नृसिंह जयंती 2021: भगवान नृसिंह पूजन विधी आणि मंत्र
बुधवार, 19 मे 2021 (09:38 IST)
नृसिंह जयंती व्रत वैशाख शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला असते. यंदा 25 मे 2021, मंगळवारी नृसिंह जयंती आहे. या दिवशी भगवान श्री नृसिंह यांनी खांबातून बाहेर येऊन भक्त प्रह्लादचे प्राण वाचवले होते. पुराणांप्रमाणे या दिवशी भक्त प्रह्लादच्या रक्षेसाठी प्रभू विष्णूंनी नृसिंह रूप धारण केले होते. या कारणामुळे या दिवशी भगवान नृसिंह जयंती साजरी केली जाते. जाणून घ्या
या दिवशी कशा प्रकारे पूजा करावी-
पूजन विधी आणि मंत्र-
* या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
* संपूर्ण घराची स्वच्छता करावी.
* यानंतर गंगा जल किंवा गौमूत्र शिंपडून पूर्ण घर पवित्र करावं.
तत्पश्चात निम्न मंत्राचं उच्चारण करावं-
भगवान नृसिंह पूजन मंत्र -
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे।
उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जितः॥
या मंत्रासह दुपारी क्रमशः तीळ, गोमूत्र, मृत्तिका आणि आवळा यासह वेगवेगळं स्नान करावं. नंतर शुद्ध पाण्याने अंघोळ करावी.
पूजा स्थळ शेणाने सारवून तेथे अष्टदल कमळ तयार करावं.
अष्टदल कमळावर सिंह, भगवान नृसिंह आणि लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापित करावी. नंतर वेदमंत्रांनी प्राण-प्रतिष्ठा करुन षोडशोपचाररीत्या पूजा करावी.
रात्री गायन, वादन, पुराण श्रवण किंवा हरी संकीर्तन याने जागरण करावं. दुसर्या दिवशी पुन्हा पूजा करुन ब्राह्मण भोजन करवावे.
नियम
* या दिवशी दिवसभर उपास करावा.
* सामर्थ्यानुसार भू, गौ, तीळ, स्वर्ण व वस्त्रादी दान करावे.
* क्रोध, लोभ, मोह, मिथ्या, कुसंग व पापाचार त्याग करावं.
* या दिवशी व्रत करणार्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे.