12 ऑगस्ट "थिएटर ऑफ रेलेवन्स" चा सुत्रपात दिवस.....

शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (12:35 IST)
काळाची गाज सांस्कृतिक सृजनकार !  - मंजुल भारद्वाज 
देश आणि जग आज सांस्कृतिक रसातळाला गेले आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर संप्रेषण माध्यमात संपूर्ण विश्व लाइव्ह आहे. परंतु शोकांतिका ही आहे की तंत्रज्ञान लाईव्ह असले तरी  मनुष्य मृत झालेला आहे. मृत जगाला तांत्रिक संप्रेषण लाइव्ह करत आहे. कमालीचा विकास आहे हा, व्यक्ती, कुटुंब, समाज, देश आणि जग मृतावस्थेत व तंत्रज्ञान लाइव्ह !
 
प्रश्न हा आहे, आज जिवंत कोण आहे? हो, हाडामासांचे पुतळे श्वास घेत आहेत परंतु ते जिवंत आहेत का? जे श्वास घेत आहेत, त्यांची अवस्था काय आहे? घरामध्ये कैद भूक, भय आणि भ्रमाच्या जाळ्यात फसलेल्या लोकांना जिवंत म्हणता येईल का? महामारीमुळे लाखो लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, व मृत्यू अकाळी त्यांना कवेत घेतो आहे. अनोळखी भीतीने आज जग खोल गर्तेत चालले आहे आणि तंत्रज्ञान त्याला लाइव्ह म्हणत आहे...आहे ना विकासाचा कमळासारखा फुललेला चेहरा ?

जिवंत असण्याचा अर्थ आहे भयमुक्त असणे, विचारशील असणे, विकारांऐवजी विवेकसंमत असणे. आपले विचार धैर्याने व्यक्त करताना मानवी कल्याणासाठी सत्याचा शोध घेणे. एकविसाव्या शतकात जीवन व्यवहाराच्या सर्व सोयीसुविधा प्राप्त करूनही जगाची अशी परिस्थिती का झाली ? या परिस्थितीच्या मुळाशी आहे लालसा, वर्चस्व आणि एकाधिकारासाठी जागतिकीकरणाच्या नावावर मनुष्याचे वस्तूकरण, जे मनुष्याला केवळ एक उपभोगाची सामग्री बनवून खरेदी- विक्रीचे विनाशकारी षडयंत्र रचते आता यालाच 'विकास' या नावाखाली तांत्रिकी संप्रेषण माध्यम लाइव्ह करत आहे.

अवघ्या 30 वर्षात, लाइव्ह तांत्रिक संप्रेषणाने अशी पिढी तयार केली जिने विचार करणे, या मानवी कर्माला out source केले आहे. म्हणजेच मनुष्य आणि प्राणी यांच्यातील फरकच पुसून टाकला आहे. प्राण्यांपासून माणूस वेगळा ठरतो तो त्याच्या 'विचार करण्याच्या क्षमतेमुळे'! विचार करण्याची क्षमता हरवून त्यांनी केवळ प्राणी बनणे स्वीकारले. प्राणी असण्याचा अर्थ आहे की कोणी इतर आपले सर्व निर्णय घेणार. ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही पाहताना, मोबाईलवर भ्रमण करताना, इंटरनेटच्या माध्यमातून आपले जीवन व्यवहार करणारे जग विचार करणे विसरून गेले आणि एकाधिकारशाहीच्या हाती विकले गेले.

एकाधिकारवादाने जियो चा भ्रम निर्माण करून जगाला आपल्या मुठ्ठीत ठेवले. आता एकाधिकारशाही जगाला आपल्या मुठीत घेऊन हसत खेळत तांत्रिक संप्रेषणाने लाइव्ह लाइव्ह खेळ खेळते आणि जियो जियो मंत्राचा मोठ्याने जयघोष करते.

एकाधिकारवादाचा अर्थ आहे, विविधतेचा नाश! विविधतेचा नाश म्हणजे प्रकृतीला काबीज करण्याचे धाडस. त्याच धाडसाचे आज प्रकृती उत्तर देते आहे. मनुष्याला जन्म देणारी, संगोपन करणारी प्रकृती आज मनुष्याविरुद्ध उभी राहून मनुष्याला गिळंकृत करीत आहे ... यात सर्वात आधी तळागाळातील लोकांचा बळी जात आहे .. परंतु प्रकृती हळूहळू एकाधिकारशाही पर्यंत पोहोचत आहे.

मनुष्याच्या या ऱ्हासाचे कारण आहे कारण त्याची सांस्कृतिक चेतना मृत झाली आहे. इतिहास साक्षी आहे, कोणी कितीही बलशाली, सिद्धहस्थ, सर्वज्ञ व्यक्ति,समाज,सभ्यता किंवा साम्राज्य असो जेव्हा जेव्हा त्याची सांस्कृतिक चेतना भ्रमित झाली, तो संपला. सांस्कृतिक चेतना “ती चेतना आहे जी मनुष्याला आंतरिक आणि बाह्य आधिपत्यापासून मुक्त करून त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर नेण्यास उत्प्रेरीत करते आणि प्रकृती सोबत जगताना मनुष्याचे एक स्वतंत्र स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे. अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील. जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे, धर्म पाखंडाचा अवतार घेऊन या महामारी काळात इस्पितळे निर्माण करण्याऐवजी आपल्या सत्तालोलुपते साठी जनमानसात वसलेल्या देवांच्या मंदिराचा शिलान्यास करून, त्यांच्या आध्यात्मिक संवेदनांशी खेळ करत आहे तेव्हा सांस्कृतिक सृजनकारच समाजाला त्यांच्या मूर्छित अवस्थेतून जागवू शकतात.

मनुष्याला निरंतर परिवर्तन हवे असते. परिवर्तनाची आस नैसर्गिक आहे. प्रकृती देखील निरंतर परावर्तित होत असते. मनुष्यासाठी आवश्यक आहे परिवर्तनाला समजणे. परिवर्तन ही एक अशी वर्तन प्रक्रिया आहे जी मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे वर्चस्ववादा पासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरीत करते.

परिवर्तनाला उत्प्रेरीत करत मागील 28 वर्षांपासून " थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताने सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपली मूल्य व कलात्मकतेच्या संवाद स्पंदनांनी मानवतेची गाज असणाऱ्या या जनमंचाने जागतिक रूप धारण केले आहे. सरकारच्या 300 ते 1000 करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने उभे आहे हे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत!

थिएटर ऑफ रेलेवन्स ने जीवनाला नाटकाशी जोडून
“मागील 28 वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’, ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर “बी-७”, मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात “ड्राप बाय ड्राप : वॉटर”, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी “गर्भ”, शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”, शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार “न्याय के भंवर में भंवरी”, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’ नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे ! 

कला नेहमी परिवर्तनाला साधते. कारण कला मनुष्याला मनुष्य बनवते. जेव्हा विकार मनुष्याच्या आत्महीनतेमध्ये झिरपू लागतो तेव्हा त्याच्या आत समाविष्ट असलेला कला भाव त्याला चेतावणी देतो….
 
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत अपल्या रंग आंदोलनातून मागील २८ वर्षांपासून देशात आणि जगभरात आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने हे सचेतन कलात्मक कर्म करत आहे.
 
गांधींच्या विवेकाच्या राजनैतिक मातीत विचारांचे रोपटे रुजवित, थिएटर ऑफ रेलेवन्सचे प्रतिबद्ध कलाकार समाजातील फ्रोजन स्टेटला तोडून सांस्कृतिक चेतना जागृत करीत आहेत.
 
आज या प्रलयकाळात थिएटर ऑफ रेलेवन्स ‘सांस्कृतिक सृजनकार’ घडवण्याचा विडा उचलत आहे! सत्य - असत्याच्या भानाच्या पुढे जाऊन निरंतर खोटे पसरवून देशाची सत्ता आणि समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारी परिवारापासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ति देऊ शकतात. काळाची गाज सांस्कृतिक सृजनकार !!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती