विराट कोहली फलंदाजांच्या विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानी

गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (15:24 IST)
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-4 असा नामुष्कीजनक पराभव पत्करला. परंतु एक फलंदाज म्हणून भारतीय कर्णधार विराट कोहलीची कामगिरी झळाळून उठली. त्यामुळेच नव्या कसोटी फलंदाजांच्या विश्‍वक्रमवारीत विराट कोहलीने अग्रस्थानावर झेप घेतली आहे. एजबॅस्टन कसोटीनंतर कोहली पहिल्यांदा अग्रस्थानी पोहोचला आणि ट्रेन्ट ब्रिज कसोटीनंतर त्याने हे स्थान मजबूत केले.
 
विराट कोहलीने या मालिकेत 59.3 सरासरीने 593 धावा जमविल्या. मालिका सुरू होण्यापूर्वी अग्रस्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथपेक्षा कोहली 27 गुणांनी मागे होता आणि मालिका संपल्यावर तो स्मिथला मागे टाकून एक गुणाने पुढे गेला आहे. लोकेश राहुलने 16 स्थानांनी प्रगती केली असून तो आता 19व्या क्रमांकावर आहे. तर ऋषभ पंतने 63 स्थानांनी प्रगती केली असून तो आता 111 व्या क्रमांकावर आहे. जडेजानेही 12 स्थानांनी प्रगती केली असून तो आता 58व्या क्रमांकावर आहे.
 
इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघ सांघिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे. परंतु इंग्लंडने पाचव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचे 125 गुण होते. मात्र पराभवामुळे भारताचे आता केवळ 115 गुण राहिले आहेत. इंग्लंडने 97 गुणांनी सुरुवात केली होती. मात्र मालिका विजयानंतर इंग्लंडने 105 गुणांची कमाई करीत न्यूझीलंडला मागे टाकले आहे. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील दक्षिणआफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा इंग्लंड संघ केवळ एका गुणाने मागे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती