Tipu Sultan Death Anniversay: टिपू सुलतान रॉकेट तंत्रज्ञान, बिनव्याजी बँका, साखर कारखाने ते आरमारांचा निर्माता

गुरूवार, 4 मे 2023 (09:41 IST)
सरफराज अहमद
लंडनच्या लिडनहाल स्ट्रीटवर ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होते. टिपू जोपर्यंत हयात होता, तोपर्यंत लिडनहाल स्ट्रीटसाठी म्हैसूर हे धडकी भरवणारे आणि कंपनीच्या अस्तित्त्वाला हादरे देणारे भारतातील महत्वाचे केंद्र होते, असे मत प्रसिद्ध इतिहासकार बी. शेख अली यांनी मांडले आहे.
 
बी. शेख अली यांच्या विधानाचा अर्थ काही घटना आणि समकालीन कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होऊ शकेल.
 
टिपू सुलतानने आपल्या राजकीय धोरणात सामान्य माणासाला सामावून घेण्याचे धोरण आखले होते. त्याने व्यापाराच्या माध्यमातून सामान्य रयतेच्या प्रगतीची योजना आखली होती. भारतातील उत्पादनावर आणि जगभरातील बाजारपेठेवर त्याची नजर होती.
 
स्वदेशी वस्तूंच्या वापरासंदर्भात आणि परदेशी व्यापाऱ्यांवरील बहिष्कारासंदर्भात कालिकतच्या फौजदाराला त्याने आदेश दिले होते. त्या आदेशात तो म्हणतो, ‘तेथील जनतेला आणि व्यापाऱ्यांना तू सांगितले पाहिजेस, इंग्रज व्यापाऱ्यांना कोणतेही माल विकू नये आणि त्यांच्याकडून कोणतेही माल खरेदी करु नये. त्यामुळे इंग्रज व्यापाऱ्यांचा इथे निभाव लागणार नाही.’
 
शेतमाल जगभरात विकण्यासाठी व्यापारी कंपनीची स्थापना
नुसत्या परदेशी वस्तूंच्या वापरांना आळा घालून टिपू थांबला नाही, तर त्याने सामान्य शेतकऱ्यांमध्ये जागतिक बाजारपेठेविषयी जागरुकता निर्माण केली.
 
व्यापारी कंपनीची स्थापना करुन त्यात रयतेला सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्या कंपनीत लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी आवाहन केले.
 
कंपनीचा जो हुकुमनामा त्याने काढला होता. त्यात तो म्हणतो, “सल्तनत-ए-खुदादादच्या रयतेला कोणत्याही धर्म आणि वर्णभेदाशिवाय व्यापारात सहभागी होऊन नफा मिळवण्याबाबत आदेश दिला जात आहे. रयतेतील जी व्यक्ती 5 ते 500 इमामीपर्यंत रक्कम व्यापारात लावण्यासाठी जमा करेल, त्याला वर्षाच्या अखेरीस त्याच्या स्वतःच्या रकमेसह प्रत्येक इमामीच्या बदल्यात अर्धा इमामी म्हणजे मुळ गुंतवणुकीच्या शेकडा पन्नास टक्के नफा दिला जाईल. जी व्यक्ती 500 ते 5,000 इमामी गुंतवेल, त्याला 25 टक्के, जी व्यक्ती 5,000 इमामीपेक्षा आधिक रक्कम जमा करेल, त्याला 12.5 टक्के नफा दिला जाईल.’’
 
याचा अर्थ टिपू सुलतान गरीबांना आर्थिक सक्षमता प्रदान करुन राज्यात आर्थिक समता प्रस्थापित करु इच्छित होता.
 
टिपू सुलतानने मस्कत, बहरीन, कतर, इराक, इराण, तुर्कस्तानसह जगातील अनेक देशात आपली व्यापारी केंद्रे स्थापन केली होती.
 
म्हैसूरमध्ये आपल्या कंपनीच्या एजंटांद्वारे जे माल जमा केले जाई. त्यावर प्रक्रिया करून टिपू तो माल मोठमोठ्या जहाजांवर लादून जागतिक बाजारपेठेत नेऊन विकत असे. त्यातून कंपनी आणि म्हैसूरच्या शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळत असे.
 
