गुणी अभिनेत्री

सोनाली कुलकर्णी या संवेदनशील व गुणी अभिनेत्रीने गेल्या काही वर्षांत वेगळा ठसा चित्रपटसृष्टीवर उमटवला आहे. मोजक्याच पण दखल घ्यायला लावणाऱया भूमिकांमधून तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. व्यावसायिक व समांतर दोन्ही प्रकारच्या चित्रपटात यश मिळवणारी स्मिता पाटील यांच्यानंतरची ती मराठी अभिनेत्री आहे.

IFM
पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरातील सोनालीचे दोघे भाऊ संदेश आणि संदीप हेही याच क्षेत्रातले. त्यांच्या प्रभावातून सोनाली या क्षेत्राकडे येण्यास उद्युक्त झाली. पुरूषोत्तम करंडकातील नाटकाने सोनालीने परीक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यानंतर तिने नाटकाचा विचार गंभीरपणे करायला सुरवात केली.

त्यासाठी ज्येष्ठ नाट्यकर्मी सत्यदेव दुबेंचे शिबिरही केले. तिला पहिली संधी दिली ती प्रख्यात लेखक दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी. त्यांच्या 'चेलूवी' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने एका झाडाची भूमिका केली. बुद्धिजीवी अभिनेत्री अशी तिची ओळख व्हायला लागली. 'मुक्ता' या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून सोनालीने मराठीत पदार्पण केले. ही कथाही वेगळी होती. त्यानंतर मग अमोल पालेकरांचा 'दायरा, कैरी, सुमित्रा भावेंचा 'दोघी' यातील भूमिका वेगळ्या ठरल्या. डॉ. आंबेडकरांच्या चित्रपटात रमाबाईची भूमिकाही तिने समरसून रंगवली.

IFM
एकीकडे समांतर चित्रपट करत असताना दुसरीकडे व्यावसायिक हिंदी चित्रपटसृष्टीतही तिला चांगली संधी मिळाली. 'दिल चाहता है' या अतिशय गाजलेल्या चित्रपटात सैफ अली खान तिचा नायक होता. याशिवाय 'मिशन काश्मीर, डरना जरूरी है, अग्निवर्षा' असे अनेक चित्रपट केले. सोनाली चित्रपट स्वीकारताना दिग्दर्शक व पात्रांची व्यक्तिरेखा याबाबतीत नेहमी दक्ष असते. मकरंद देशपांडे या कलात्मक दिग्दर्शकाच्या 'दानव' चित्रपटातील भूमिका सोनालीने अप्रतिमरित्या साकारली.

IFM
या चित्रपटास आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मान मिळाले. 'फायर ऑफ माय हार्ट' या इंग्रजी नावाच्या इटालियन चित्रपटात तिने प्रख्यात हॉलीवूड अभिनेता ओमार शरीफ यांच्याबरोबर काम केले. यातील भूमिकेसाठी तिला मिलान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. याशिवाय मुक्ता, दोघी, देवराईसाठी तिला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर दोघीसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सोनाली व्यावसायिक चित्रपटात व्यस्त असली तरी नाटक विसरलेली नाही.

काही वर्षांपूर्वी तिचे 'चाहूल' नावाचे नाटक आले होते. अतिशय संवेदनशील विषयावरचे हे नाटक बुद्धिजीवी वर्गात चांगलेच गाजले. 'वसंत का तिसरा यौवन व सर सर सरला' ही तिची काही हिंदी नाटके आहेत. अभिनयाचा कस लावणाऱया चित्रपटात सोनालीला अधिक रस असतो. त्यामुळे तिच्या चित्रपटांची निवड वेगळी असते.

सोनाली कुलकर्णी अभिनित चित्रपट : डरना जरूरी है, व्हाइट रेनबो, देवराई, अग्निवर्षा, दानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कैरी, दायरा, दोघी(1995), मुक्ता (1994)

पुरस्कार :
उत्कृष्ट अभिनेत्री : राज्य शासनाचा पुरस्कार (मुक्ता)
उत्कृष्ट अभिनेत्री : राज्य शासनाचा पुरस्कार, फिल्मफेअर (1996) (दोघी)
उत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्समधील चित्रपट महोत्सव (1997) (दायरा)

वेबदुनिया वर वाचा