दाभोलकरांना न्याय कधी? #जवाब_दो

शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (13:01 IST)
7 वर्षांपूर्वी ती दुर्दैवी घटना घडली... सामाजिक कार्यकर्ते आणि बाबासाहेब आंबेडकर व स्वा. सावरकरांचा बुद्धिवाद जोपासणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या केली गेली. नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा. महाराष्ट्र अंधश्रद्धामुक्त व्हावा यासाठी ते झटत होते. मागे पुण्याच्या एका कॉलेजमध्ये सत्यनारायणाची पूजा आयोजित केली गेली तेव्हा स्वतःस बळजबरी पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांनी त्यास विरोध केला आणि टीव्हीवर चर्चासत्रेही आयोजित केली गेली. एबीप्पी माझावरील एका चर्चासत्रेत अशाच स्वतःस बळजबरी पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या श्रीरंजन आवटे नावाच्या माणसाने म्हटलं की सत्यनारायण घालणे ही अंधश्रद्धा आहे कारण दाभोलकर असं म्हणून गेलेत. दाभोलकरांनी म्हटलं म्हणून ती अंधश्रद्धा हे त्यांचं नरेटिव्ह होतं.
 
ज्या पोथीनिष्ठेच्या विरोधात दाभोलकर लढत होते, त्याच दाभोकरांना या स्वयंघोषित पुरोगाम्यांनी प्रेषित बनवून टाकलं आणि दाभोलकर म्हणाले ते बुद्धीच्या कसोटीवर पारखून न घेता त्यांचं वाक्य प्रमाण मानून स्वतःचा कंड भागवण्यासाठी आणि भारतातील बहुजनांना दुखवण्यासाठी दाभोलकरांचा वापर होऊ लागला... दाभोलकर विचाराने किती मोठे होते याच्याशी या स्वयंघोषित पुरोगाम्यांना काही देणे घेणे नाही.
 
सत्यनारायण पूजेवर दाभोलकरांप्रमाणेच प्रबोधनकार आणि सावरकरांनीही टीका केली होती. पण सावरकर या सगळ्या पुरोगाम्यांच्या 100 पावलं पुढे होते. त्यांनी राष्ट्रीय सत्यनारायण घालायला सांगितला. अंधश्रद्धा या मूळ विषयाकडे करड्या नजरेने पाहिलं तर हिंदूंचे दशावतार, मुस्लिमांचे अल्लाह आणि ख्रिस्त्यांचा येशू सगळीच अंधश्रद्धा आहे असं कठोरपणे म्हणावं लागेल. पण आपण भारतात राहतो, पाकिस्थानात नाही म्हणून दुसऱ्यांच्या श्रद्धेचा आपण आदर करतो. स्वतःला आणि इतरांना त्रास न देणारी श्रद्धा ही अंधश्रद्धा असू शकत नाही. सत्यनारायण पूजेत कुणाला त्रास देण्याचा प्रश्नच नसतो उलट सगळे एकत्र येऊन सामाजिक आणि सांस्कृतिक नाती दृढ करतात. त्यातल्या एका गोष्टीवर आक्षेप घ्यायचा असेल तर इतर धर्माला सुद्धा तोच न्याय द्यावा लागेल, ज्याची हिंमत सयंघोषित पुरोगामी विश्वात मुळीच नाही. त्यामुळे दाभोलकरांनी एखादी गोष्ट म्हटली म्हणून ती सत्य मानणे हा दाभोलकरांचाच अपमान आहे.
 
वरील मुद्दा मी पुरोगामी विश्वातील भंपकगिरी सांगण्यासाठी मांडला की ह्यांना दाभोलकरांशी काही देणं घेणं नाही. त्यांना केवळ त्यांचा अजेंडा चालवायचा आहे. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर स्वयंघोषित पुरोगाम्यांना आनंदाचे उमाळे फुटले कारण त्यांना हिंदू दहशतवाद ही थियरी सिद्ध करता येणार होती. मालेगाव बॉम्बस्फोट आणि कसाबच्या पाकिस्थानी जिहादी हल्ल्याला सुद्धा भगवा रंग देण्याचा या पुरोगामी विश्वाचा कट होता, ज्यात महात्मा गांधींचं नाव घेणारी काँग्रेस सुद्धा सामील होती. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर या पुरोगामी विश्वाने घोषित केलं की त्यांचे हत्यारे भगव्या रंगाचे आहेत. कारण त्यांना दाभोलकरांच्या हत्याराना शिक्षा द्यायची नव्हती तर ते ज्यांना हत्यारे म्हणतील त्यांना शिक्षा दयायची होती. ही मूळ बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. सुशांत सिंह प्रकरणात अर्णबने ज्या प्रकारे शोध पत्रकारिता केली तशी पत्रकारिता पुरोगाम्यांनाही करता आली असती आणि दाभोलकरांना न्याय मिळाला असता. पण त्यांना न्याय नको होता, त्यांना कुणावर तरी अन्याय करायचा होता. म्हणूनच आज 7 वर्षे होऊन सुद्धा दाभोलकरांचे मारेकरी सापडले नाहीत. हा दोष स्वतः पुरोगाम्यांचा आहे.
 
त्यावेळी राज्यात आणि केंद्रात सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसची सत्ता होती. पण गांधी हत्येत सावरकरांना गोवण्याचा जसा प्रयत्न झाला तसा दाभोलकरांचा हत्येबाबत झाला आणि हेच लोक निर्लज्जपणे दर वर्षी जवाब दो म्हणत खोटे अश्रू ढळत असतात. दाभोलकरांचा हत्येसंबंधी अनेक अफवा सुद्धा पसरल्या होत्या, त्यांच्या संस्थेतील फंडबद्दल, त्यांच्या संस्थेच्या वारसा हक्काबद्दल वगैरे वगैरे. पण त्या अफवाच, त्याबद्दल फारसा विचार करण्यात अर्थ नाही तरी त्या दिशेने तपास झाला की नाही याची कल्पना नाही. 2014 ला सरकार बदलले का? कारण या पुरोगामी विश्वावरचा लोकांचा विश्वास उडाला होता. यांचा खोटारडेपणा लोकांना कळून चुकला होता. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची यांची मनीषा ठळकपणे दिसू लागली होती. पण या सगळ्या राजकीय गदारोळात दाभोलकरांचे हत्यारे मात्र आजही मोकाट हिंडत आहेत... कदाचित ते आपल्या आजूबाजूलाच असतील. कसाबच्या हल्ल्यात भगवा आतंकवादी थियरी सिद्ध करण्याच्या नादात, दाभोलकरांच्या हत्येत तीच खोटी थियरी वापरण्याच्या नादात न्याय मिळत नाही त्याचं काय? या प्रश्नाचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? पुरोगामी विश्वाने आणि काँग्रेसने हा हलकटपणा केला नसता तर आतापर्यंत दाभोलकरांचे हत्यारे फासावर लटकले असते आणि हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं आपण अभिमानाने बोलू शकलो असतो. पुरोगामीत्वावर वारसा हक्क सांगणाऱ्या लोकांनी या महाराष्ट्राची दैना केली आहे. पण या सगळ्या गोष्टीत हा प्रश्न त्यांच्या तोंडावर फेकून मारावासा वाटतो, दाभोलकरांना न्याय कधी, जवाब दो...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती