आठ तासांच्या झोपेचे फायदे तुम्हाला माहीत आहे का?

वेळेवर झोप आणि व्यायाम यामुळे स्ट्रोकचा धोका कमी करण्यात यश येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. न्यूयॉर्कच्या विश्वविद्यालयातील संशोधकांनी दररोज सात ते आठ तासांची झोप आणि व्यायाम केल्याने तब्येतीवर होणारे चांगले परिणाम अधोरेखित केले आहेत.
 
दररोज सात ते आठ तासांची झोप आठवडय़ातून तीन ते सहावेळा दररोज अर्धा ते एक तास व्यायाम केल्यास स्ट्रोकचा धोका कमी करता येऊ शकतो, असे यातून समोर आले आहे. मात्र जे स्ट्रोकचे रुग्ण आहेत, त्यांनी झोपेचे प्रमाण कमी वा अधिक केल्यास धोका वाढण्याची भीती असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.
 
7 ते 8 तासांची झोप घेतलेल्यांमध्ये स्ट्रोकचा धोका 25 टक्क्यांनी घटतो. दुसरीकडे दीर्घ निद्रा म्हणजे 8 ते 9 तास घेणार्‍या व्यक्तींमध्ये हा धोका 146 टक्क्यांनी वाढत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. सात तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍या व्यक्तींमध्ये स्ट्रोकचा धोका 22 टक्क्यांपर्यंत अधिक असतो.
 
2004 ते 2013 या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात संशोधकांनी सहभागींचे स्वास्थ्य, जीवनशैली, लोकसंख्या आणि इतर कारणांचा समग्र अभ्यास करून विलेषण केले आहे. कमी-अधिक झोप, जलतरण, सायकलिंग यासारख्या गोष्टींमुळे स्ट्रोकवर पडणार्‍या प्रभावांचा विचार करण्यात आला आहे. हा शोध ‘अमेरिकन स्ट्रोक असोसिएशन इंटरनॅशनल स्ट्रोक कॉन्फरन्स 2016’ मध्ये सादर करण्यात आला होता. 

वेबदुनिया वर वाचा