सध्याच्या आघाडीच्या मराठी दिग्दर्शकांमध्ये केदार शिंदेचे नाव घेतले जाते. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात त्याने सहज वावर करताना आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्याकडून बर्याच मोठ्या अपेक्षा आहेत. केदारला या माध्यमाचे बाळकडू घरातूनच मिळाले.
कारण शाहीर साबळे यांचा केदार हा नातू. सहाजिकच शाहीर जेथे जातील तेथे केदार जायचा. त्यांच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमात त्याचा सहभाग होता. शाहीरांबरोबर राहून त्याच्या क्षमतांचा खर्या अर्थाने विकास झाला. नव्या कल्पनांची बीजे पेरली गेली. दृष्टिकोन विकसित झाला.
अर्थात शाहीरांचा नातू असला तरी त्याला संघर्ष चुकला नाही. महाविद्यालयीन काळात वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घे, काही तरी वेगळे कर असे उद्योग तो करायचा. भरत जाधव, अंकुश चौधरी हे त्याचे तेव्हापासूनचे मित्र. त्यांनी सुरू केलेल्या नाट्यसंस्थेस नाटक सादर करण्यासाठी कुणीही मान्यवर लेखक संहिता देण्यास तयार नव्हते.
म्हणून मग केदारने स्वतःच लेखणी हातात घेतली. महाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्यानंर व्यावसायिक रंगभूमीवर केदारला यशाची खरी चव चाखायला मिळाली ती 'आमच्यासारखे आम्हीचं' या नाटकाच्या निमित्ताने. त्यानंतर मग त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. जादु तेरी नजर, आपण दोघे राजाराणी, मनोमनी ही नाटके आली.
केदारने यानंतर आपला मोर्चा वळवला तो मालिकंकडे. हसा चकटफू, घडलंय बिघडलयं आणि श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकांमध्ये केदारने मानवी जीवनाचे विविध पैलू, अंतरंग, मानसिक, भावनिक गुंतागुंत याची छान गुंफण घातली. याच काळात केदारचे ' सही रे सही' हे नाटक रंगभूमीवर आले आणि धो धो चालले.
आजही हाऊसफुल्लचा बोर्ड या नाटकापुढून हटायचे नाव घेत नाही. या नाटकाने केदार व भरत जाधव यांना स्टार बनवले. केदारला मोठा पडदा खुणावत होताच. यानंतर त्याने तेही धाडस केले. ' अग बाई अरेच्चा' या चित्रपटाद्वारे त्याने हे माध्यमही यशस्वीपणे हाताळले.
थोडी वेगळी कथा, त्याची वेगळी हाताळणी यामुळे हा चित्रपट यशस्वी झाला. नंतर जत्रा, यंदा कर्तव्य आहे' हे त्याचे चित्रपट आले. तेही बर्यापैकी यशस्वी ठरले. सामाजिक, राजकीय परिस्थितीवर विडंबन केदार खूप छान करतो. विनोद हा त्याच्या दिग्दर्शकीयं शैलीचा आत्मा आहे.
केदार शिंदे याने दिग्दर्शित केलेले चित्रपट व नाटकं-