म्हैसूरला ‘सिल्कसिटी’ करणारा टिपू
टिपूने जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून परदेशातील अनेक पिके भारतात आणण्याचा प्रयत्न केला. ही पिके म्हैसूरमध्ये उगवता, यावी यासाठी टिपूने संशोधन सुरु केले.
 
लालबाग नावाची कृषी प्रयोगशाळा स्थापन केली. तेथे या पिकांचे पहिले उत्पादन घेतले जाई व त्यानंतर त्याची बिजे शेतकऱ्यांना वाटली जात होती.
 
टिपू सुलतानने राज्यात शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे अनेक कारखाने सुरु केले होते. जगातल्या वेगवेगळ्या भागातून रेशीमकिडे आणून त्याचे संगोपन सुरु केले. त्यातूनच म्हैसूर सिल्कसिटी म्हणून जगात नावारुपाला आले.
 
इतिहास संशोधक आणि प्रसिद्ध लेखक इरफान हबीब म्हणतात, ‘टिपूच्या दुरदृष्टीचे एक उदाहरण म्हैसूरमध्ये रेशीम उत्पादनाची सुरुवात होती. जे पुढील काळात एक यशस्वी उद्योगाच्या रुपात विकसित झाले. तुतीची झाडे लावण्याची कामे निवडक शेतकऱ्यांना व तालुकेदारांना सोपवण्यात आली. रेशीमच्या किड्यांचे संगोपन व जतन करण्यासाठी राज्यात 21 केंद्रे स्थापन करण्यात आली होती.’’
 
साखरेबाबतच्या स्पर्धेत जगात पहिला क्रमांक
श्रीरंगपट्टणमजवळ पालहल्ली आणि चिन्नपट्टणम या शहरांमध्ये दोन साखर कारखान्यांची निर्मिती केली होती. त्यातील एका साखर कारखान्याचे नाव ‘श्री अष्टग्रामा शुगर मिल्स’ असे होते. त्यातून उत्पादित साखर जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जात असे.
 
टिपूच्या साखर कारखान्यातील साखर 1803 पर्यंत जागतिक पातळीवर झालेल्या जागतिक साखर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर होती.
 
टिपूने राज्यातील कृषिक्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्याने काझींना दिलेला हुकुमनामा अतिशय महत्वाचा आहे.
 
त्यात तो म्हणतो, “काझीने आपल्या प्रदेशात जनगणना करुन पुरुष, स्त्री आणि लहान मुले यांची सर्व माहिती गोळा करावी. त्यांची उत्पन्नाची साधने कोणती आहेत ते देखील पहावे. कोणी बरोजगार असेल तर त्यांना सरकारकडून पन्नास ते शंभर रुपये मिळवून द्यावेत आणि कामावर लावावे. शेती करणाऱ्या व्यक्तींनी काही कारणाने शेती सोडली असेल, बेरोजगार झाले असतील तर प्रत्येकाला दोन नांगर आणि बैलांसोबत कृषी खर्चासाठी 20 ते 30 रुपये द्यावेत.”
 
‘शेती करेल त्याला करमाफी’
याशिवाय टिपूने कावेरी नदीवर मही धरण बांधण्याची योजना आखली होती. ‘या धरणाचे पाणी घेऊन जो शेतकरी शेती करेल त्याला कर माफ’ करण्यात येईल अशीही घोषणा या धरणाच्या कोनशिलेत करण्यात आली होती.
 
ही कोनशिला कृष्णराजसागर धरण बांधत असताना 1911 साली खोदकामात सापडली. या कोनशिलेवर 12 जून 1798 ची तारीख नोंदवलेली आहे. ही कोनशिला कृष्णराजसागर धरणाच्या प्रवेशद्वारात लावण्यात आली आहे.
 
टिपू सुलतानने राज्यात बिनव्याजी बँका स्थापन केल्या. त्या बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले. त्याशिवाय या बँका शेतकऱ्यांना शेळ्या व अन्य गरजेच्या वस्तू देखील पुरवत असत.
 
अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती
हैदर अली आणि टिपू सुलतान दोघांनीही म्हैसूरच्या सैन्याचे आधुनिकिकरण करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी फ्रेंचांची आणि इतर मित्रांची मदत घेऊन युरोपी शस्त्रांची म्हैसूरमध्ये निर्मिती करण्याची योजना आखली. त्यातून अनेक नव्या शस्त्रांचा शोध लावण्यातही टिपू सुलतानला यश आले होते.
 
