कोलकत्यातील दुर्गापूजा

WDWD
देशभर नवरात्रौत्सवाची धुम असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये मात्र दुर्गापुजेच्या उत्सवाचा जल्लोष असतो. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालत असून त्या वेळी आबालवृद्ध त्यात गढून गेलेले असतात. हा बंगालचा राष्ट्रीय महोत्सव आहे असे म्हणता येईल. दुर्गापूजा करणे हा बहुतेक लोकांचा कुलाचार आहे. देवघरात देवीची प्रतिमा व घट स्थापन करून त्यांची मोठ्या थाटामाटाने पूजा चालेली असते. घरोघर नृत्य, गीत, पूजा, कीर्तने होत असतात, ती पाहण्यासाठी हजारो देवीभक्त रात्रभर फिरत असतात.

देवीच्या मंदिरात तसेच सार्वजनिक दुर्गापूजा मंडळामध्ये प्रचंड उत्साह असतो. कोलकता तर रात्रभर या काळात रस्त्यावर आलेले असते. वाद्य, नृत्य, गीतगायन यांना उधाण आलेले असते. शेवटच्या तीन दिवशी रात्री महापूजेचा समारंभ होतो. दिव्यांच्या लखलखाटामुळे व माणसांच्या गर्दीमुळे रात्रीचा भासच होत नाही. 'कालीमातेचा विजय असो' या अर्थाच्या घोषाने आकाश दुमदुमून जाते. ढोल व नगारे यांच्या ध्वनींचा कल्लोळ आसमंत भेदून टाकतो.

दुर्गापूजानानंतर लवकरच म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी कालीपूजा किंवा श्यामापूजनोत्सव होत असतो. या देवीचे रूप अत्यंत भयप्रद आहे. ती रुधिरप्रिया आहे असे मानून या दिवशी निरनिराळ्या पशूंचे बली तिला अर्पण करण्यात येतात. दुसर्‍या दिवशी कालीची मूर्ती विसर्जन केली जाते. जगाची पोषक शकित म्हणून तिला जगद्वात्री हे नाव प्राप्त झाले. लाल वस्त्रे परिधान केलेल्या या सिंहारूढ देवीसमोर अनेक उत्सव चालतात. जगद्धात्रीच्या पूजनाचे फल चतुर्विध पुरुषार्थप्राप्ती हे आहे असे भाविकांचे मत आहे. पौर्णिमेस लक्ष्मीपूजनोत्सव होत असून तो दिवस कोजागरी पौर्णिमा या नावाने प्रसिद्ध आहे. (दक्षिण हिंदुस्थानांत लक्ष्मीपूजन आश्विन अमावस्येस होते.) धान्याच्या कोठारास तांबडा रंग लावून त्याला लहानसे वस्त्र अर्पण करतात. या वेळी पूजादिक उपचारही होत असतात.

नवरात्राच्या‍ दिवसांत शक्तीची निरनिराळ्या स्वरूपात पूजा करण्यात येते. जगज्जननी म्हणून उपांगललितेची, पालनपोषण करणारी म्हणून जगद्धात्रीची, संपत्तिदायिनी म्हणून लक्ष्मीची, विद्यादायिनी म्हणून सरस्वतीची आणि संहारकर्त्री म्हणून कालीची याप्रमाणे पूजाविधी असतात.

(संकलन आधार- आर्यांच्या प्राचीन व अर्वाचीन सणांचा इतिहास)

वेबदुनिया वर वाचा