जीममध्ये हार्टअटॅकची भीती? व्यायाम सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्याल? वाचा 5 प्रश्नांची उत्तरं

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (15:31 IST)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)मध्ये व्यायाम करताना एका व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला अशी बातमी आणि कदाचित व्हीडिओही आपण पाहिला असेल. या व्हीडिओत कवलजित सिंह बग्गा नावाचे व्यावसायीक इतर सहकाऱ्यांबरोबर एरोबिक्स किंवा झुंबासारखा व्यायाम करताना दिसतात. त्यानंतर काही क्षण अस्वस्थ वाटू लागल्यावर बग्गा एका खांबाला टेकतात आणि तात्काळ खाली कोसळतात. ते कोसळल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला.
 
व्यायाम करताना किंवा मैदानी खेळ खेळताना मृत्यू आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत.
हे असं का होतं किंवा आपण नव्याने एखादी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम सुरू करणार असू तर काय केलं पाहिजे याची माहिती येथे घेणार आहोत.
 
कन्नड चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते पुनित राजकुमार यांचाही अशाचप्रकारे मृत्यू झाला होता. 2021साली पुणे जिल्ह्यात जुन्नर येथील बाबू नलावडे यांचा क्रिकेट खेळताना पिचवरच मृत्यू झाला होता.
 
2018 मध्ये मुंबईत घाटकोपरच्या सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धा सुरू असताना 22 वर्षीय जिबीन सनीचा अचानक हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला होता. याचाच अर्थ या घटना आता वरचेवर कानावर येत आहेत. त्यामुळेच या घटनांकडे गांभीर्यानं पाहाण्याची गरज आहे.
 
नवी शारीरिक हालचाल सुरू करताना काय काळजी घ्यायची?
एखादी नवी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम सुरू करताना आपण अचानक वेगानं सुरुवात करू नये. आपल्या हृदयाला सतत रोज काम करावं लागत असतं. त्यामुळे एखादा नवा व्यायाम किंवा कधीच व्यायाम न केलेल्या माणसाने अचानक व्यायाम सुरू करण्याऐवजी एकेक पायरीने त्याची गती आणि तीव्रता वाढवली पाहिजे.

आपलं हृदय आणि इतर अवयव काय संकेत देत आहेत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, त्या संकेतांकडे लक्ष दिले पाहिजे. कोणतीही नवी गोष्ट सुरू करणं हे चांगलं आणि उत्साहवर्धक असतं मात्र या उत्साहाच्या नादात अवयवांनी दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये.
 
हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवत नेली तसेच योग्य मार्गदर्शन घेत आपण व्यायाम केला तर शरीर तंदुरुस्त राहाण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुदृढ राहाण्यासाठी मदत होते.
 
आता एक आणखी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे व्यायाम ही दररोज करण्याची गोष्ट आहे. मग तो एरोबिक्स, झुंबा, जीममधील, मैदानी खेळ, चालणे, पोहणे, सायकल चालवणे, टेकडी चढणे, योगासनं असा कोणताही असू शकतो. परंतु तो कधीतरी अचानक करण्याचा प्रकार नाही.

बहुतांशवेळा ‘काहीतरी झालंय, शरीरात काहीतरी बिघडलंय अशा कारणांमुळे व्यायामाला सुरुवात केली जाते. उच्च रक्तदाब, रक्तातील साखर ताब्यात राहाण्यासाठी डॉक्टर शारीरिक हालचाल करण्यास सुचवतात. तसेच वजन कमी करण्यासाठी, पीसीओडी-थायरॉईडसारखे आजार कमी होण्यासाठी व्यायाम सुचवले जातात. अशावेळेस अचानक व्यायामाला सुरुवात करण्याऐवजी शरीराची पूर्ण तपासणी करुन आपली बलस्थानं आणि कमकुवत स्थानं याची ओळख करुन घेतली पाहिजे.
 
हे आजार एका आठवड्यात किंवा महिन्यात बरे होणार नाहीत. त्यामुळे सगळी ताकद एकाचवेळी लावून पुढे एखादा नवा त्रास ओढावून घेण्यापेक्षा सुरुवातच विचारपूर्वक केली पाहिजे.
 
आपले वाढलेले वजन हे काही महिने किंवा काही वर्षांमध्ये वाढलेले आहे ते काही दिवसांत नाहीसं होईल अशी अपेक्षा करणं अगदीच चूक आहे. तसेच फक्त वजन कमी करणं हे एकमेव ध्येय ठेवण्याऐवजी त्याबरोबर एकूणच शरीर सुदृढ राहून मानसिक स्थिती सुधारेल, झोप चांगली लागेल अशी विविध ध्येयं त्यात एकत्रित असली पाहिजेत.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि योग्य प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन याने आपण सुरुवात करू शकतो. तसेच फक्त या आजारातून सुटका करुन घेण्यासाठी किंवा वजनाचे ध्येय गाठण्यासाठी व्यायाम नसून तो पुढेही रोज करायचा आहे याची कल्पना आपल्या मनाला असली पाहिजे.
 
