अल्झायमरः सीमा देव यांना झालेला अल्झायमर हा आजार आहे तरी काय?

सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (14:57 IST)
नूतन कुलकर्णी
मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत सात्विक, सोज्वळ आणि तेवढ्याच दमदार अभिनयाने सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या बनलेल्या अभिनेत्री सीमा देव यांना अल्झयामर या आजाराने ग्रासलं आहे.
 
त्यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. आईच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
 
आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "माझी आई आणि मराठी चित्रपट सृष्टीतल्या धुरिणी श्रीमती सीमा देव यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं आहे. ती बरी व्हावी, यासाठी संपूर्ण देव कुटुंब प्रार्थना करत आहे. ज्या महाराष्ट्राने तिच्यावर एवढं प्रेम केलं त्यांनीही तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करावी, अशी आशा मी करतो."
 
अजिंक्य देव यांच्या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत देव कुटुंबीयांना धीर दिला आणि सीमा ताई लवकरच बऱ्या होतील, अशा मनोकामनाही व्यक्त केल्या. कुणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो म्हणून सांगितलं तर काहींनी अल्झायमर रुग्णांसाठी काय-काय करता येईल, यासाठीच्याही सूचना केल्या.
 
देव कुटुंबीयांना जवळून ओळखणारे ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांनी बीबीसीशी बोलताना सीमा देव यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं. सीमा देव यांच्या प्रकृतीविषयी सांगताना ते म्हणाले, "1 जुलै हा सीमा ताई आणि रमेश देव यांच्या लग्नाचा वाढदिवस. यादिवशी त्यांनी एक फोटो टाकला होता. त्या फोटोकडे बघूनच सीमा ताईंची प्रकृती बरी नसावी, अशी शंका येते. आता त्या बेडवरच आहेत."
 
सीमा ताईं आणि रमेश देव या दोघांचाही स्वभाव मनमिळावू आणि कुटुंबवत्सल असल्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत मग ती मराठी असो की हिंदी, या दोघांनीही मोठा मित्र परिवार जोडल्याचं, दिलीप ठाकूर सांगतात.
 
त्यांचे चित्रपट बघताना सीमाताई आपल्या घरातल्याच व्यक्ती असल्यासारखं वाटतात. त्यामागचं कारण सांगताना ठाकूर म्हणतात, "पूर्वी कोल्हापुरात दोन स्टुडिओ होते. जयप्रभा स्टुडिओ आणि शालिनी स्टुडिओ. या दोन्ही स्टुडिओंमध्ये दोन वेगवेगळ्या सिनेमांचं शूट असो किंवा एकाच सिनेमाचं शूट असो दुपारच्या जेवणावेळी दोन्ही स्टुडिओतले कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार एकत्र जेवायचे. खाली बसून जेवायचे. त्यांच्यात भेदाभेद नसायचा. एकमेकांबद्दलची ही आपुलकी, आपलेपण, जिव्हाळा, आस्था त्या सिनेमामध्ये, अभिनयात उतरायची."
 
चित्रपटांमधून पारंपरिक, मध्यवर्गीय स्त्रीचं जे रूप प्रेक्षकांना सीमा देव यांच्यात दिसलं त्यामुळे संबंध महाराष्ट्रात त्यांचा चाहता वर्ग तयार झाला आणि म्हणूनच सीमा देव यांना अल्झायमर या स्मृतीभ्रंशाशी संबंधित आजार झाल्याचं कळल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
 
अल्झायमर या आजाराविषयी भारतीय समाजात एक प्रकारचा टॅबू आहे. लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. अशा लपवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपलंचं मोठं नुकसान होतं.
 
हा वृद्धांना होणारा आजार आहे. या आजारावर खुलेपणाने बोलल्यास त्याविषयीची जागृती निर्माण होऊन त्या दिशेने पावलं उचलली जातील, असं प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ तसंच डिमेंशिया रुग्णांसाठी सिल्व्हर इनिंग नावाच्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. शैलेश मिश्रा यांचं म्हणणं आहे.
 
डॉ. शैलेश मिश्रा म्हणतात, "संपूर्ण जगातच उपचाराची योग्य पद्धत काय आहे तर सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान करावं. पण आपल्याकडे काय होतं, या आजाराला एक स्टिग्मा आहे. लोक वेडे म्हणतील, म्हणून ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय कुणालाही याबद्दल सांगत नाहीत आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत."
 
ते पुढे म्हणतात, "अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, तेजी बच्चन यांसारख्या अनेकांना अल्झायमर होता. मात्र, इतरही अनेक जणांना हा आजार असूनही ते सार्वजनिक पातळीवर मान्य केलं जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही. "
 
आणि म्हणूनच अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावरून सीमा देव यांना अल्झायमर झाल्याची माहिती देणं, एक धाडसी आणि तितकंच महत्त्वाचं पाऊल आहे.
 
अल्झायमर म्हणजे काय?
या आजाराविषयी थोडं जाणून घेऊया. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर होतो. अल्झायमर हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. मराठीतत याला स्मृतीभ्रंश म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा.
 
1906 साली डॉक्टर अल्झायमर यांनी सर्वात आधी या आजाराविषयी सांगितलं. त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं.
 
बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो.
 
उदाहरणार्थ अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्‌ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.
 
मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.
 
का होतो अल्झायमर?
अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.
 
वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.
समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.
हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.
ब-जीवनसत्त्वाची कमतरता : डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश शाकाहारी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.
 
अल्झायमरचे टप्पे
अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला 10-15 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं.
 
या आजाराविषयी सांगताना डॉक्टर सागर मुंदडा सांगतात, "अल्झायमरमध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो."
 
या आजाराच्याही काही स्टेजेस असतात. या स्टेजसविषयी अधिक माहिती देताना डॉ. सागर सांगतात, "आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो. उदाहरणार्थ सकाळी काय खाल्लं हे दुपारी आठवत नाही. ही सुरुवातीची स्टेज मानली जाते."
 
मात्र, काही रुग्णांमध्ये याआधीही काही लक्षणं दिसतात. विनाकारण चिडचिडण होणे, गाढ आणि शांत झोप न लागणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतीविचार करणे हीदेखील अल्झायमर किंवा डिमेंशियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र, ही प्रत्येकच रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही.
 
यापुढच्या स्टेजेसविषयी डॉ. सागर सांगतात, "आजाराची पुढची स्टेज असते ज्यात क्रमाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी करण्यात रुग्णाला अडचणी येतात. उदाहरणार्थ भाजी करायची असेल. तर ती कुठल्या क्रमाने करायची, हे रुग्णाला आठवत नाही.
 
गाडी चालवणे, कपडे घालणे यासारख्या गोष्टी ज्यात एकानंतर दुसरी क्रिया एका विशिष्ट क्रमाने कराव्या लागतात, त्या त्यांना जमत नाही. या पुढचा टप्पा म्हणजे रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हेसुद्धा लक्षात राहत नाही."
 
डिमेंशियाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णाची चिडचिड वाढते, तो कपडे घालायला विसरतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो. म्हणजे घरचा पत्ता आठवत नाही, त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही. आंघोळ कशी करायची, आधी साबण लावायचा की पाणी हेही विसरतो. त्यामुळे आंघोळ घालावी लागते. आता टॉयलेटला जायचं आहे, याची सूचना मेंदूकडून मिळत नाही. त्यामुळे कुठेही सू-शी होते. अशावेळी डायपर वापरावे लागतात.
 
स्मृतीभ्रंशाच्या या स्टेजेस असल्या तरी याच क्रमाने प्रत्येक रुग्णाला त्रास होतो, असं नाही. अनेक रुग्ण कित्येक वर्ष पहिल्या स्टेजमध्येच असतात. तर काही रुग्णांमध्ये चार महिन्यातच त्रास वाढतो.
 
डॉक्टरांकडे कधी जायचं?
याआधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी. मात्र, काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.
 
लहान-लहान गोष्टींचा विसर पडत असेल. उदाहरणार्थ 1000 लिहिताना एकावर किती शून्य लिहायचे ते विसरणे. लोकांची नावं विसरणे. कुलुपाची नेमकी किल्ली कोणती, ते विसरणे, गाडीची चाबी फ्रिजमध्ये ठेवणे.
कारण नसताना सारखी चिडचिड होत असेल.
कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटता नैराश्य येत असेल. कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल.
अशी काही लक्षणं असल्यावर डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी. यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं असल्यावर तो डिमेंशिया किंवा अल्झायमर असेलच असं नाही.
 
कदाचित काही मानसिक ताण किंवा इतरही आजार असू शकतात. मात्र, त्याच योग्य निदान डॉक्टरांकडे गेल्यावरच होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट क्षुल्लक आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.
 
अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी?
अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.
 
व्यक्ती जेव्हा लहान-लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबीयांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचीही चिडचिड वाढते. त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं.
 
तुम्ही आता काही कामाचे नाहीत, एकच गोष्ट कशी वारंवार सांगावी लागते, असं म्हटल्याने रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अशा रुग्णांचा तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.
 
अल्झायमरग्रस्त रुग्ण आणि कुटुंब
आजारपण म्हटलं की रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो. मात्र, अल्झायमर या आजारात रुग्णापेक्षा कुटुंबीयांना जास्त त्रास होतो. अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. पण, कपडे घालायला विसरणे, कुठेही नैसर्गिक विधी करणे, वस्तू जागेवर न ठेवणे या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कुटुंबीयांना अतिशय त्रास होत असतो. रुग्णाची चिडचिड वाढते. अशावेळी कुटुंबीयांचा संयम संपतो.
 
डॉ. मिश्रा म्हणतात, "पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. शहरातली घरं छोटी झाली आहेत. अशावेळी घरात एखादा अल्झायमर झालेली व्यक्ती असेल तर तिचा सांभाळ करणं फार अवघड होतं."
 
दुसरं म्हणजे हा खूप खर्चिक आजार आहे. डिमेंशियाच्या रुग्णांना सारखे डायपर वापरावे लागतात. वृद्धांचे डायपर महाग असतात. शिवाय, घरात सगळे कामावर जाणारे लोक असतील तर रुग्णासाठी केअर टेकर ठेवावा लागतो, त्याला 8 तासांचे 700 ते 800 रुपये मोजावे लागतात. म्हणजे अशा रुग्णांसाठी महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो.
 
शिवाय, डिमेंशियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणाव्यतिरिक्त इतर कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच असतात. ही सगळी परिस्थिती कुठल्याही कुटुंबासाठी कष्टप्रद असते.
 
रुग्णाची काळजी
डिमेंशिया किंवा अल्झायमरच्या रुग्णांना प्रेम आणि जिव्हाळा अत्यंत महत्त्‌वाचा असतो. याशिवाय संगीत, नृत्य, चेअर योगा, छंद अशा वेगवेगळ्या मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या असतात.
 
डिमेंशिया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत त्यासाठीचं काम झालेलं नाही, अशी खंत डॉ. मिश्रा व्यक्त करतात. ते म्हणतात, "या आजारासाठी सरकारी पातळीवर म्हणावे तितके प्रयत्न झालेले नाही. महाराष्ट्रात सरकार मेमरी क्लिनिक सुरू करणार होते. पण ते काम कितपत झालं, याची काहीही माहिती नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक हवं. आरोग्य सेवकांना विशेष प्रशिक्षण हवं."
 
डॉ. मिश्रा म्हणतात, "डिमेंशियाच्या रुग्णांची संख्या बघता राष्ट्रीय डिमेंशिया धोरणाची गरज आहे. याअंतर्गत प्रत्येक वॉर्डात डिमेंशिया डे-केअर असायला हवं. लहान मुलांना जसं आई-वडील दिवसभर डे-केअरमध्ये ठेवून आपापल्या कामावर जातात. तसेच सेंटर्स डिमेंशिया रुग्णांसाठी हवे.
 
दुसऱ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातल्या रुग्णांसाठी असिस्टेड लिव्हिंग केअर होम्स हवेत. जिथे रुग्णांची 24 तास काळजी घेतली जाईल. त्यानंतर होम केअर सर्व्हिस हवी. यात डिमेंशिया आजाराच्या दृष्टीने प्रशिक्षित आरोग्य सेवक हवे त्या वेळेला घरी येऊन रुग्णांची तपासणी करू शकतात."
 
भारतात आज घडीला केवळ दहा डिमेंशिया केअर होम्स आहेत.
 
याशिवाय केअर गिव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी एक दीर्घकालीन योजना सरकारने आखायला हवी. इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजसमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना डिमेंशिया उपचारासंबंधीचं प्रशिक्षण देणंही गरजेचं असल्याचं डॉ. मिश्रा यांचं म्हणणं आहे.
 
ते म्हणतात, "भारतात डिमेंशिया एमडी डॉक्टर नाहीत. म्हणजेच भारतात डिमेंशिया स्पेशलिस्ट नाहीत. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात डिमेंशिया आजार हा अभ्यासक्रमाचा खूप छोटा भाग आहे. मानसोपचारामध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टरांनाच या विषयाची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात असते. या सगळ्यामधून एक चांगलं वातावरण तयार होईल."
 
प्रतिबंधात्मक उपाय
डिमेंशिया कधीही होऊ नये, यासाठी खात्रीशीर उपाय नाही. मात्र, जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवता येतो.
 
हृदय निरोगी ठेवा
चांगली झोप घ्या
जीवनशैली उत्तम ठेवा
रोज किमान 30 मिनिटं योगा, व्यायाम, सायकलिंग, रनिंग असा एकतरी व्यायाम प्रकार करा
दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसनं टाळा
मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवा.
सकस आणि ताजं अन्न खा. साखर, मीठ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करा.
डॉ. मिश्रा सांगतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. माझं वय 40 ते 50 च्या घरात असेल आणि मी खूप व्यसनं करत असेन, सतत पिझ्झा, बर्गर खात असेन, पुरेशी झोप घेत नसेन किंवा दिवसातला रिकामा वेळ मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीमध्ये न घालवता तासनतास टिव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असेन तर अशा प्रकारचे त्रास होणार, हे निश्चित."
 
पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे आपणही यातून शिकवण घेऊन घरात कुणाला विसरभोळेपणा आहे, याची लाज वाटून न घेता त्यावर उपचार घेतले पाहिजे.
 
डिमेंशिया किंवा अल्झायमर झालेली व्यक्ती स्वतः सगळं विसरत असते. त्यामुळे तिच्या काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तिच्यावर योग्य उपचार केले नाही तर तो आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार ठऱत असतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती