कुठे कुठे लक्ष ठेवायचं?

मुलांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये एखादा न्यूड फोटो काढला किंवा त्यांना त्यांच्या फोनवर कुणी एखादा तसला फोटो पाठवला, तर त्याचा अलर्ट पालकांना मिळणार आहे. सेल्फी किंवा फोटो डिटेक्टिंग करणारं अॅप विकसित करण्यात आले आहे. तसंही आजकाल घरादारात मुलांकडे लक्ष द्यायला कुणी नसतं. लाइफस्टाईलच अशी झालीय की आईबाबा आणि मुलांची भेट होणं अशक्य झालंय. सगळे घरात असले तरी बोलणं खुंटलंय, जो तो आपापल्या स्क्रिनवर. स्क्रीनमुळे निर्माण झालेला हा प्रॉब्लेम सोडवायला आता स्क्रीनच सरसावलीय...   
 
अगदी लहान वयापासून मुलांच्या हातात मोबाईल येऊ लागलाय. बालमानस शास्त्रज्ञांनी आणि नेत्र तज्ज्ञांनी धोक्याच्या शेकडो घंटा वाजवूनही, पालक त्याबाबत काहीच करू शकत नाहीत. मुळात मुलांच्या हातात मोबाईल देणारे पालक निर्बुद्ध किंवा मुलांच्या बाबतीत असंवेदनशील असतात असं नाही. कामधंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा घरगुती अडचणींमुळे, विभक्त कुटुंबपद्धती स्वीकारलेल्या पालकांना त्यावाचून पर्यायही नाही. मुंबई आणि उपनगरात तर बऱ्याचदा घरंच इतकी छोटी असतात की लग्नाआधीच दुसरी जागा बघून ठेवावी लागते. विभक्त कुटुंब म्हणजे प्रत्येकवेळी सासुरवास नको म्हणून घराबाहेर पडलेली सून, असं जे चित्र रंगवलं जात त्यात फारसं तथ्य नाही. प्रत्येकाची कारणं वेगळी वेगळी असतात. पण एकदा घराबाहेर पडल्यानंतर मात्र सारखेच परिणाम भोगावे लागतात.  
 
तिघांचं - चौकोनी कुटुंब म्हटलं की ऐकायला बरं वाटतं, पण निभावताना ते तितकंसं सोपं नाही. घरात चार माणसं असली की कामं पण वाटली जातात. अडीअडचणीला सोबत असते. मोठ्यांच्या जीवावर छोटे निर्धास्त असतात, त्यामुळे कामाचा ताण जाणवत नाही. शिवाय लहान मुले इकडे तिकडे रेंगाळल्याने काम आवरायलाही बरं पडतं. मुलांना कुठल्या टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या स्क्रीनचं आमिष दाखवायची गरज पडत नाही.  
 
दुर्दैवाने प्रत्येकवेळी हे सगळं शक्य असतंच असं नाही. शिवाय एकत्र असले तरी आजच्या आजी-आजोबांनाही तेवढा वेळ असेलच असे नाही. बदलत्या युगानुसार त्यांचेही प्राधान्यक्रम बदलले असू शकतात. त्यामुळे मुलांना एकतर पाळणाघरात, नाहीतर कुठल्यातरी हायटेक खेळण्यात जीव रमवावाच लागतो. सोय म्हणून स्वीकारलेल्या या गोष्टी पुढे जाऊन कधी सवयीत आणि नंतर व्यसनात बदलतात हे कळतही नाही. लहानवयातच तंत्रज्ञानाची चटक लागलेली नंतर त्यात वाहवत जाते. भावना नावाची गोष्टच त्यांच्या आयुष्यातून डिलीट होऊन बसते.  
 
