पालक आपल्या मुलांना मातृभाषा शिकवण्यास का टाळत आहेत?

मंगळवार, 18 जुलै 2023 (23:17 IST)
social media
 "मला आमची मातृभाषा बुंदेलखंडी बोलता येत असती,तर माझ्या अम्मी आणि अब्बू सोबत बोलण्याची एक वेगळीच मजा जीवनात असती."
 
दिल्लीतील एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत काम करणारा इमरान,हे सांगताना भावूक झाला.इमरानला दुःख आहे की,तो त्याच्या पालकांशी मातृभाषा असलेल्या बुंदेलखंडीतून बोलू शकत नाही.
 
इमरानचं वडिलोपार्जित घर ग्वालेरमध्ये आहे.पण नोकरी निमित्तानं तो आणि त्याचं कुटुंब झाशीला स्थायिक झालं. इमरान आणि त्याच्या भावंडांचा जन्म इथेचं झाशीत झाला.
 
घरात सर्वजण हिंदीत बोलायचे,पण इमरानला आपल्या कॉलेजच्या काळात जाणवू लागलं की, त्याच्या अब्बू आणि अम्मीला बुंदेलखंडी बोलणारं कुणी भेटलं की त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहत नव्हता.
 
इमरानला वाटलं की, अब्बू आणि अम्मीच्या आनंदासाठी आपणही बुंदेलखंडी शिकायला हवी. पण त्याला आता उशीर झाला होता. कारण करोना महामारीनं त्याच्या अब्बू आणि अम्मीला त्याच्यापासून हिरावून घेतलं.
 
आई वडिलांच्या मातृभाषेचा वारसा न मिळण्याची ही व्यथा केवळ इमरानची नाही, तर मोठी शहरं आणि महानगरांमध्ये राहणाऱ्या पिढीची आहे,ज्यांचे पालक नोकरी किंवा अन्य कारणांसाठी इतरत्र स्थायिक झाले.
 
कुटुंब आपली मातृभाषा विसरत आहेत
जर्मनीत जन्मलेली आणि वाढलेली लेखिका मिठू सान्यालला तिचं नाव नीट उच्चारता येतं नाही,याचं दुःख तिला आहे.
 
ती सांगते,"माझे वडील भारतात बंगाली बोलून मोठे झाले आणि नंतर ते जर्मनीला गेले.माझे वडील जर्मनीत त्यांच्या मित्रांशी बंगालीत बोलायचे ,पण माझ्याशी जर्मनीतून बोलत असतं."
 
हेच काहीस इमरान रईसच्या बाबतीत घडलं.
 
इमरान सांगतो, "अब्बू आणि अम्मी यांना बुंदेलखंडी येत होती,पण आम्हा भावंडांशी ते हिंदीतून बोलायचे, त्यामुळं आम्ही भाऊ बहिण बुंदेलखंडी नीट शिकू शकले नाहीत.”
 
एनिक डी हॉर्वर ही जर्मनीत एफ्टर विद्यापीठात प्राध्यापक आहेत. काही कुटुंब आपली मातृभाषा कशी विसरतात यावर सखोल संशोधन त्यांनी केलंय.
 
त्यांनी अनेक देशांमध्ये केलेल्या अभ्यासात असं दिसून आलंय की, ज्या घरांमध्ये मुलं दोन किंवा अधिक भाषा ऐकून मोठी होतात, अशा मुलांची संख्या 12 ते 44 टक्के आहे. मुलं नंतर एकच भाषा स्वीकारतात.
 
प्रोफेसर हॉवर सांगतात,"सुरुवातीला मुलं दोन्ही भाषेतील शब्द शिकतात. माझी मुलं दोन भाषा शिकली पण प्री-स्कूलमध्ये गेल्यावर ते एकच भाषा बोलू लागले. असं का घडलं? कारण समाजात वावरताना जी भाषा उपयोगी असते, तीच ते स्वीकारतात आणि मग दुसरी भाषा शिकणं त्यांच्यासाठी निरुपयोगी आहे, हे त्यांना लक्षात येतं."
 
आई वडिलांचा आपल्या भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन
आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावं, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते,त्यामुळंच मातृभाषेविषयी ओढ असूनही मुलांच्या करियरसाठी उपयोगी ठरेल अशीच भाषा शिकवण्यावर भर असतो.
 