याबरोबरच आपण आहारात काही बदल करणार असू तर तोही आहारतज्ज्ञांना विचारुन आपण केलेल्या तपासण्यांचे अहवाल त्यांना दाखवूनच केले पाहिजेत. आपल्या मनात येतील ते बदल आहारात केल्यास त्याचा तोटाच होण्याची शक्यता वाढते.
 
1. व्यायामशाळेत हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा अचानक झटका येण्याची काय कारणं आहेत?
छत्रपती संभाजीनगरमधील घटना किंवा पुनीत राजकुमार यांच्यासारख्या मृत्यूच्या घटना का घडतात याचा विचार करताना आपण हृदयविकाराच्या झटके अचानक कसे येतात याकडे पाहू.
 
साधारणपणे अशा बाबतीत संबंधित व्यक्तीला हृदयासंबंधी आजाराचा काही जुना त्रास असण्याची शक्यता असते. याची कल्पना आधी आलेली नसण्याची शक्यता असते. 
 
नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. डॉ. घोगरे म्हणाले, “हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी नावाची एक अवस्था असते, ही अवस्था अनुवंशिक असते. यामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत असतात. तसेच काहीवेळेस आर्थिमियास नावाची स्थिती असते, यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि जास्त शारीरिक ताण आला तर त्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

आणखी एक शक्यता म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसिज यात हृदयातील वाहिन्या आतून बंद होत जातात किंवा पूर्ण बंद झालेल्या असतात यामुळे रक्तप्रवाह पुरेसा होण्यात अडथळा येतो. यातील अनेक गोष्टी सुप्तावस्थेत असतात त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपण हृदयासंबंधी तपासणी करणं आणि आपले शरीर कोणते संकेत देतंय याकडे लक्ष दिलं पाहिजे.”
डॉ. अमित गंगवानी, (सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, झायनोव्हा शाल्बी रुग्णालय, मुंबई) यांनीही बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.
 
डॉ. गंगवानी सांगतात, “हृदयविकाराची समस्या असल्यास जिममध्ये अचानक मृत्यू आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बरेच लोक जीममध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात आणि कठीण वर्कआउट करतात त्यांना त्यांच्या आरोग्याची स्थिती माहिती नसते आणि त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू होतो.
 
निदान न झालेल्या हृदयाच्या स्थिती जसे की कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे छातीत दुखणे किंवा श्वासोच्छवासाचा त्रास होतो आणि ही लक्षणे जीममध्ये परिश्रम करताना उद्भवू शकतात. इतर घटक जसे की तणाव, आणि झोपेचा अभाव यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे तीव्र वर्कआउट्स दरम्यान व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. बरेच जीममध्ये जाणारे हायड्रेशन आणि आहाराकडे लक्ष देत नाहीत. परंतु आरोग्याकडे लक्ष न दिल्यास हृदयाचे कार्य बिघडू शकते.”
 
2. जीमला जाण्याआधी काय केलं पाहिजे?
जीमचा व्यायाम सुरू करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यात आपली शारीरिक तपासणी करणं आवश्यक आहे.
 
तपासणीबरोबरच आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे याचा विचार मनात नीट केलेला असला पाहिजे. आपण कोणत्या गतीने, क्षमतेने व्यायाम करू शकतो याची चर्चा व्यायामशाळेतील प्रशिक्षकाशी केली पाहिजे. तेथे इतरांशी तुलना किंवा क्षमतेपेक्षा स्वतःवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

डॉ. घोगरे सांगतात, "सर्वप्रथम आरोग्य तपासणी केली पाहिजे. हृदयासंबंधी तुमच्या कुटुंबात काही अनुवंशिक आजार असतील तर ते डॉक्टरांना सांहितले पाहिजेत. तसे असल्यास इसीजी, टूडी एको आणि शक्य झाल्यास स्ट्रेस टेस्ट करुन घ्यावी."
 
तर डॉ. गंगवानी या तपासण्यांबरोबरच सांगतात, “व्यायाम सुरू करणाऱ्यांनी योग्य हायड्रेशन म्हणजे शरीरातील द्रव-पाण्याची पातळी नीट राहिल याची काळजी घेतली पाहिजे. हृदयासंदर्भातील एखादा आजार असेल तर आपल्या क्षमतेएवढाच व्यायाम करावा आणि योग्य प्रशिक्षकांच्या मदतीनेच करावा. आपल्या खाण्याच्या सवयी आणि वजन याकडेही लक्ष दिलं पाहिजे.”
 
3. मध्यमवयीन व्यक्तीने कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
साधारणपणे अगदी तरुण वयात शिक्षण, नव्यानं लागलेली नोकरी, नव्या जबाबदाऱ्या, विवाह अशा एका क्रमानं येणाऱ्या घटनांमध्ये स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं राहून जातं. सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत थोडा काळ निघून जातो. याच काळात काही शारीरिक त्रासही डोकं वर काढतात.
तासंतास एकाजागी बसून काम करणं, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, व्यसनं, बदलत्या मानसिक अवस्था अशा गोष्टींचा शरीरावर होणारा परिणाम अधिक तीव्रतेने दिसू लागतो.
 
मध्यमवयीन लोक अशावेळेस इच्छेने किंवा अनिच्छेने शारीरिक व्यायामाकडे वळतात, किंवा त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे व्यायामाकडे वळावं लागतं. परंतु अशा वयोगटातील लोकांनी व्यायामासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

डॉ. महेश घोगरे सांगतात, “मध्यमवयीन लोकांनी साधारणपणे अतीशय संथ सुरुवात कली पाहिजे. व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवली पाहिजे. व्यायाम करताना श्वास अपुरा पडणे, छातीत दुखणे किंवा भोवळ येणे, प्रमाणाबाहेर थकवा येणं अशी लक्षणं दिसली की त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नियमित आरोग्य तपासणी करत राहिली पाहिजे, त्यातून संभाव्य आजारांची शक्यता असेल तर ती लक्षात येऊ शकते. आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य प्रशिक्षकाची मदत घेतली पाहिजे. मध्यमवयीन लोकांनी शारीरिक हालचाली, व्यायाम हे योग्य काळजी घेऊनच केले पाहिजेत हे विसरू नका.”
 
4. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या अचानक होणाऱ्या घटनांचे काही संकेत असतात का?
हृदयविकाराच्या झटक्यासारखे त्रास टाळण्यासाठी त्याचे काही संकेत, लक्षणं आधीपासून ओळखता येतात. छातीत दुखणं, श्वास विनाकारण अपुरा पडायला लागणं, हृदयाचे ठोके अनियमित पडणं, शारीरिक हालचाल करताना किंवा केल्यानंतर अतिशय थकवा येणं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
 
काही लोकांना भोवळ येणं, थोडं डोकं दुखणं अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं लहान वाटत असली तरी संभाव्य धोक्याची लक्षणं असू शकतात. त्यामुळे वेळीच त्याकडे लक्ष देणं फार उपयोगी ठरतं.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं सांगताना डॉ. अमित गंगवानी म्हणाले, “हा झटका येण्याचे प्राथमिक लक्षण म्हणजे अचानक भान हरपून जाणे आणि प्रतिसाद न देणे. थकवा, मळमळ, छातीत दुखणे आणि जळजळ होणे, अति थंड घाम येणे, धडधडणारे हृदयाचे ठोके, मळमळ, उलट्या, अत्यंत थकवा, पाठदुखी आणि धाप लागणे यासारखी इतर लक्षणे दिसतात. ताबडतोब उपचार न केल्यास ही लक्षणे अधिक वाढून गंभीर होऊ शकतात.”
 
5. तरुण पिढीनं जीवनशैली कशी ठेवावी?
आजकाल कोणतीही तपासणी केली किंवा डॉक्टरांनी औषध दिले की ते एक सल्ला जरुर देतात, तो म्हणजे 'जीवनशैली सुधारा म्हणजेच लाईफस्टाइल नीट ठेवा'.
 
याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे औषधाबरोबरच दीर्घकालीन फायद्यासाठी जीवनशैली नीट असली पाहिजे असं डॉक्टर आवर्जून सांगतात.
 
फक्त शरीरच नाही तर मन शांत असणं, निर्णय घेता येणं, भांबावल्यासारखं न होणं, झोप नीट लागणं, रोगप्रतिकारक क्षमता नीट असणं अशा गोष्टींवर मेहनत करा असं डॉक्टर हल्ली सांगतातच. त्यामुळे आपल्या जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

डॉ. महेश घोगरे सांगतात, “तरुण पिढीसह सर्वांनी शरीर आणि मनाचं पोषण होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. शारीरिक हालचाल, व्यायाम, चौरस आहार आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. धूम्रपान, मद्यपान टाळलं पाहिजे. ताण कमी करण्यासाठी चांगल्या मार्गांचा वापर केला पाहिजे. आपलं शरीर ही एक मौल्यवान भेटवस्तू आहे असा विचार करुन त्याचं पोषण केलं पाहिजे. चांगल्या सवयी शरीर आणि मनाला असणं हा दीर्घकालीन फायद्याचा पाया आहे हे लक्षात घ्या.”
 
डॉ. अमित गंगवानी सांगतात, “हृदयविकाराचा झटका किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसारख्या गंभीर परिस्थितींचा धोका टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे आवश्यक आहे. तरुण पिढीने प्रक्रिया केलेले, पॅक केलेले आणि जंक फूड खाणे टाळावे ज्यामध्ये विविध संरक्षक आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ असतात. भरपूर फळे, भाज्या, डाळी, शेंगा, शेंगदाणे आणि बिया खाऊन चांगल्या आहाराची निवड करा."
 
"45 मिनिटांपेक्षा जास्त काळ शारीरिक हालचाली आणि व्यायाम केल्याने तुमचे हृदय निरोगी राहण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यांच्या आरोग्यासाठी साखर आणि सोडियमचे सेवन मर्यादित केले पाहिजे. तुम्हाला सीपीआरच्या मूलभूत तंत्राची माहिती असावी जेणेकरून तुमच्या जिममध्ये कोणीतरी कोलमडल्यास, तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करू शकाल.”
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती