श्रीकृष्णाची 'द्वारका नगरी' खरंच पाण्यात बुडाली? संशोधक काय म्हणतात?
शनिवार, 10 जून 2023 (15:34 IST)
भारतीय जनमानसांत द्वारका नगरीला विशेष महत्त्व आहे. अनेक भारतीयांच्या मनात द्वारकेबद्दल आस्था आणि कुतुहलाची भावना दिसते.
भारतातील सात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक द्वारका आहे. महाभारतात श्रीकृष्णाचं राज्य म्हणून द्वारका नगरीचा उल्लेख आहे. श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असं म्हटलं जातं.
भारतीय पुरातत्व विभागाकडून द्वारकेत झालेल्या उत्खननस संशोधनाची बीबीसीनं माहिती घेतली आणि त्यावर 16 डिसेंबर 2021 रोजी व्हीडिओ रिपोर्ट प्रसिद्ध केला.
त्याच रिपोर्टचं हे शब्दांकन.
“भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या अनेक उत्खननांपैकी एक सर्वात मोठं उत्खनन म्हणजे द्वारकेतलं उत्खनन. द्वारका नगरीला धार्मिक, पुरातत्व आणि ऐतिहासिक महत्त्व आहे,” असं डॉ. आलोक त्रिपाठी सांगतात.
डॉ. आलोक त्रिपाठी हे भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. ते अंडरवॉटर आर्किआलॉजिस्ट आहेत. म्हणजे, पाण्याखालील पुरातत्व स्थळांचा शोधाबाबतचे ते तज्ज्ञ आहेत.
महाभारतातील द्वारका
भारतात ज्या सात तीर्थस्थळांना पवित्र मानलं जातं, त्यात द्वारका नगरीचा समावेश होतो. अनेक भारतीयांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या श्रीकृष्णाचं राज्य म्हणून द्वारका नगरीकडे पाहिलं जातं. महाभारतात या द्वारका नगरीचा उल्लेख आहे.
मात्र, श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असंही म्हटलं जातं.
द्वारदाधीश मंदिरातील पूजारी मुरली ठाकर म्हणतात की, “भगवान श्रीकृष्णाने या कर्मभूमीत 100 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलं. गोमती नदीच्या किनारी वसलेली तटबंदीयुक्त द्वारका नगरी 84 किलोमीटवर पसरली होती. इथे गोमती नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो.”
महाभारताच्या तिसऱ्या आध्यायातल्या 23 व्या आणि 34 व्या श्लोकात द्वारकेचा उल्लेख असल्याचं नारायणाद ब्रह्मचारी म्हणतात. नारायणाद ब्रह्मचारी हे द्वारकाधीश मंदिराची देखरेख करतात.
या श्लोकांचा अर्थ सांगताना नारायणाद ब्रह्मचारी म्हणतात की, “जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी सोडून आध्यात्मिक जगताच्या शोधात 125 वर्षांनंतर गेले, तेव्हा समुद्रदेवतेनं द्वारका नगरीची जमीन पुन्हा आपल्या कवेत घेतली.”
महाभारात व्यासांनी तीन हजार वर्षांपूर्वी द्वापारयुगात लिहिल्याचंही नारायणाद ब्रह्मचारी म्हणतात.
समुद्राच्या तळाशी काय आहे?
डॉ. आलोक त्रिपाठी सांगतात की, “गेल्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्वशास्त्रज्ञांनी द्वारका नगरीचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून द्वारका नगरी प्रत्यक्ष होती की नाही, हे सिद्ध होऊ शकेल. त्यानुसार 1960 च्या दशकात पुण्यातील डेक्कन कॉलेजकडून पहिलं उत्खनन करण्यात आलं.
“1979 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने आणखी एक उत्खनन केलं. यावेळी समुद्राच्या तळाशी काही मातीची भांडी सापडली, जी इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्रामधली असावीत, असं पुरातत्वशास्त्रज्ञांना वाटलं.”
द्वारका नगरीच्या आवतीभोवती उत्खनन आणि शोध सुरू केला गेला. यातून विविध प्रकारचे पुरातत्व अवशेष सापडले.
“आतापर्यंत एकूण पाचशेहून अधिक कलाकृती सापडल्या आहेत. हे सर्व नमुने जवळपास दोन हजार वर्षांच्या सांस्कृतिक क्रमाचे अस्तित्व दर्शवतात.
दगडी इमारतींचे अवशेष आणि मोठ्या दगडी बांधकामाच्या रचना पाण्याखाली सापडल्या आहेत. पण त्यांची पृष्ठभाग उघडे असल्यामुळे इतर वस्तू तिथे आढळत नाहीत,” असं डॉ. आलोक त्रिपाठी सांगतात.
द्वारका समुद्रात बुडाली?
CSIR चे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. राजीव निगम म्हणतात, “बुडलेल्या द्वारकेच्या शोधाची पुरातत्व कार्याची सुरुवात द्वारकाधीश मंदिराजवळील उत्खननाने झाली.”
ते पुढे सांगतात की, “उत्खननात अनेक मंदिरे सापडली. याचा अर्थ समुद्राच्या पाण्याची पातळी जसजशी वाढली, तशी मंदिरे समुद्रसपाटीपासून उंच जमिनीवर हलवण्यात आली.
“भारतातील प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ज्ञ डॉ. एस. आ. राव यांनी बुडालेल्या द्वारका नगरीचे पुराव सापडतात का, हे पाहण्याची कल्पना चवली. त्यानंतरच या संदर्भातील अभ्यास सुरू झाला.”
त्यानंतर 2007 मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले. या उत्खनन प्रकल्पाचे संचालक म्हणून डॉ. आलोक त्रिपाठी यांनी काम पाहिलं.
डॉ. आलोक त्रिपाठी सांगतात की, “द्वारका पश्चिमेला आहे. साहित्यात उल्लेख केलेल्या स्थानाशी हे स्थान मिळतेजुळते आहे. इथेच नदीचा एक प्रवाह समुद्राला मिळतो. त्याला गोमती म्हणतात.
“इथेच आताचं द्वारका शहर आहे. आम्ही हे ठिकाण उत्खननासाठी निवडलं. आम्ही संपूर्ण जागा वैज्ञानिक पद्धतीने शोधून काढली. त्यात आम्ही पाहिले की 50 मीटर परिसरात आणखी अवशेष आहेत आणि ते चांगल्या अवस्थेत आहेत.”
बंदर सापडलं...
डॉ. आलोक त्रिपाठी सांगतात की, “आम्हाला याच 10 मीटरच्या भागात जड भासणारी वस्तू सापडली. समुद्राच्या पाण्याच्या माऱ्यामुळे ते उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर आम्ही सुमारे दोन नॉटिकल माईल बाय एक नॉटिकल माईल परीघाच्या क्षेत्रात हायड्रोग्राफिक सर्वेक्षण केलं.
“या क्षेत्राचे सविस्तर सर्वेक्षण केले असता, प्रवाहाचा मार्ग बदलल्याचे दिसून आले. आम्ही त्यांचा एक एक करून शोध घेतला आहे. जेव्हा तुम्ही पाण्याखाली जाता तेव्हा तुम्हाला तेथे वाढणारी झाडे दिसतात. या झाडांना बाजूला सारल्यानंतर दगडी रचनेचे नमुने दिसू लागतात. मग त्या दगडांवर क्रमांक टाकण्याचं काम आम्ही केलं,” असं डॉ. त्रिपाठी सांगतात.
मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आकाराची दगडं सापडली आणि त्यावरून हे स्पष्टपणे सिद्ध होतं की, इथं प्राचिन बंदर होतं, असंही डॉ. आलोक त्रिपाठी सांगतात.
समुद्राची पातळी वाढू लागली…
डॉ. राजीव निगम सांगतात की, “जेव्हा आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसियनोग्राफी (INO) मध्ये गेल्या 15 हजार वर्षांतील समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या नोंदी केल्या आणि त्याचं विश्लेषण केलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की 15 हजार वर्षांपूर्वी समुद्राची पाणी पातळी आताच्या तुलनेत 100 मीटरने खाली होती. कालांतरानं समुद्राची पातळी वाढू लागली. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी ती पातळी आजच्या पातळीच्या वरपर्यंत पोहोचली.
“दुसरीकडे, द्वारका नगरी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी बांधली गेलं असावं. त्यानंतर समुद्राची पातळी पुन्हा वाढली असावी आणि तेव्हा द्वारका नगरी पाण्याखाली गेली असावी.”
प्राचीन द्वारका नगरीतील अनेक कलाकृती पाण्याखाली सापडल्या. दगडी बांधकामे, खांब, सिंचन कालवे दिसतात. हे कोणत्या कालखंडातील आहेत याचा अभ्यास सुरू आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ प्राचीन नगराच्या भिंतींचा पाया शोधण्याच्या उद्देशाने पाण्याखाली उत्खननाची योजना आखत आहेत.
“आम्ही शहराच्या सर्वात जुन्या वस्तीचे स्थान निश्चित करू शकलो, तर भारताच्या इतिहासात त्याचे खूप महत्त्व असेल,” असं डॉ. आलोक त्रिपाठी म्हणतात.