1787 साली टिपूने आपल्या फ्रान्सला जाणाऱ्या राजदूतांना आपल्या कारखान्यात बनवलेल्या बंदुका सोबत नेण्यास सांगितले.
 
विशेषतः फ्रान्सच्या राजाला हे सुचित करायला सांगितले की, आपल्याकडे अशा बंदुका बनवणारे दहा कारखाने आहेत. ज्यामध्ये हजारोंच्या संख्येत बंदुका बनवल्या जात आहेत.
 
इरफान हबीब लिहितात, “टिपूच्या कारागीरांकडून बनवलेल्या बंदुका पाहून 1786 मध्ये पाँडेचरीच्या गव्हर्नर कोसिनीने या बंदुका युरोपीयन बंदुकांपेक्षा चांगल्या दर्जाच्या असल्याचे म्हटले होते. 1788 मध्ये 16 व्या लुईला जेव्हा या बंदुका भेट दिल्या त्यावेळी त्यानेही अशाच पद्धतीचे मत मांडले होते.”
 
टिपूने शस्त्रास्त्रनिर्मिती कारखान्यांची क्षमता वाढवण्यासाठी निरनिराळे प्रयोग करुन पाहिले. कर्नल कर्क पेट्रीक याने टिपू सुलतानचे पत्रे भाषांतरीत केली आहेत. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती त्याने दिली आहे.
 
तो लिहितो, ‘श्रीरंगपट्टणम येथील बंदुकीच्या कारखान्यातील कुल्ले पाण्याच्या दाबावर चालत होती. या कारखान्यात अशी एक मशीन होती, जी पुर्णतः जलसंचलित होती. या मशिनद्वारे बंदुक आणि तोफेच्या नळीला भोके पाडली जात होती. टिपूने अनेक यंत्र बनवले होते. त्यात घड्याळ, खेळणी वगैरेंचाही समावेश होतो. टिपूचे एक स्वयंचलित खेळणे आजही अभ्यासकांच्या आकर्षणाचा केंद्र आहे. त्या खेळण्याला चावी दिल्यानंतर त्यातील वाघाच्या तोंडून डरकाळ्या बाहेर निघतात. तर इंग्रज सैनिकाच्या तोंडून विव्हळण्याचा आवाज बाहेर पडतो.’
 
रॉकेटचे तंत्रज्ञान
भारतात तोफेचा वापर तुर्कांनी सुरु केला. तर अग्निबाणाचा वापर अकबराच्या काळात सुरु झाल्याचे मानले जाते. काहींनी अग्निबाणाच्या निर्मितीचा काळ आणखी मागे नेला आहे. पण टिपू सुलतानने निर्माण केलेल्या रॉकेटचे तंत्रज्ञान सर्वात आधुनीक होते.
 
त्यापूर्वी 100 मीटरहून आधिक अंतरावर जाऊन स्फोट होणाऱ्या कोणत्याही शस्त्राचा वापर भारतात वा जगात कुठेही झाला नव्हता.
 
डॉ. शिव गजरानी यांनी टिपूच्या रॉकेट तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. ते लिहितात, “टिपूने त्याच्या फतुहाते मुजाहीदीन या ग्रंथात रॉकेटविषयी लिखाण केले आहे. त्याच्याकडे 200 प्रशिक्षित सैनिकांची रॉकेट चालवणारी एक तुकडी होती. त्याला कुशून ब्रिगेड असे म्हणत. टिपूने बनवलेल्या रॉकेटची लांबी 11/2-3 डायमिटर इतकी होती. लोहनळीचा वापर करुन रॉकेटची निर्मिती करण्यात आली होती. 100 मीटरवर गेल्यानंतर या रॉकेटचा प्रचंड स्फोट होत असे. 6 फेब्रुवारी 1792 साली कावेरीच्या दक्षिणेत इंग्रज फौजांवर या रॉकेटचा मारा करण्यात आला होता. म्हैसूर ताब्यात आल्यानंतर इंग्रजांना 600 रॉकेट लाँचर, 700 तयार रॉकेट, 9,000 रिकामे रॉकेट मिळाले होते.’’
 
याच रॉकेटचा वापर पुढे नेपोलियन विरोधातील युद्धात करण्यात आला. त्यामुळे नेपोलियनचा पराभव झाल्याचे मत इलियास नद्वी भटकली यांनी मांडले आहे.
 
