अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. पृथ्वी शॉनच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून दिला. आता अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी २७३ धावांचं आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांत आटोपला.
भारताकडून ईशान पोरेलनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याआधी, या विश्वचषकात सातत्यानं फलंदाजी करणारा शुभमन गिल भारतीय डावाचा पुन्हा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात नाबाद शतक झळकावून भारताला ५० षटकांत नऊ बाद २७२ धावांची मजल मारुन दिली. गिलनं ९४ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी उभारली.
या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरानं ८९ धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला होता. शॉनं ४१, तर कालरानं ४७ धावांची खेळी केली. हार्विक देसाई वीस धावांवर बाद झाला.