विनोद कांबळी यांनी केली पत्नीला मारहाण; वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल

रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (15:12 IST)
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रिया यांनी त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कथित मद्यधुंद स्थितीत विनोद यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं अँड्रिया यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.
 
रागाच्या भरात विनोद यांनी स्वयंपाकघरातील कुकिंग पॅनचं हँडल फेकून मारलं, यामुळे डोक्याला इजा झाल्याचं अँड्रिया यांनी तक्रारीत म्हटलं आहे. अँड्रिया यांच्या डोक्याला मार लागला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30च्या बेतात झाल्याचं त्यांनी सांगितलं.
 
दुपारच्या वेळेस दारु प्यायलेल्या स्थितीत विनोद घरी पोहोचले आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली असं अँड्रिया यांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर धावत स्वयंपाकघरात जात त्यांनी फ्रायपॅन हातात घेऊन तो फेकला असं अँड्रिया यांचं म्हणणं आहे.
 
डोक्याला झालेल्या दुखापतीवर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर अँड्रिया यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
 
नव्वदीच्या दशकात देशातल्या सर्वोत्तम प्रतिभाशाली क्रिकेटपटूंमध्ये विनोद कांबळीची गणना व्हायची. वादविवादांच्या निमित्ताने चर्चेत येणाऱ्या विनोद कांबळीचं आर्जव व्हायरल झालं होतं. स्वॅगचं मूर्तीमंत प्रतीक असणाऱ्या कांबळीला काम हवंय.
 
क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांचे दोन जगविख्यात शिष्य म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. दोघांची कारकीर्द एकसाथ सुरू झाली. सचिनने गरुडभरारी घेतली पण विनोदच्या कारकीर्दीने अपेक्षित भरारी घेतलीच नाही.
 
मैदानावर, मैदानाबाहेर विनोद कांबळी आणि वादविवाद यांचं नातं राहिलं. मोकळेपणाने व्यक्त होणारा विनोद अलगद वादाच्या भोवऱ्यात सापडतो. काही वादांसाठी त्याच्यावर गुन्हादेखील दाखल झाला आहे.
 
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडीने हॅरिस शिल्ड स्पर्धेत शारदाश्रम शाळेतर्फे खेळताना सेंट झेव्हिअर शाळेविरुद्ध खेळताना 664 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. तेंडुलकरने 326 तर कांबळीने नाबाद 349 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती.
शालेय क्रिकेटमधल्या सार्वकालीन महान भागीदाऱ्यांमध्ये तेंडुलकर-कांबळी भागीदाराची नोंद होते. त्या सामन्यात कांबळीने 37 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्सही टिपल्या होत्या.
 
रणजी पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याची किमया कांबळीने केली होती. पहिल्या सात कसोटी सामन्यांमध्ये दोन द्विशतकं झळकावण्याचा पराक्रम कांबळीच्या नावावर आहे.
 
हे द्विशतक करण्याअगोदर विनोदने भारतीय संघाचा त्या वेळचा फिजिओ अली इराणी याच्याकडे माधुरी दिक्षितला भेटवण्यासाठी आग्रह धरला होता.
 
अलीने मजेत त्याला म्हटले होते, "तू डबल सेंचुरी मार. मग भेटवतो." कांबळीने खरोखर द्विशतक मारल्यानंतर अली त्याला घेऊन माधुरीच्या घरी ब्रेकफास्टला गेला होता.
 
'बीसीसीआयचं पेन्शन हेच उत्पन्न'
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे 30 हजार रुपये निवृत्ती वेतन हा कांबळीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे.
मिड डेशी बोलताना विनोद कांबळीनं म्हटलं, "मी एक निवृत्त क्रिकेटपटू आहे. मी सध्या पूर्णपणे बीसीसीआयच्या निवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. त्यासाठी मी खरोखर मंडळाचा आभारी आणि कृतज्ञ आहे. निवृत्तीवेतनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत आहे.
 
मला कामाची गरज आहे. मी तरुणांसोबत काम करायला तयार आहे. मुंबईने अमोल मुझुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. पण, गरज भासली तर मला संधी द्यावी. मला मुंबईच्या संघासोबत काम मिळावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मागे माझे कुटुंब आहे, त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला काहीतरी काम द्यावे."
 
"सचिनला सर्व काही माहीत आहे. पण, मला त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीमध्ये काम दिले होते. मला तेव्हा खूप आनंद झाला होता. तो खूप चांगला मित्र आहे. तो नेहमीच माझ्यासाठी उपलब्ध असतो. शाळेत असल्यापासून त्याने माझी मदत केली."
 
हृदयविकाराचा झटका आणि पोलिसांनी केली मदत
2013 मध्ये कांबळी गाडीने पूर्वद्रूतगती महामार्गावरून जात असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. सुजाता पाटील या माटुंगा वाहतूक पोलीस विभागातील निरीक्षक आणि हवालदार कुमारदत्त शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवून कांबळी यांचा जीव वाचवला.
 
पाटील सकाळी चेंबूर-सोमय्या मैदान येथील हायवे अपार्टमेंटजवळ तैनात होत्या. त्यांच्यासोबत त्या वेळेस हवालदार कुमारदत्त शिंदेही होते. साडेनऊच्या सुमारास अचानक एक गाडी शिंदे उभे असलेल्या जागी येऊन थांबली. गाडी चालविणारी व्यक्ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तसेच ती शिंदे यांच्याकडे मदतीसाठी धावा करीत होती.
 
त्यांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा आतमध्ये विनोद कांबळी होता आणि त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. शिंदे यांनी लगेचच जवळच असलेल्या पाटील यांना बोलावून घेतले. पाटील यांनी तातडीने सूत्रे हाती घेतली. आपल्या छातीत दुखत असल्याचे विनोदने कसेबसे त्यांना सांगितले. तो पूर्णपणे घामाघूम झाला होता आणि त्याची तब्येत ढासळत चालली होती.
प्रसंगावधान बाळगत पाटील यांनी तात्काळ त्याला लीलावती रुग्णालयात नेले. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत डॉक्टरांनीही विनोदवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्याची तब्येत स्थिरस्थावर होईपर्यंत पाटील तिथेच होत्या.
 
'ती मॅच फिक्स होती, मी बोललो म्हणून माझं करिअर संपलं'
आशियाई उपखंडात 1996 मध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या या लढतीला गालबोट लागलं. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 251 धावांची मजल मारली. अरविंदा डिसिल्व्हा आणि रोशन महानामा यांनी अर्धशतकी खेळी केल्या. भारतातर्फे जवागल श्रीनाथने 3 तर सचिन तेंडुलकरने 2 विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताची अवस्था 120/8 अशी झाली. भारताचा पराभव स्पष्ट दिसू लागल्याने चाहत्यांनी मैदानातच आपला राग व्यक्त केला. मैदानात बाटल्या फेकण्यात आल्या. मैदानात स्वत:जवळ असलेल्या वस्तू जाळत रोष व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात नसल्याने सामनाधिकारी क्लाईव्ह लॉईड यांनी ही मॅच स्थगित करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं.
 
या सामन्यात प्रेक्षकांच्या धुडगुसानंतर नाबाद विनोद कांबळीला रडत रडत पॅव्हेलियनमध्ये जाताना संपूर्ण जगाने पाहिलं. कांबळी ओक्साबोक्शी रडत होता. 15 वर्षांनंतर कांबळीने हा सामना फिक्स्ड असल्याचं सांगितलं. संघातील काही खेळाडूंनी फिक्सिंग केलं असा आरोपही कांबळीने केला होता.
 
तेव्हा काय घडलं हे बोलल्यामुळे माझं करिअर संपलं असा आरोप कांबळीने केला.
 
'सचिन लिफ्टने गेला, मी जिन्याने'
सचिन तेंडुलकरच्या गौरवशाली कारकीर्दबद्दल कांबळीने नेहमीच आदर सन्मान व्यक्त केला पण मित्र म्हणून कांबळीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
 
सचिनचं करिअर म्हणजे लिफ्टने जाण्यासारखं तर माझं जिन्याने अशी खंत कांबळीने व्यक्त केली होती.
 
"सचिनने फेअरवेल भाषणात माझा उल्लेख केला नाही. आमच्या विश्वविक्रमी भागीदारीने दोघांनाही ओळख मिळवून दिलं. त्या भागीदारीत माझाही वाटा होता. सचिनने निवृत्तीनंतर सगळ्या मित्रांना पार्टीला बोलावलं होतं. पण मला बोलावलं नाही. हे कळल्यावर मला खूप दु:ख झालं. दहाव्या वर्षापासून मी सचिनच्या कारकीर्दीचा भाग राहिलो आहे. आम्ही दोघांनी बरेवाईट दिवस एकत्र अनुभवले आहेत. मी त्याच्यासाठी सदैव असतो. पण आता तो मला विसरला आहे," असं कांबळी तेव्हा म्हणाला होता.
 
पण त्यानंतर काही वर्षात कांबळी पुन्हा एकदा सचिनच्या मोठेपणाबद्दल बोलला होता.
 
सोसायटीच्या गेटवर धडकावली गाडी
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला कांबळीला अटक करण्यात आली होती.
 
कांबळी ज्या ठिकाणी राहतो त्या सोसायटीच्या गेटवर गाडी आदळवल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय दंड संहितेनुसार कलम 279 (बेदरकार पद्धतीने वाहन चालवणे), कलम 336 (दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं), कलम 427 याअंतर्गत कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
वांद्रे पोलिसांनी ही माहिती दिली होती. गाडी धडकावल्यानंतर कांबळी याचा सोसाटीचे सुरक्षारक्षक आणि रहिवाशांबरोबर वाद झाला होता. याप्रकरणी काही काळानंतर कांबळीची जामिनावर सुटका झाली.
 
सायबर फसवणूक झाल्याचा दावा
2021 मध्ये कांबळीने सायबर फसवणूक झाल्याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आरोपीने कांबळींची एक लाख रुपयांची फसवणूक केली होती. केवायसी तपशील अपडेट करण्याच्या नावाखाली आरोपीने कांबळीची माहिती मिळवली आणि त्याला फसवलं.
 
खाजगी बँकेचा अधिकारी असल्याचं आरोपीने कांबळीला सांगितलं. आरोपीने कांबळीकडे माहिती मागितली. कांबळीने माहिती दिल्यानंतर त्याच्या खात्यातून 1.13 लाख रुपये काढण्यात आले.
 
थकवलं कर्ज
वाहन आणि गृह खरेदीसाठी घेतलेलं 50 लाखांचं कर्ज थकवल्याप्रकरणी डोंबिवली नागरी सहकारी बँकेने कांबळीला नोटीस बजावली. कांबळीने 2009 आणि 2010 मध्ये डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या दादर शाखेकडून 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने त्याला नोटीस बजावली. मात्र त्या नोटिशीला कांबळीने उत्तर दिलं नाही.
 
कर्जाची विचारणा करण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी कांबळीच्या घरी गेल्या होत्या. कांबळीच्या पत्नीकडून अपमानास्पद वागणूक आणि मारहाण करण्यात आल्याची तक्रार बँकेच्या महिला अधिकाऱ्यांनी दाखल केली होती. मात्र त्याचवेळी कांबळीची पत्नी आंद्रिया यांनी बँकेच्या महिला अधिकारी सक्तीने घरात प्रवेश केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली.
 
तारण मालमतेच्या आधारे बँक कर्जाची वसुली करू शकतं. मात्र त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार असल्याने कांबळीने न्यायालयात दाद मागितली होती.
 
अन्य क्षेत्रात मुशाफिरी
क्रिकेटपासून दूर असताना विनोदने चित्रपटातही आपले नशीब अजमावून पाहिले. आजपर्यंत त्याने तीन चित्रपटात काम केले आहे.
 
या डान्स रिअॅलिटी शोमध्येदेखील विनोदचा सहभाग होता. 2009 च्या निवडणुकीत विनोदने लोक भारती पार्टीकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि पराभूतही झाला होता.
 
प्रशिक्षक आणि मेन्टॉर
मुंबई टी-20 लीगमध्ये शिवाजी पार्क लायन्स संघाचा मेंटॉर म्हणून विनोदने काम केले होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसीच्या अकादमीमध्येही त्याने प्रशिक्षक म्हणून काम सुरु केले आहे.
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती