आज पुन्हा ऑफिसच्या कामांमुळे साहेबांचं डोकं फिरू लागलं. बाहेर पाऊस पडत होतं, भूक पण लागत होत अशात त्याने विचार केला की जवळच्या ढाब्यावर जाऊन काही खावं. तर तो ऑफिसच काम आटपून ढाब्यावर पोहचला. तेवढ्यात दत्तू पाण्याचा पेला हातात घेऊन धावत आला. पेला त्यांच्या हातात ठेवत म्हणाला खूप दिवसांनी येणं झालं साहेब...
होय जरा शहराबाहेर गेलो होतो...
तेवढ्यात दत्तू म्हणाला आपण आरामात बसा मी काही खायला घेऊन येतो...
साधारण ढाबा पण इथे साहेबांना येणे आवडायचे...कधीही दत्तूला काही विशेष ऑर्डर देण्याची गरज भासायची नाही....तो आपल्या मनाने पदार्थ प्लेटमध्ये घेऊन येत असे आणि साहेबांना पसंत पडला नाही असे कधीच झाले नाही..
माहीत नाही दत्तूला साहेबांची आवड कशी कळत होती. वरून पैसेही कमी मोजावे लागायचे..
साहेब विचार करत बसलेच होते तेवढ्यात गरमागरम कांदा भज्यांचा सुवास आल्यावर ते खूश झाले.
"अरे दत्तू, तू जादूगर आहे रे ! या वातावरणात याहून चांगला माझा आवडीचा पदार्थ नाही, साहेबांनी भजींचा स्वाद घेत संतुष्टपणे म्हटलं.
साहेब पोटभर खा मी आल्याचा चहा आणतो...
साहेबांचा मूड ऐकाऐक फ्रेश होऊन गेला.
बघ आज मी तुझं काहीही ऐकणार नाही, खूप छान जेवण बनतं तुझ्याकडे, साहेबांनी पुन्हा आपला नेहमीचा हठ्ठ धरला की आज तर मी तुझ्या स्वयंपाकघरात शिरणार आणि कुकला भेटणार. मला इतके चांगले पदार्थ खायला देणार्याचे आभार नको मानायला....
दत्तू थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला पण साहेब सरळ स्वयंपाकघरात शिरले...
आत डोकावून बघितलं तर एक म्हातारी बाई चहा बनवत होती, ती खूप खूश दिसत होती.
"आई" साहेबांच्या तोंडून निघालेला शब्द...जीभ जड झाली होती पण हिंमत करून विचारलं... मी तर तुला वृद्धाश्रमात ठेवलं होतं नं.....
होय बेटा पण जे सुख मला तुला येथे राहून तुला जेवू घालण्यात आहे ते सुख तेथे नाही बाळा...
आज साहेबांना कळून चुकलं होतं की येथे जेवणं करायला त्यांना का आवडायचं आणि पैसे देखील कमी पडायचे.