तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय ... ओळख अशी खास नाही पण ' ती ' साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू. आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ' ती ' एकदम वेगळी ... एकमेव सायकलवर येणारी आई.
आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे ... ही त्यापैकी नव्हे. सायकल चालविणे हा कदाचित तिचा नाईलाज असावा . आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो हे त्यांना पटतच नाही.
ती सावळी आरस्पानी ... आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली.... साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची ...... गळ्यात चार मणि हातात दोनच काचेच्या बांगड्या. माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सिटवर तिचा मुलगा .... त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये म्हणून मस्त मउ ब्लॅंकेटची घडी घातलेली.... लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणित असे. लेक निटनेटका ... स्वच्छ कपडे ... बूटांना पॉलिश. तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची .... जणू त्याच शाळेत जाणं ती अनुभवतेय ... जगतेय.
हळूहळू काहीबाही कळायच तिच्या बद्दल.... ती पोळ्या करायची लोकांकडे... फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता की नव्हता कोण जाणे... पण तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE ( right to education ) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली.
एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना पार्किंग मध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली ...
" अग तो बघ तो first आला ना so मी second आले ..." आणि मोठ्यांदा भोकाड पसरल.
मी त्याची paper sheet पाहिली ... मोत्यासारख अक्षर ... अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले " बघ बघ ... याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? " माझे डोळे संताप ओकत होते. त्याची आई शांतपणे म्हणाली " कुणीतरी पहिलं आलय म्हणून तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना! " ..... सणसणीत चपराक. मी निरुत्तर. मी खोचकपणे विचारल "कोणत्या क्लासला पाठवता याला? " ती म्हणाली
" मी घरीच घेते करून जमेल तसं... .. मुलांना नेमक काय शिकवतात ते कळायला हवे ना आपल्याला. " तेव्हाच कळलं हे रसायन काहीतरी वेगळ आहे.
हळूहळू तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली तर कधी मिच मिळवू लागले. ती पाथर्डी गावातून यायची.... सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .
पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले ... तेव्हा भरभरून म्हणाली. ....
" टिचरने खूप कौतुक केले फार सुंदर पेपर लिहिलेत म्हणाल्या..फक्त थोडे बोलता येत नाहीत म्हणाल्या . त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. " मी तिच मनापासून ऐकू लागले ...
" छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले ... अकरावीत असताना मामाने लग्न लावले... शिकायच राहूनच गेल .. फार इच्छा होती हो ! "... डोळ्यात पाणी प्रयासाने रोखून म्हणाली... " आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी... एका teacher शी बोलणं झालय त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात .... बारावीचा फॉर्म भरलाय ... उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको ." म्हणत खळखळून हसलीं. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून ती निघाली.
मुलांना रेसचा घोडा समजणारी "रेस कोर्स मम्मा", सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना नुकतीच पार्लर मधून आलेली वाटणारी "मेकअप मम्मा" , दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी "फिटनेस मम्मा " स्वतः पोस्ट ग्रज्युवेट असूनही नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी "बिझी मम्मा" किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी
" जोहरी मम्मा " ... ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला.........या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक " आई " भेटली. अशी आई जी एक स्त्री म्हणून.... माणूस म्हणून... आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे... कणखर आहे. फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात... सायकलवाली आई त्यातलीच एक .....