रशियन नृत्यांगना स्वेतलाना तुलसीची आई रशियन आहे, वडील भारतातून रशियात आले.
 
ती सांगते की, "वडिलांची मातृभाषा तेलगू आहे,पण त्यांनी ती कधीच शिकवण्याचा प्रयत्न केला नाही."
 
स्वेतलाना पुढे सांगते की, रशियात प्रत्येक जण रशियन बोलत होता.माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांना तेलगू ऐवजी इंग्रजी शिकवले कारण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि आज इंग्रजी माझ्यासाठी उपयोगी ठरली.
 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर लिंग्विस्टिक्सचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.हरी माधव राय सांगतात,"जेव्हा मातृभाषेत संधी नसते तेव्हा समस्या येतात आणि म्हणूनच ज्या भाषेत उपजीविका दिसेल, त्या भाषेचा प्रभाव अधिक असतो.”
 
ते उदाहरण देतात, "दीर्घ आंदोलनानंतर 2003 साली आसाममधील बोडो भाषेचा आठव्या सूचीत समावेश करण्यात आला होता. सुरुवातीला मोठ्या संख्येनं पालकांनी आपल्या मुलांना बोडो माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायला लावला. नंतर त्यांच्या लक्षात आलं की, आसामी,हिंदी आणि इंग्रजी भाषेचा प्रभाव जास्त आहे, तेव्हा बरेच जण परतले."
 
डॉ.राय यांच्या मते, अनेकदा लोकं जग आणि देशातील परिस्थितीनुसार वाटचाल करतात.त्याच बरोबर सांस्कृतिक वर्चस्वाचा परिणाम ही भाषांवर होत असतो.
 
मुलांना अनेक भाषा शिकवण्याविषयीचा गैरसमज
जर्मन लेखिका मिठू सन्याल सांगतात की, तीला ना तिच्या वडिलांकडून बंगाली शिकता आली,ना आईकडून तीची मातृभाषा 'पॉलिश' शिकता आली नाही.
 
ती सांगते की,"मी लहान असताना काही जणांनी माझ्या पालकांना सांगितलं की,मुलांना एकापेक्षा अधिक भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला,तर ती एकही भाषा नीट शिकू शकणार नाही. म्हणूनच मला जर्मन शिकण्याचा आग्रह धरण्यात आला."
 
या भीतीमुळं अनेक पालक आपल्या मुलांसमोर एकच भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात. पण याउलट तज्ज्ञांच्या म्हणणं आहे की,मुलं एकापेक्षा अधिक भाषा शिकू शकतात आणि एका पेक्षा अधिक भाषा शिकल्यानं मुलांमध्ये शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती वाढते.
 
प्राध्यापक एनिक डी हावरे सांगते की, "पूर्वी असं सांगायचे की, मुलांना एकापेक्षा अधिक भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते गोंधळात पडतील. परंतु तसं होत नाही.”
 
ती सांगते, "मुलं सुरुवातीला दोन भाषांमधले शब्द वापरत असतील तर त्याचा अर्थ त्यांचं शब्दांचं ज्ञान वाढतंय आणि ते अधिक अचूक शब्द वापरतात असतात."
 
भाषिक अल्पसंख्यांकांची गळचेपी
तज्ज्ञ सांगतात, मातृभाषा बहुतेक वेळा एखाद्याला वारशानं मिळते, माणूस आधी ती भाषा शिकतो, त्याच भाषेतून तो विचार करायला लागतो आणि तीच त्याची ओळख बनते.
 
डॉ.हरी माधव सांगतात,"भारतातील अनेक पालक मुलांना तीच भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतात,जी त्यांच्या राज्याची किंवा शहराची प्रमुख भाषा आहे. बोलीभाषेत बोलल्यास मुलांना घरचे ओरडतात असा अनुभव आहे."
 
डॉ.हरी माधव सांगतात,"याचं मोठं कारण आहे सामाजिक दबाव होय,मुलांनी बोलीभाषेत बोलणं कमीपणाचं समजल जात."
 
देशात वेळोवेळी अशी प्रकरणं घडली आहेत, जेव्हा शाळेत इंग्रजी न बोलता मातृभाषा किंवा बोलीभाषेत बोलल्याबद्दल शिक्षा झाली आहे. भाषेच्या आधारे स्थलांतरित लोकांवर स्थानिक लोकांकडून भेदभाव आणि हिंसाचाराच्या घटना भारतात पाहायला मिळतात. अशा घटनामुळं भाषिक अल्पसंख्यांकांचा आत्मविश्वास ढळू लागतो. म्हणून त्यांचा प्रयत्न असतो की,त्यांची मुलं हिंदी, इंग्रजी किंवा मुख्य भाषेत बोलतील.
 
ज्या भाषाकडे समाजाचा ओढा अधिक आहे.या सामाजिक वृत्तीमुळं हवी ती भाषा शिकण्याच्या आणि शिकवण्याचं स्वातंत्र राहत नाही.
 
बोलीभाषा आणि मातृभाषा लुप्त होण्याची भीती
एखाद्या कुटुंबानं आपल्या भाषेचा त्याग करणं एक लहानस पाऊल वाटतं असलं तरी,त्याचा मोठा परिणाम हा ती भाषा नाहीशी होण्यात होऊ शकतो.
 
डॉ.राय सांगतात,"भाषा जपल्या पाहिजेत,भाषा ही केवळ बोलण्याचं साधन नाही, भाषा ही इतिहास,संस्कृती,परंपरा आणि लोककला सांगतात.भाषा लुप्त झाली तर सामूहिक ज्ञान ही लुप्त होतं."
 
समाजात अनेक भाषा बोलण्यास प्रोत्साहन द्यायला हवं,त्याची सुरुवात ही शाळेपासून करता येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
समाजात अनेक भाषा बोलण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्याची सुरुवात शाळांपासून करता येईल,असं तज्ज्ञांचं मत आहे.वेगवेगळी पार्श्वभूमी असलेली मुलं शाळेत येतात, त्यांच्या भाषेचा आदर केला गेला पाहिजे. त्यामुळं पालकांचा भाषेबाबतचा आत्मविश्वास ही वाढेल.
 
JNU चे हरी माधव राय सांगतात की, भारतातील नवीन शैक्षणिक धोरणात (NEP) प्रादेशिक भाषांना महत्व देण्यात आलंय. किमान पाचवी किंवा आठवी इयत्तेपर्यंत मुलांना मातृभाषेत शिक्षण द्यावं, यावर भर देण्यात आला आहे.
 
धोरणात्मक दृष्टीनं हा निर्णय चांगला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी कशी होती ते पाहावं लागेल.
 
पालकांनी काय करावे?
जपानच्या कैनगावा विद्यापीठातील इंग्रजींचे प्राध्यापक जेनिस नाकामुरा यांनी जपानी कुटूंबांचा अभ्यास केलाय,ज्यात आई आणि वडील या दोघांपैकी एकाची भाषा जपानी नव्हती.
 
या अभ्यासात दिसून आलं की मुलांना आई वडिलांची मातृभाषा येत नसल्याच दुःख होत,तर मुलं ही आपली मातृभाषा बोलू शकत नसल्याची खंत पालकांना होती.
 
प्राध्यापक जेनिस नाकामुरा यांनी भाषा न शिकण्याच्या या खेदाला 'लँग्वेज रिग्रेट' असं म्हटलंय.यामुळं नातेसंबंधातही ताणले गेल्याच दिसून आलं. म्हणून पालकांनी मुलांना इतर भाषेबरोबरच मातृभाषाही शिकवावी.ज्यांना लहानपणी शिकवता आली नाही, त्यांना आता शिकवण्याचा प्रयत्न करावा.
 
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पालकांची मातृभाषा मुलांनी अस्सलिखितपणे बोलणे आवश्यक नाही. काही वाक्य बोलले तरी पालकांना बरं वाटेल.
 
दुसरीकडे इमरान रईस हा बुंदेलखंडी शिकण्याचा प्रयत्न करतोय.
 
तो सांगतो,"त्याचा शब्द संग्रह सध्या मर्यादित आहे,पण काही इंग्रजी आणि हिंदी शब्दांसह मी बुंदेली बोलण्याचा प्रयत्न करतोय."
 
"मला मुलं झाली की त्यांना मी बुंदेली शिकवू शकेलं,म्हणून इमरान बोलीभाषा शिकतोय.जेणेकरून आपल्या मुलांना बुंदेली संस्कृती,भाषा आणि अब्बू अम्मी विषयी काही सांगता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती