जाणून घेऊ या! झिकाः आजार, लक्षणे व उपचार

गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (17:20 IST)
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले आहे.
 
त्या अनुषंगाने या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना जाणून घेऊ या-
 
झिका आजाराची चिन्हे व लक्षणेः
झिका आजाराचा अधिशयन कालावधी निश्चितपणे किती आहे याबद्दल सुस्पष्टता नाही तथापि, तो काही दिवसाचा असावा असे दिसते. 
 
बहुसंख्य रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे.
 
झिका आजारातील गुंतागुंतः
झिका आजाराच्या २०१३ च्या फ्रान्स देशातील उद्रेकामध्ये तसेच २०१५ च्या ब्राझिलमधील उद्रेकामध्ये खालील महत्त्वपूर्ण गुंतागूंत नमुद करण्यात आल्या आहेत.
 
मायक्रोसिफॅली (डोक्याचा घेर कमी असणे) – गरोदरपणामध्ये झिका विषाणुची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो असे दिसून आले आहे.
 
गिया बारी सिंड्रोम- या दोन्ही गुंतागुंतीचा झिका विषाणूची असलेला आंतरसंबंध नेमकेपणाने सुस्पष्ट होण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
 
झिका आजाराचे निदानः
राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, पुणे येथे या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. याकरिता डेंग्यु आजाराप्रमाणेच झिका संशयित रुग्णाचे रक्त / रक्तद्रव दोन ते आठ तापमानात शीतलता अबाधित ठेऊन तपासणीसाठी पाठवावे. प्रयोगशाळा नमुन्यासोबत रुग्णाची संक्षिप्त माहीती देणारा फॉर्म भरून पाठवावा. हा फॉर्म राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
 
उपचारः
झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.
 
रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
तापाकरिता पॅरासिटामॉल औषध वापरावे.
अॅस्पिरीन अथवा एन. एस. ए. आय. डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.
ताप रुग्ण सर्वेक्षणः
झिका आजारामुळे उद्भवलेल्या या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्याने/मनपाने आपल्या कार्यक्षेत्रातील ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक सुदृढपणे करणे आवश्यक आहे. ताप रुग्ण सर्वेक्षण करताना गरोदर मातांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. डेंगी, चिकुनगुन्या या आजाराच्या सर्वेक्षणासाठी जी पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे या आजारामध्ये सर्वेक्षण करण्यात यावे.
 
एकात्मिक किटक नियंत्रणः
झिका आजार हा एडीस डासामुळे पसरतो. याच डासामुळे डेंग्यु आणि चिकुनगुन्या या आजारांचाही प्रसार होतो. हे डास महाराष्ट्रासह देशभरात विपूल प्रमाणात आढळत असल्यामुळे झिका आजाराचा प्रसार आपल्याकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता एडीस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.
 
याकरीता एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या खाली नमुद केलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात.
(१) किटकशास्त्रीय निर्देशांक नियमितपणे तपासावेत. या डासांचा गृहनिर्देशांक (हाऊस इंडेक्स) १०% पेक्षा जास्त किंवा ब्रॅटयू इंडेक्स ५०% पेक्षा जास्त असल्यास भविष्यात या ठिकाणी उद्रेकाची शक्यता गृहीत धरुन संबंधित आरोग्य संस्थेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरीत सुरु करण्यात यावे.
 
२) ताप उद्रेक झालेल्या गावात व आजूबाजूच्या ५ कि.मी. परिसरातील सर्व गावातील साठविलेल्या पाण्याचे साठे दर आठवडयातून रिकामे करण्याची कार्यवाही करावी. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. पाणी साठवून ठेवणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.
 
३) साठविलेल्या पाण्याचे जे साठे आठवड्याला रिकामे करता येत नाहीत; अशा पाण्याच्या साठ्यात टेमिफॉस (ॲबेट) या अळीनाशकाचा वापर योग्य प्रमाणात करावा. घरातील पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात टेमिफॉसचा वापर करू नये.
 
४) किटकशास्त्रीय यंत्रणेमार्फत ताप उद्रेकग्रस्त गाव व परिसरातील ५ कि.मी. भागात किटकशास्त्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही करावी.

५) नियमित सर्वेक्षणात दर हजारी लोकसंख्येत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात जलद ताप सर्वेक्षण करून रुग्णांना योग्य औषधोपचार द्यावा, तसेच संशयित लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी किमान ५ % किंवा कमीत कमी पाच रुग्णांचे रक्तजल नमूने विषाणू परिक्षणासाठी राष्ट्रीय विषाणू संस्था, / सेंटीनल सेंटर यांचेकडे पाठवावेत.
 
६) धूर फवारणीसाठी आवश्यक असलेले किटक रक्षक ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थांना आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून द्यावेत.
 
७) ताप उद्रेक झालेल्या गावात किटकनाशक धूरफवारणीच्या दोन फेऱ्या आठ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. पहिली फेरी त्वरीत घ्यावी.
 
८) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये या ठिकाणी ताप, डेंगीताप, चिकुनगुनिया इत्यादी रुग्णांचे औषधोपचारासाठी आवश्यक असलेले सर्व औषधी योग्य प्रमाणात मोफत उपलब्ध असतात.
 
९) खाजगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल झालेल्या सर्व संशयित रुग्णांची व   त्यांना दिलेल्या उपचाराबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविण्यासंदर्भात सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी.
 
(१०) तालुका निहाय सर्व सरपंच ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांची संयुक्त सभा तालुकास्तरावर आयोजित करून या सभेत एडीस डास नियंत्रणाबाबत आवश्यक सूचना जाणून घेऊन उपाययोजना कराव्या.
 
(११) साठून राहिलेल्या पाण्यात इतर डासांची निर्मिती होत असल्याने अशा डास उत्पत्ती स्थानांतील पाणी वाहते केल्यास इतर डासांची पैदास रोखण्यास मदत होईल त्यासाठी खड्डे बुजविणे, खड्ड्यातील पाणी काढून टाकणे, इत्यादी कामे महानगरपालिका / नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीने करावीत.
 
(१२) जनतेमध्ये सर्व आवश्यक त्या प्रसिद्धी माध्यमांमार्फत या आजारांविषयी आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करावी.अशा सुचना संचालक, आरोग्य सेवा पुणे यांनी दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती