुरी झोप
अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते, आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळं होतं.
 
प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची झोप. रात्री सलग झोप घेणं अधिक प्रभावी राहातं, असं तज्ज्ञ सांगतात.
 
झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवय झोपेच्यावेळेस मेंदू नवीन पेशी तयार करतो. परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर नवीन पेशी तयार होत नाहीत.
 
परिणामी, तुम्हाला काहीही आठवत नाही. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. चिडचिड होते. निर्णय घेण्यास त्रास होतो. झोपेच्या कमतरतेमुळे डिमेंशिया अल्झायमरचा धोकाही वाढतो.
 
जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल, तर एकच उपाय आहे. रोज रात्री किमान सात तासांची झोप घेणं.
 
आठ तास झोप घेतली तर आणखी उत्तम.
 
त्यासाठी तुम्ही झोपी जाण्याआधी किमान एक तासआधी बेडवर जायला हवं. या काळात कोणतंही गॅझेट वापरू नका.
 
झोपेचं वातावरण तयार करण्यासाठी बेडरूम अगोदर स्वच्छ करा. खोलीतील प्रकाश कमी करा. तुमचा बेड, कपडे, खोलीचं तापमान सर्वकाही आरामदायक करा.
 
दुसरी गोष्ट - कधीही तोंडावर पांघरुण घेऊन झोपू नका. कारण त्यामुळे आपण नाकातून ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. या सततच्या प्रक्रियेमुळे तुमच्या चेहऱ्याभोवती CO2 जमा होतो. परिणामी तुम्हाला रात्रीतून ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.
 
2. नाश्ता करणं टाळणे
रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. पण आपल्यापैकी बरेच जण सकाळी घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात.
 
असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो.
 
दिवसेंदिवस न्याहारी न केल्याने मेंदूचे नुकसान होते, पेशींची कार्यक्षमता कमी होते.
 
पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रियाकलाप करणं कठीण जातं.
 
3. पुरेसे पाणी न पिणे
आपल्या मेंदूतील 75% भाग हा पाण्याचा आहे.
 
त्यामुळे मेंदूला हायड्रेटेड ठेवणं हे त्याच्या उत्कृष्ट कार्यासाठी खूप महत्वाचं आहे.
 
पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूच्या ऊती आकुंचन पावतात आणि पेशी कार्य गमावतात.
 
या घटनेमुळे तार्किकदृष्ट्या विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
 
तज्ज्ञांच्या मते, मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान दोन लिटर पाणी प्यावं.
 
यामध्ये तुमचं वजन, आरोग्य, वय, जीवनशैली आणि हवामानानुसार पाण्याचं सेवन वाढू पण शकतं.
 
4. दीर्घकाळ तणावात असणे
प्रदीर्घ तणावामुळे मेंदूच्या पेशी मरतात आणि मेंदूचा पुढचा भाग आकुंचन पावतो. त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर आणि विचारशक्तीवर परिणाम होतो.
 
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जे लोक सतत कामात बुडून राहतात. इतरांनी काही काम सांगितलं तर त्यांना 'नाही' म्हणू शकत नाहीत. अशा लोकांना सर्वात जास्त ताण सहन करावा लागतो.
 
पण असं करणं ताबडतोब थांबवा. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त दबाव घेणं टाळा.
 
आजारी असतानाही काहीजण मेंदूला ताण देणारी कामं करत राहतात.
 
पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे जेव्हा शरीर आजारी असते तेव्हा मेंदू रोग प्रतिबंधक कार्यात व्यस्त असतो. त्यामुळे या काळात अतिरिक्त ताण न ठेवता मेंदूला विश्रांती द्या. थेट सुटी घ्या
 
असं नाही केलं तर, त्याचा मेंदूवर दीर्घकालीन विपरित परिणाम होतो, असं संशोधनातून समोर आलं आहे.
 
जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यानेही सर्वाधिक ताण वाढू शकतो.
 
आपल्यापैकी अनेकांच्या नोकऱ्या अशा आहेत जिथे आपल्याला दिवसभर बसावं लागते.
 
याशिवाय सुटीच्या दिवशीही आपण घरात पडून राहतो. पुरेशी हालचाल किंवा अंगमेहनत करत नाही.
 
त्यामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो. तसंच स्मृतिभ्रंशही होऊ शकतो.
 
त्यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा, दर अर्ध्या तासाने खुर्चीवरून उठून फिरा, यासाठी तुम्ही टायमर सेट करू शकता.
 
आठवड्यातून किमान तीन दिवस अर्धा तास जॉगिंग करा किंवा चालण्याचा व्यायाम करा.
 
5. गुगल सर्चचा अतिवापर
तुम्हाला आठवत असेल, आपल्या आधीची पिढी कॅल्क्युलेटरचा वापर न करता बऱ्याचदा छोटी-मोठी आकडेमोड करायची. अनेक फोन नंबर त्यांच्या लक्षात राहायचे. भरपूर पुस्तके वाचल्यामुळे त्यांचे सामान्य ज्ञानही चांगले असायचे.
 
त्यांच्या या सवयी मेंदूच्या व्यायामासारख्या आहेत, ज्यामुळे त्यांची विचारशक्ती आणि स्मरणशक्ती दीर्घकाळ मजबूत राहायची.
 
पण आपल्या युगात आपल्याला इतकं लक्षात ठेवण्याची गरज नाही. तंत्रज्ञानावरील अतिअवलंबित्वामुळे आपल्या मेंदूची स्वतःची क्षमता कमी झाली आहे.
 
स्मरणशक्ती आणि विचारशक्ती दिवसागणिक कमकुवत होतेय.
तुम्हाला जर मेंदूला तीक्ष्ण ठेवायचं असेल तर गूगल सर्चचा वापर न करता गोष्टी लक्षात ठेवा, असं सल्ला संशोधक देत आहेत.
 
याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या ब्रेन ॲक्टिव्हिटी गेम्स खेळू शकता. जसं की वर्ड जंबल, पझल मॅचिंग, सुडोकू इत्यादी खेळू शकता.
 
6. सतत हेडफोन वापरणं, मोठ्या आवाजात गाणी ऐकणं
तुम्ही वापरत असलेले हेडफोन किंवा एअरपॉड 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात तुमचं नुकसान करू शकतात.
 
मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकणं किंवा मोठ्या गोंगाटात जास्त वेळ राहिल्याने श्रवणशक्तीचं गंभीर नुकसान होतं.
 
एकदा का तुमचं श्रवण बिघडलं तर ते दुरुस्त करता येत नाही, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
 
श्रवणशक्ती कमी झाली तर त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.
 
अमेरिकेतील संशोधकांच्या मते, श्रवणशक्ती कमी झालेल्या लोकांच्या मेंदूच्या ऊतींचे नुकसान होते. ज्यामुळे त्यांना अल्झायमर होण्याचा धोका वाढतो.
 
परिणामी, अभ्यास करणं आणि लक्ष केंद्रित करणं कठीण होतं.
 
हेडफोन वापरण्यापूर्वी किंवा जास्त आवाजात तुमचे आवडते गाणे ऐकण्यापूर्वी दोनदा विचार करा.
 
तुम्ही दीर्घकाळ हेडफोनचा वापर करून गाणी ऐकत असाल तर त्याचा आवाज 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवू नका. सतत हेडफोन न वापरता तासभर ब्रेक घ्या.
 
7. सतत एकटं राहणं, लोकांमध्ये न मिसळणं
लोकांशी बोलणं, गप्पा मारणं हे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
 
एकट्याने जास्त वेळ घालवल्याने तुमच्या मेंदूवर पुरेशी झोप न मिळण्याइतकाच वाईट परिणाम होतो.
 
मित्र-मैत्रिणींसोबत आणि घरातील लोकांसोबत राहिल्याने आपला मेंदू ताजातवाना राहतो.
 
त्याऐवजी, एकाकीपणामुळे नैराश्य, चिंता आणि स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर रोगाचा धोका वाढतो.
 
तुमचा मेंदू निरोगी ठेवायचा असेल तर काही जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत नियमितपणे वेळ घालवा. पण हो, ते 'सकारात्मक विचारांचे लोक' असले पाहिजेत.
 
8. नकारात्मक विचार आणि लोक
जर तुम्हाला सतत नकारात्मक विचार करण्याची सवय असेल, आपलं काहीच होऊ शकत नाही, जगात खूप वाईट परिस्थिती आहे, भविष्य अंधकारमय आहे, आपण नशीबवान नाहीये असे नकारात्मक विचार मेंदूला हानीकारक ठरतात.
 
कारण नकारात्मक विचारांमुळे एकीकडे तणाव, नैराश्य आणि चिंता निर्माण होते.
त्याचप्रमाणे मेंदूमध्ये Amyloid आणि Tau मोठ्या प्रमाणात जमा होतात. जे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरचे प्रमुख कारण आहे.
 
म्हणून, नकारात्मक विचार त्वरित थांबवण्याचा प्रयत्न करा. असे वारंवार केल्यास सवय होईल.
 
तुम्हाला एकट्याला हे शक्य नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या.
 
नकारात्मक मित्रमंडळी टाळणं देखील खूप महत्वाचं आहे. खूप नकारात्मक बातम्या पाहण्यापासून स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करा.
 
9. अंधारात जास्त वेळ घालवणं
अमेरिकेतील एका संशोधनातून असं दिसून आलं की, जे लोक अंधारात जास्त वेळ घालवतात किंवा बंदिस्त ठिकाणी जास्त काळ थांबतात जिथे जास्त प्रकाश आणि हवेची हालचाल होत नाही, अशा वातावरणामुळे मेंदूवर मोठा दबाव निर्माण होतो.
 
कारण सूर्यप्रकाशाचा संपर्क आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो. अन्यथा, नैराश्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज उन्हात जावे. त्यासाठी बाहेर जा. तुम्ही घरी असाल तर दरवाजे आणि खिडक्या उघडा.
 
10. जास्त खाण्याची सवय
कितीही 'हेल्दी फूड' असलं तरीही जास्त खाण्याची सवय मेंदूला हानी पोहोचवते.
 
संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जास्त खाल्ल्याने मेंदूच्या धमन्यांमध्येही अडथळे तयार होतात आणि रक्त प्रवाह कमी होतो.
 
यामुळे स्मरणशक्ती आणि विचार कमी होतात. ज्यामुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर होऊ शकतो.
 
जंक फूड, तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, शीतपेये इत्यादी खाल्ल्याने मेंदूला तेवढाच धोका निर्माण होतो.
 
म्हणूनच मध्यम आणि योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे.
 
अनेक लोक रोजच्या कॅलरीजचा मागोवा ठेवण्यासाठी वेगवेगळे ॲप्स वापरतात. पण उत्तम उपाय म्हणजे पोषणतज्ञांच्या सल्ल्यानुसार स्वतःचा आहार बनवणे आणि त्याचे पालन करणे.
 
बरेच लोक आहार म्हणजे चरबी काढून टाकणे असा विचार करतात. पण लक्षात ठेवा की मेंदूचा 60 टक्के भाग चरबीचा असतो. त्यामुळे सर्व प्रकारचे अन्न खाल्ले पाहिजे.
 
परंतु ते योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे.
 
याशिवाय मद्यपान आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याचा सर्वात वाईट परिणाम मेंदूवर होतो.
 
या गोष्टी मेंदूच्या नसा संकुचित करतात आणि पेशींचं नुकसान करतात.
 
परिणामी, आपल्या मेंदूचा हिप्पोकॅम्पस म्हणजे जिथं आठवणी साठवल्या जातात तो विकसित होऊ शकत नाही.
 
11. अतिरिक्त स्क्रीन टाईम
जास्त स्क्रीन टाईमचा मेंदूच्या आकारावर आणि विकासावर मोठा परिणाम होतो आहे. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे फ्रन्टल कॉर्टेक्समध्ये अधिक नुकसान होतं, जे पौगंडावस्थेपासून ते 25 वर्षांपर्यंत बदलतं.
 
संशोधनात असं दिसून आलं आहे की जे मुले दिवसात सात तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवतात त्यांचे सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ असतात.
 
कारण मोबाईल फोनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोकेदुखी, गोंधळ आणि ब्रेन ट्यूमरसारखे विकार होतात.
 
या कारणास्तव, मुलांचा स्क्रीन टाईम पूर्णपणे कमी केला पाहिजे. तसंच फोन शरीराजवळ ठेवून झोपू नका.
 
फोन खिशात न ठेवता बॅगेत ठेवा. जर तुम्हाला जास्त वेळ बोलायचे असेल तर तुम्ही फोन कानाला न लावता स्पीकरद्वारे बोलू शकता. बोलण्यापेक्षा मजकूर पाठवणे अधिक चांगलं.
 
Published BY- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती