अनेकांनी युवराज सिंग याने प्रदूषणमुक्त दिवाळीला पाठिंबा दिल्याने कौतूक केलं आहे. युवराज सिंगने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत युवराज सांगतोय की, 'या दिवाळीला कृपया फटाके फोडू नका अशी मनापासून तुम्हाला विनंती आहे. गेल्या वर्षी आपल्या देशाची काय अवस्था झाली हे तुम्ही पाहिलंत. इतकं प्रदूषण झालं होतं की मला घराबाहेर पडणं मुश्किल झालं होतं. आपली मुल, वृद्द, मित्र, पालकांसाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. दिवे लावा, आनंद पसरवा, मिठ्या मारा, पत्ते खेळा पण कृपया फटाके फोडू नका. लहान मुलं मास्क लावून फिरताना पाहणं खुपच वेदनादायी असतं. आपण सर्वांनी जबाबदारी घेऊया....आपण नाही घेतली तर कोणीच घेणार नाही. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे'.
मात्र यावेळी त्याच्या दुटप्पी भूमिकेवरुन अनेकांनी टार्गेटही केलं आहे. ट्विटरवर काही युझर्सनी त्याच्या लग्नातील रिसेप्शनचा फोटो शेअर करत सुनावलं आहे. या फोटोत युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल दिसत असून त्यांच्या मागे फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचं दिसत आहे. आपल्या लग्नात फटाके फोडायचे, आणि दिवाळीला प्रदूषणमुक्त साजरी करण्याचं आवाहन करण्याचा दुटप्पीपणा करायचा असं म्हणत युझर्सनी युवराजला टार्गेट केलं आहे.