गुंतवणूक, प्रेमसंबंध आणि नोकरीचा निर्णय घेताना तुम्ही उपाशी नाही ना हे आधी तपासा, कारण...

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (21:58 IST)
डायट हा शब्द आजकाल नेहमीच कानावर आदळतो. अनेक सेलेब्रिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या डायटच्या जाहिराती करताना दिसतात. डायट इंडस्ट्रीचा व्यवहार सध्या अब्जवधी डॉलर्सपर्यंत जाऊन पोचलाय.
 
पण डायट करणाऱ्या माणसाला काय एवढं भारी वाटत नसतं हे सत्य आहे.
 
एका अभ्यासात जवळपास 2000 लठ्ठ माणसांचा अभ्यास केला गेला. हे लोक वेगवेगळ्या प्रकारचे डायट करत होते. यापैकी 80 टक्के लोकांना डिप्रेशनची लक्षणं होती.
 
भूक लागणं किंवा भूकेलं असणं याचा सरळ परिणाम आपल्या मेंदूवर होतो.
 
अभ्यासाअंती समोर आलंय की भुकेलं असण्याचा आपल्या भावनांवर, निर्णयक्षमतेवर तसंच आकलन क्षमतेवर खूप मोठा परिणाम होतो.
 
प्रश्न फक्त डायटचा नाहीये. भूक ही गोष्ट जगात असमानता आणते. आजही असंख्य गरीब लोक उपाशीपोटी झोपतात कारण त्यांना अन्न परवडत नाही. पण जर वेळेवर खायला मिळालं तर माणसाची आकलन क्षमता सुधारते.
 
भारतातलंच उदाहरण द्यायचं झालं तर मध्यान्ह भोजन कार्यक्रमामवर झालेल्या एका अभ्यासात लक्षात आलं की दुपारचं जेवण शाळेत मिळायला लागल्यापासून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता 13 ते 16 टक्क्यांनी वाढली.
 
जर तुमची सततची उपासमार होत असेल तर तुमचा मेंदू नीट काम करू शकत नाही ते तर सर्वश्रुत आहे. पण रोजच्या आयुष्यातही भुकेल्या पोटी आणि भरल्या पोटी तुमचे निर्णय, आकलन वेगवेगळं असतं का?
 
भुकेलं असताना तुमच्या मनात नकारात्मक भावना येतात. तुम्हाला उल्हासित वाटत नाही. 2022 साली झालेल्या एका अभ्यासात नेदरलँड्सचे मानसशास्त्रज्ञ निंके जोंकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 129 महिलांचा अभ्यास केला. त्यापैकी निम्म्या महिलांना 14 तास उपास करायला लावला होता.
 
त्यानंतर केलेल्या निरीक्षणात आढळून आलं की ज्या महिला उपाशी होत्या त्यांच्यात जास्त प्रमाणात नकारात्मक भावना होत्या. त्यांच्यावर जास्त ताण होता, त्यांच्यात जास्त राग होता, त्या जास्त प्रमाणात थकलेल्या होत्या आणि गोंधळेलल्या होत्या.
 
त्यांना उत्साह वाटत नव्हता आणि त्यांच्यात सकारात्मक भावना खूपच कमी होत्या.
 
अर्थात भूक फक्त आपला मूड खराब करते असं नाही तर भुकेलं असताना आपण आपला सारासार विचार हरवून बसतो आणि इतरांवर राग काढतो किंवा त्यांना शिक्षा द्यायला जातो.
 
अशाच प्रकारचा एक अभ्यास इस्रायलमध्ये झाला होता. 2011 साली जामीन देणाऱ्या न्यायधीशांचा अभ्यास इस्रायलमध्ये करण्यात आला होता.
 
या अभ्यासात लक्षात आलं की सकाळी पहिल्या तासात आणि दुपारच्या जेवणानंतर लगेचच हे न्याशाधीश त्यांच्या समोर आलेल्या आरोपींना थोडी दया दाखवायचे. त्या तुलनेने दुपारच्या जेवणाआधी आणि संध्याकाळी दिवस संपताना त्यांचे निर्णय कठोर असायचे.
 
