आस्था - अनास्थेचा ‘देऊळ बंद’

मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (12:44 IST)
अमेरिकेत सेट असलेला एक भारतीय शास्त्रज्ञ राघव शास्त्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रॉजेटसाठी भारतात येतो. याच दरम्यान तो काही अतिरेक्यांच्याही टार्गेटवर असतो. त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला मुंबईऐवजी पुण्यातल्या एका सामान्य सोसायटीत शिफ्ट करण्यात येते. याच सोसायटीत स्वामी समर्थाचे एक देऊळ असते, जिथे रोज आरत्या, भजन अगदी जोरदार चालू असतात. राघव शास्त्री याचा देव धर्मावर अजिबात विश्वास नसतो, तो एक नास्तिक असतो. देऊळात दररोज चाललेल्या या आवाजामुळे डिस्टर्ब होणारा राघव आपल्या हातात असलेले राजकीय पॉवर वापरुन, हे देऊळ बंद करतो. यानंतर खरे नाटय़ घडते. स्वत: स्वामी प्रकट होतात. मग काय होते.

याची खरी मजा तुम्हाला ‘देऊळ बंद’ सिनेमा पाहिल्यावरच कळेल.. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून हा सिनेमा एकदम करेंट टाईमिंगला प्रदर्शित करण्यात आला आहे. अष्टविनायक आणि मुन्नाभाई या सिनेमातले काही एलिमेन्ट्स यात अनुभवायला मिळतील. दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन योग्य ठरले आहे. सिनेमाची मांडणीही उत्तम झालीय. या सिनेमातचे दोन प्रमुख नट.. एकीकडे गश्मिर महाजनी तर दुसरीकडे मोहन जोशी या दोघांनीही जबरदस्त बॅटिंग केलीय. गश्मिर एक न्यू कमर असूनसुद्धा त्याचा अभिनय छान झालाय. मोहन जोशी यांनी साकारलेली स्वामी समर्थाची भूमिकाही व्यक्तिरेखा भाव खावून जाते. त्यांचा अंदाज कमाल आहे, त्यांची
डायलॉग डिलिवरीही कमाल आहे. या कॅरेक्टरला थोडासा प्रॅक्टिकल टच देण्यात आलाय ज्यामुळे या दोन्ही भूमिकांमधला संवाद अतिशय रंजक वाटतो. एकीकडे एक शास्त्रज्ञ तर दुसरीकडे स्वत: स्वामी समर्थ यांची केमिस्ट्री चांगलीच रंगलीय.

वेबदुनिया वर वाचा