कोरडेपणाची अशी सवय झाली की पुढं सगळंच विपरीत होऊन बसतं. मनापेक्षा शरीराचाच आनंद मोठा होऊन बसतो. बालपणातून यौवनात पदार्पण करताना तर भलताच गोंधळ होऊन बसतो. कधी पिअर प्रेशरमुळे तर कधी तारुण्यसुलभ बंडखोरीमुळे नको ते निर्णय घेतले जातात. नको तिथे पाऊल वळते. कधी यौवनाच्या उंबरठ्यावर निसर्गसुलभ भिन्न लिंगी आकर्षणालाच प्रेम समजून पुढचे घाट घातले जातात.  
 
एकीकडे शिक्षण - नोकरीच्या फेऱ्यात लग्नाचं वय वाढत जात असताना, दुसरीकडे अनेकविध माध्यमांतून शारीरिक भावभावनाचं प्रदर्शन नकळत्या वयातच समोर येऊन धडकतं. अशा या परस्परविध वातावरणात भावनांवर - मनावर ताबा ठेवणं अवघड होऊन जातं. क्षणिक मोहाला बळी पडण्याची शक्यता वाढते. स्वातंत्र्य आणि  स्वैराचार यांतील सीमारेषाच पुसट झाल्याने अशी भावना अधिकच बळावते. त्यातूनच मग पावलं वाकडी - तिकडी पडतात. कधी पब - कधी 'लॉज'कडे वळतात. कधी प्रत्यक्ष संबंध येतात तर कधी इंटरनेटवरच दाखवा-दाखवी होते. कधी भलतेसलते फोटो शेअर होतात कधी स्वतःचेच न्यूड पिक्स. बरं हे नातं शेवटपर्यंत सुरळीत टिकलं तर ठीक नाहीतर मग पुढे त्या फोटोंचा कसा वापर होईल सांगता येत नाही.   
 
क्षणिक गमतीने भयानक वळण घेतलेले असे अनेक प्रसंग आजूबाजूला घडत असतात. चित्रविचित्र गुन्ह्यांच्या अशा अनेक बातम्या रोजच्या वर्तमानपत्रात - चॅनल्सवर पाहायला - वाचायला मिळतात. तरीही स्वतःला स्मार्ट - सुशिक्षित समजणाऱ्या पिढीच्या वागण्या-बोलण्यात काहीच फरक पडत नाही. इतरवेळी शहाणपणाचा थाट सांगणाऱ्यांची अक्कल नेमकी अशाप्रसंगी शेण खायला जाते. म्हणूनच आता याही बाबतीत आईबाबांना लक्ष घालायची वेळ आली आहे. आपल्या भारतात चांगले 'घोडे' झाले तरी मुलांची जबाबदारी आईवडिलांचीच असते. २० - २५ वर्षांपर्यंत तर शिक्षणच चालू असते. त्यांनतर नोकरी मिळेपर्यंत घरच्यांवरच भार. प्रेमविवाहाचा अपवाद वगळता लग्नखर्चही त्यांच्याच माथ्यावर. आईवडिलांचा शब्दही न ऐकणाऱ्या मुलांची - त्यांनी घातलेल्या गोंधळाची जबाबदारीही यांचीच. दिवसाचे १०-१२ तास बाहेर काढणाऱ्या मुलांच्या बाबतीतही, 'घरच्यांनी हेच संस्कार केले का', हा प्रश्न असणारच! 
 
एकीकडे मुलांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे, पालकांना मात्र कायम बांधून ठेवणार. हा दुटप्पीपणा आता थांबायला हवा. स्वातंत्र्याची ज्यांना एवढीच चटक आहे, त्यांनी स्वतःची जबाबदारीही उचलायला हवी.  वेस्टर्न कल्चरचा सोस असेल तर तिथल्या  मुलांप्रमाणे वयाच्या अठराव्या वर्षी स्वतःच्या पायावर उभं राहायची तयारी ठेवावी. शेवटी आईवडील कुठे कुठे आणि किती दिवस पुरणार?  
 
उन्मेष गुजराथी 
 
09322 755 098

वेबदुनिया वर वाचा