यातून असा निष्कर्ष काढला गेला की सकाळी नाश्ता करून आलेले असताना आणि दुपारच्या जेवणानंतर त्यांच्यात सकारात्मक भावना तयार होऊन ते थोडी दया दाखवायचे, पण उपाशी असताना मात्र ते कठोर शिक्षा देण्याचा मार्ग पत्कारायचे.
 
अर्थात या अभ्यासावर नंतर टीका झाली आणि असंही म्हटलं गेलं की न्यायदानाच्या प्रक्रियेत इतरही घटक महत्त्वाचे असतात, उदा – केसेसचं वेळापत्रक कसं आहे इत्यादी.
 
पण तरीही विज्ञानाने ही गोष्ट मान्य केलीये की उपाशी असताना माणूस जगावर संतापतो, आणि शिक्षा द्यायला जातो.
 
भूक मेंदूचा आणि पर्यायाने शरीराचा ताबा घेते. असं का होतं, यामागे उत्क्रांतीची कारणं आहेत असं शास्त्रज्ञांना वाटतं.
 
“जर शरीरात पोषणमुल्यांची कमतरता असेल तर नुस्तं बसून राहाण्यापेक्षा बाहेर जाऊन अन्न शोधण्याचं काम करणं मेंदूसाठी आवश्यक आहे. त्यामागे जगण्याची आणि तगण्याची प्रेरणा आहे,” मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोसायंटिस्ट क्रिस्टन लिंडक्वीस्ट म्हणतात.
 
शरीराला अन्नाचा पुरवठा कमी झाला तर तुमच्या आकलनशक्तीवर थेट परिणाम होतो. दुसरं म्हणजे तुम्ही दूरचा विचार करत नाही. भविष्यासाठी तरदूत करत नाही. तुम्हाला फक्त ‘आज, आता’ हीच काळाची परिभाषा समजते.
 
यूकेच्या डंडी विद्यापीठात एक प्रयोग झाला होता. त्यात भाग घेणाऱ्यांना एकतर 20 पाऊंडचं बक्षीस किंवा 20 गाणी डाऊनलोड करून मिळणार होती. आणि जर ते वाट पाहायला तयार असतील तर त्यांना भविष्यात याच्या दुप्पट रक्कम मिळणार होती.
 
जे लोक भुकेले होते, ते भविष्याचा विचार करायला तयार नव्हते, त्यांच्या मनातच ते आलं नाही. त्यांनी तातडीने बक्षीस घेतलं. जे लोक भुकेले नव्हते, ते मात्र 20 ते 90 दिवस थांबायला तयार होते.
 
याचाच अर्थ असा की भूक तुम्हाला ‘आताची तजवीज करायला लावते, भविष्याचा विचार करण्यासाठी संधी देत नाही.’
 
अन्नाच्या कमरतेमुळे आकलनशक्तीवर तर परिणाम होतोच पण एकाच वेळेस वेगवेगळी कामं करण्याची तुमची क्षमता तुम्ही हरवून बसता.
 
हा अनुभव तुम्हालाही आला असेल की खूप भूक लागली असताना खाद्यपदार्थांचे विचार तुमच्या मनात घोळतात. डोळ्यासमोर कधी पनीर पसंदा, कधी कांदा भजी, कधी नुडल्स तर कधी आईस्क्रीम दिसतं.
 
हे होतं कारण तुमची भूक तुमच्या मेंदूवर ताबा मिळवून फक्त अन्नाच्या संबधीत सिग्नल द्यायला लागते – की आता अन्नाची तजवीज करा.
 
भूक लागली असताना तुम्हाला खाण्याचे विचार सोडून दुसरं सुचत नाही ते याचमुळे.
 
आता या आधुनिक जगात, विशेषतः पाश्चिमात्य देशात भूक लागली असताना अन्नाच्या शोधात बाहेर भटकण्याची गरज नाही पण मानवी शरीरात हजारो वर्षांपासून जी यंत्रणा बसवली गेली आहे ती काम करणं बंद करत नाही.
 
अर्थात या यंत्रणेचे तोटेही होऊ शकतात. जान रूमेल जर्मनीच्या हाईडेलबर्ग विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ते म्हणतात, "भूक लागली असताना आपण लक्ष केंद्रीत करू शकत नाही. विचार इकडे तिकडे भटकत राहातात आणि हातातलं काम नीट होत नाही."
 
ते पुढे सांगतात, “जेव्हा लोकांचे विचार इकडे तिकडे धावायला लागतात तेव्हा त्यांच्या हातातल्या कामाचा दर्जा खालावतो. आता हाती असलेलं काम अवघड असेल, जास्त लक्ष केंद्रित करून करावं लागत असेल तर ते काम बिघडतं. उदाहरणार्थ पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहायचा असेल तर ते काम नक्कीच बिघडेल. पण कपड्यांना इस्त्री करायची असेल तर मात्र ते काम मन भरकटलं तरी करता येईल.”
 
कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने काम करत राहातो, आपल्या लक्षातही येत नाही की ही पद्धत चुकीची आहे, या ऐवजी दुसऱ्या पद्धतीने करत राहावं. अशावेळेस तुम्हाला भूक लागली असल्याची शक्यता नक्कीच जास्त असते.
 
याचच अर्थ सेक्सच्या विचाराने जेवढं लक्ष विचलित होतं त्याहीपेक्षा जास्त लक्ष भुकेने विचलित होतं.
 
जॉन पार्किन्सन यूकेच्या बँगोर विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ आहेत. ते म्हणतात, “अशा वेळेस जर तुम्ही काही समस्या सोडवत असला तर तुम्ही सारासार विचार करून निर्णय घेण्यापेक्षा, तात्पुरते, तकलादू आणि सोपे निर्णय घेऊन मोकळे होता. तुम्ही अशावेळी पक्षपातीही होता”
 
म्हणजे जर तुम्ही डायट करत असाल, तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही खरेदीला गेलात तर हमखास जंक फूड विकत घेऊन येता.
 
भूक एक अत्यंत शक्तीशाली सिग्नल आहे ज्यामुळे आपण उत्क्रांतीच्या ओघात तगून राहायला शिकलो. पण हीच भूक आपल्या विचारशक्तीत बाधा आणते. आपण चिडचिड करतो, इतरांना शिक्षा द्यायला जातो, मलूल होतो, उदास होतो आणि पक्षपातीही. जर या भावनांना वेळेच्या वेळी आवर घातला नाही तर त्या आपलं आयुष्य आणखी कठीण करू शकतात.
 
त्यामुळे आपल्या भुकेची जाणीव असणं कधीही चांगलं. पुढच्या वेळी जर तुमचा संताप संताप झाला असेल तर स्वतःला विचारा की खरंच राग आलाय की भूक लागलीये.
 
आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना उपाशीपोटी घेऊ नका. एखादी महत्त्वाची गुंतवणूक करताय, आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करताय किंवा नोकरीचा राजीनामा लिहिताय, तर आधी पोटात पडलं आहे ना याची खात्री करा. अर्थात भुकेपेक्षा जास्तही खाऊ नका, तेही शरीरासाठी हानिकारच आहे.
 
आणि हा, जर तुमचं वजन आटोक्यात असेल, तुम्ही आरोग्याचे निकष लावून फिट असाल तर उगाच इंच इंच लढवून वजन कमी करू नका. काय उपयोग अशा बीच बॉडीचा जी तुम्ही कमवाली तर आहे, पण त्यात तुम्ही डिप्रेस आहात आणि कशाचा आनंदच घेऊ शकत नाही.
 
(मिरियम आणि मॅट विज्ञान पत्रकार आहेत आणि ‘आर यू थिंकिंग क्लिअरली’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती