Media Rights Auction: आयपीएलच्या पुढील पाच हंगामातील सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी बोली प्रक्रिया सुरू आहे. यावेळी बीसीसीआयने चार गटांमध्ये मीडिया हक्क विकण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दोन गटांची बोली पूर्ण झाली आहे. पहिला गट भारतातील टीव्ही मीडिया अधिकारांचा होता आणि त्यासाठी सुमारे 24 हजार कोटींची बोली लावण्यात आली आहे. तर, दुसरा गट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलच्या प्रसारण अधिकारांचा होता आणि यासाठी सुमारे 20 हजार कोटींची बोली लावण्यात आली आहे. विविध प्रसारकांना टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार मिळाल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
टीव्हीवर आयपीएल सामने प्रसारित करणारी वाहिनी प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 57.5 कोटी रुपये देईल. त्याच वेळी, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयपीएल सामने प्रसारित करणारी कंपनी प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 48 कोटी रुपये देईल. त्यानुसार एका आयपीएल सामन्याची किंमत 105 कोटींहून अधिक झाली आहे. 2023-2027 पर्यंत भारतात सामने प्रसारित करणाऱ्या कंपन्या (टीव्ही आणि डिजिटल) बीसीसीआयला एकूण 44,075 कोटी रुपये देतील.मीडिया हक्कांचा लिलाव अद्याप पूर्ण झालेला नाही, परंतु एका आयपीएल सामन्याची किंमत ईपीएलपेक्षा जास्त झाली आहे.
आता परदेशात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी बोली लावली जाणार आहे. याशिवाय आयपीएलच्या विशेष सामन्यांच्या प्रसारणासाठीही बोली लावली जाणार आहे. आयपीएल मीडिया हक्कांचा लिलाव आज पूर्ण होऊ शकतो. ग्रुप ए आणि ग्रुप बीचे लिलाव संपले आहेत, आता ग्रुप सी आणि ग्रुप डीचा लिलाव होणार आहे.