सुभाषचंद्र बोस यांचा जन्म, कौटुंबिक जीवन आणि शिक्षण
शनिवार, 19 जानेवारी 2019 (14:26 IST)
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.
जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.
प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.
प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.
आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.
शिक्षण व विद्यार्थी जीवन
लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.
वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.
महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.
१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.