जहाजनिर्मिती आणि आरमार
टिपू सुलतानने सैन्याची रचना जगात सर्वोत्तम पध्दतीने केली होती. त्याने लिहीलेल्या ‘फतुहात ए मुजाहीदीन’ या ग्रंथात याची सविस्तर माहिती मिळते.
 
टिपूने सैनिकांच्या आणि आधिकाऱ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना जबाबदारी दिली होती. अंतरराष्ट्रीय राजकारणात टिपूला सर्वाधिक रस होता. त्यामुळे जगभरातील भाषांचे शिक्षण काही सैनिकांना देण्यासोबतच अंतरराष्ट्रीय जलमार्गाचा वापर करण्यासाठी आधुनिक जहाजांची निर्मितीही त्याने केली होती.
 
टिपू सुलतानच्या आरमारात 10 हजार सैनिक कार्यरत होते. 1796 मध्ये टिपूने चाळीस लष्करी जहाज बांधण्याचे आदेश दिले होते.
 
जमालाबाद, वाजीदाबाद आणि मजिदाबाद अशा तीन कचेऱ्यांमध्ये टिपूचे जहाज कार्यरत होते. जमालाबाद कचेरीत 12 आणि इतर दोन कचेऱ्यांमध्ये प्रत्येकी 14 जहाज होते.
 
इरफान हबीब लिहितात, “प्रत्येक लष्करी जहाजावर 346 लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. 20 लष्करी जहाजांवर 6920 लोक कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांना पाच मुख्य श्रेण्यांमध्ये विभागण्यात आले होते. बंदूक चालवणारे, तोफची, मल्लाह, कारागीर शर्बशरान, नफकीरनवाज (नफकीर वाजवणारे), शहनाई नवाज (वाद्यवादक), युजदार (लेफ्टनंट), सरखेल (सेकंट लेफ्टनंट), जमादार (सर्जंट ) आणि शिपाई यांचा समावेश असायचा.”
 
टिपूचे आरमार अतिशय प्रगत होते. त्याचे हे प्रगत आरमार प्रशिक्षित सैनिकांवर आधारित होते.
 
आरोग्य सेवा
टिपू आरमाराच्या सैनिकांनाच नाही तर भुदळ, घोडदळाच्या सैनिकांनादेखील विशेष प्रशिक्षण द्यायचा त्यांच्या कवायतींकडे स्वतः लक्ष पुरवायचा. सैनिकांच्या आरोग्याकडे त्याचे विशेष लक्ष असे. तो स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक असल्याने त्याने अनेक सैनिकांचे उपचार केल्याची पत्रे उपलब्ध आहेत.
 
24 मे 1786 रोजी टिपूने लिहीलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात त्याने दौलतखान नावाच्या एका आधिकाऱ्यावर मुतखड्याच्या उपचारासाठी कोणकोणती औषधे पाठवली ते नमूद आहे. त्याशिवाय 12 सप्टेंबर 1785 च्या पत्रात किशनराव नावच्या आधिकाऱ्याला पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर करावयाचे उपचार व औषधांची माहिती दिली आहे.
 
टिपूने जामिआ अल उमूर नावाचे जे विद्यापीठ स्थापन केले होते, त्यात युनानी प्रयोगशाळा स्थापन केल्याची माहिती मिळते. त्याशिवाय खास वैद्यकीय शिक्षणासाठी युरोपियन सर्जन ठेऊन घेतल्याची माहिती देखील उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त शाही हकिमखान्यातून सामान्य नागरीकांना औषधे मिळतील याची व्यवस्था देखील टिपूने राज्यभरात निर्माण केली होती.
 
बॅरोमिटर नावाचे एक यंत्र युरोपात वापरले जात होते. ज्याचा तापमापीसारखा वापर व्हायचा. त्यावर आधारीत एक पुस्तक लंडनमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.
 
28 डिसेंबर 1786 रोजी लिहीलेल्या पत्रात टिपू म्हणतो, “युरोपमधून एक पुस्तक बॅरोमिटरच्या संदर्भात प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे माहिती मिळाली की, विशिष्ट वातावरणात बॅरोमिटरचा पारा विशिष्ट डिग्रीवर पोहोचतो. अशावेळी एका रुग्णाने त्याच्यावर हात ठेवल्यास रोग कोणत्या स्तरावर आहे याची माहिती मिळेल. या पुस्तकाचे फारसीत भाषांतर करुन पाठवावे.”
 
कालांतराने टिपूने या बॅरोमीटरचे काही नमुनेदेखील मागवून घेतले होते. त्याशिवाय टिपूने पेशव्यांना हिजामा या रक्तशुद्धी प्रक्रियेची माहिती देऊन एका दुर्धर आजारातून त्यांना मुक्ती मिळवून दिल्याचेही एका पत्रावरुन स्पष्ट होते.
 
टिपूचे ग्रंथालय, पुस्तकांचे लेखन
टिपू सुलतान उत्तम वाचक होता. त्याच्या समृद्ध अशा वैयक्तीक ग्रंथालयाकडे पाहिल्यानंतर याची खात्री पटते.
 
1799 मध्ये टिपू सुलतानची राजवट अस्ताला गेल्यानंतर इंग्रजांनी त्याचे राजमहाल लुटले. त्यावेळी टिपूचे हे ग्रंथालयदेखील त्यांच्या हाती लागले. ही पुस्तके ताब्यात घेऊन इंग्रजांनी ती कोलकत्त्याला पाठवली तेथे फोर्ट विल्यम महाविद्यालयात आणि एशियाटीक सोसायटीत ते ग्रंथ ठेवण्यात आले.
 
कालांतराने फोर्ट विल्यम महाविद्यालय बंद पडल्यानंतर हे ग्रंथ केम्ब्रीज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात पाठवण्यात आले. आजही हे ग्रंथ तेथेच आहेत.
 
1809 मध्ये चार्लस स्टुअर्ट याने टिपूच्या ग्रंथालयाविषयी ‘Desprective Catlog Of The Oriental Library Of The Late Tipu Sultan Of Mysore’ हे पुस्तक लिहीले आहे.
 
टिपू सुलतानने ग्रंथालयासोबतच अनेक विद्वानदेखील आपल्या पदरी बाळगले होते. सुफी साहित्य, अरबी काव्य, तुर्की आणि इराणी शायरी, कुरआन आणि तत्वज्ञान अशा अनेक विषयांवर तो त्यांच्याशी चर्चा करायचा. टिपू सुलतानने स्वतः आणि विद्वानांच्या मदतीने अनेक पुस्तकांचे लेख केले होते. काही विषय इतरांना सुचवून ते लिहून घेतले होते.
 
जेकोबियन क्लबची स्थापना
फ्रान्सकडून प्रेरणा घेत टिपू सुलतानने 1797 मध्ये श्रीरंगपट्टणम येथे जेकोबियन क्लबची स्थापना करण्यात आली. त्यातून फ्रान्स आणि सिटीझन ऑफ टिपू मध्ये मैत्रीचा करार करण्यात आला. ही घटना अंतरराष्ट्रीय पातळीवरील राज्याच्या आधुनिक स्वरुपातील रचनेसाठी जे प्रयत्न सुरु होते, त्यात महत्वपूर्ण मानली जाते, असे शिव गजरानी यांनी म्हटले आहे.
 
तर इरफान हबीब म्हणतात, “सिटीझन ऑफ टिपू’च्या गणराज्याचे ध्वजारोहण करुन 2300 तोफांची सलामी देण्यात आली. स्वातंत्र्याचे रोप लावण्यात आले. ही घटना भारताच्या भूमीवर स्वातंत्र्य आणि समानतेच्या घोषणेच्या स्वरुपात नेहमी लक्षात राहील.”
 
टिपूचे राज्य हे दिवसागणिक आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत होते. अंतरराष्ट्रीय राजकारणावर बारीक लक्ष ठेऊन तो धोरणे आखत होता. लष्करात बदल करत होता. सामान्य रयतेमध्ये आपल्याविषयी विश्वास निर्माण करुन त्यांना नवा आशावाद दाखवत होता. त्यामुळेच टिपूचे राज्य लिडनहाल स्ट्रीटवरील ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयासाठी डोकेदुखी ठरले होते.
 
त्यामुळेच 4 मे 1799 ला टिपू मारला गेल्यानंतर 1800 साली एका समारोहाचे आयोजन करुन इंग्रजांनी आता भारत आपला असल्याची घोषणा केली होती.
 
(सरफराज अहमद हे मध्ययुगीन दख्खनच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. तसंच, 'गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर'चे सदस्य आहेत.)
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती