मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी संस्कृती आणि भाषा टिकविण्यासाठी आंदोलनांचा धुरळा उडालेला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन सुरू केले तरी कधी काळी हाच मुद्दा घेऊन स्थापन झालेली शिवसेनाही आपल्या परीने यात उतरली आहे. मराठी माणसांचा कैवार घेणारे आपणच असे म्हणून हे दोन्ही पक्ष शड्डू ठोकत आहेत.
तिकडे विचारवतांमध्येही वैचारीक धुरळा उडाला आहे. आंदोलनातील हिंसाचार चुकीचा पण त्यातील मुद्दे बरोबर यापासून ते अगदी आजच्या कॉस्मोपॉलिटिन जगात अशा प्रकारचा प्रांतीयवाद जोपासणे चुकीचे अशा प्रतिक्रिया मराठी भाषकांकडूनच व्यक्त होत आहेत. त्याचवेळी हिंदी मीडीया तर या सगळ्या प्रकाराच्या विरोधातच आहे. हे सगळे होत असताना महाराष्ट्राबाहेर रहाणार्या मराठी भाषकांत मात्र बरीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील आंदोलनांचा आपल्यावरही काही परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी काही प्रमाणात वाटत आहे.
महाराष्ट्रात मराठी संस्कृती, भाषा टिकविण्याच्या बाबतीत वैचारीक आणि रस्त्यावरची आंदोलने होत असताना परप्रांतात रहाणार्या मराठी मंडळींची स्थिती काय आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे होते. बरीच वर्षे महाराष्ट्राबाहेर राहूनही ही मंडळी 'मराठी' म्हणून उरली आहेत काय? मुख्य म्हणजे परप्रांतात, परभाषेच्या सावलीखाली राहूनही ते स्वतःची भाषा टिकवतात का? त्यांची पुढची पिढी मराठी बोलते का? मराठी सण, संस्कृती त्यांनी कितपत टिकवली आहे? आणि मुंबई व महाराष्ट्रात उसळलेल्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलनाकडे ती कोणत्या नजरेने पहातात? त्याचवेळी परप्रांतीय म्हणून त्यांना स्वतःला काही त्रास झाला का? दुय्यमत्वाची वागणूक मिळाली का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न वेबदुनियाने केला. यासंदर्भात इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा आणि हरिद्वार येथे रहाणार्या मराठी भाषकांना वेबदुनियाने लिहिते केले. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी खालील दुव्यांवर टिचकी मारा. या विषयावर आपणही आपली मते खाली दिलेल्या चौकटीत व्यक्त करू शकता.