राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती विशेष

बुधवार, 13 जानेवारी 2021 (12:24 IST)
राजमाता जिजाऊ म्हणजे शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान आणि वीर माता. ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक श्रीमंत शिवाजी महाराजांच्या मातोश्री होय. ह्यांना जिजामाता, जिजाऊ, राजमाता, आणि माँ साहेब अश्या नावांनी पण संबोधित करत असे.
 
ह्यांचे माहेर बुलढाणा जिल्हातील सिंदखेडचे जाधव कुटुंबियातील असत. ह्यांचा वडिलांचे नावं लखुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. ह्यांचे कुटुंब देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज असे.
 
ह्यांचा विवाह 1605 साली शहाजीराजेंशी दौलताबाद येथे झाला. ह्यांना एकूण 8 अपत्ये झाली. 6 मुली आणि 2 मुले. थोरल्या मुलाचे नाव त्यांनी आपल्या दिरांच्या नावावर संभाजी ठेवले. संभाजी शहाजीराजांकडेच वाढले. मात्र शिवाजी महाराजांना ह्यांनीच वाढविले.
 
19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचें नावं ठेवले शिवाजी. जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. त्यांना राजनीतीचे सखोल ज्ञान ही दिले. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले.
 
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याचे बघून राज्याभिषेकाच्या 12 दिवसांनी 17 जून इ.स 1674 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रायगढ़च्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात जिजामातांची समाधी आहे.
 
त्यांच्या मनात असलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रात्यक्षिक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन,आणि पराक्रम अश्या सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या अश्या ह्या राजमाता होत्या.
 
पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतकऱ्यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदाऱ्या पार पाडताना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडण कडे देखील बारकाईने लक्ष देत होत्या.
महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील आहे हे राजमाता जिजाऊंना बघून लक्षात येते.
 
जिजाबाईंनी इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, जे मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरले. जिजाबाई एक हुशार आणि कर्त्यव्यनिष्ठ स्त्री होत्या. आयुष्यभर अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्याने संयम ठेवून योग्य निर्णय घेतले. जिजाबाई शिवाजींना प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रेरणा द्यायच्या. त्याच्या प्रेरणेने शिवाजींनी स्वराज्यप्राप्तीचा निर्णय घेतला. त्यावेळेस शिवबा अवघे वय वर्ष 17 चे होते.
 
शिवाजी महाराजांसारखे महान शासक घडविण्यासाठी जिजाऊंचे महत्वपूर्ण योगदान आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती