...हे तर दर्जेदार क्रिकेटपटूंचीफौज तयार करण्याचे पाऊल

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (13:36 IST)
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने इंग्लंडच्या बहुचर्चित रोटेशन पॉलिसीचे समर्थन केले आहे. याबाबत तो म्हणाला की, हे हुशारीने उचललेले पाऊल दर्जेदार क्रिकेटपटूंची फौज तयार करत आहे.
 
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (इसीबी) रोटेशन पॉलिसीवीर क्रिकेट जगतात कठोर टीका होत आहे. इसीबीने खेळाडूंवरचा अधिक भार कमी करण्यासाठी व त्यांना जैव सुरक्षित वातावरणात राहताना मानसिक थकवपासून वाचविण्यासाठी ही पॉलिसी सुरू केली आहे. इंग्लंडने हे आगळे-वेगळे पाऊल उचलल्यामुळे अनेक मोठ्या सामन्यांमध्ये व मालिकांमध्ये त्यांचे प्रमुख खेळाडू खेळू शकत नाहीत. मात्र स्टेनला वाटते की, यामुळे इंग्लंडची बाकड्यावरील फळी मजबूत होत आहे. ज्यामुळे आयसीसीच्या भविष्यातील स्पर्धांसाठी संघांची निवड करताना त्यांना त्याची मोलाची मदत होणार आहे. स्टेनने टि्वट केले की, इंग्लंडची रोटेशन पॉलिसी हळुहळू दर्जेदार क्रिकेटपटूंची फौज तयार करत आहे. आपण भलेही त्यावर टीका करत असू, मात्र आगामी आठ वर्षांमध्ये आयसीसीच्या आठ मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्यावेळी त्यांना संघांची निवड करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा अनुभव असलेल्या क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही.
 
आयसीसीचच्या स्पर्धांबाबत कदाचित मी चुकीचा असेन, मात्र मला हेच सांगण्यात आले आहे. तरीही काहीही असले तरी इंग्लंडने हे खूपच बुध्दिमत्तेने टाकलेले पाऊल आहे.
 
या रोटेशन पॉलिसीमुळे इंग्लंडचा यष्टिरक्षक जोस बटलर भारताविरूध्दच्या पहिल्या दोन कसोटीनंतर व अष्टपैलू मोईन अली दुसर्या  कसोटीनंतर स्वदेशी परतले आहेत. तर फलंदाज जॉनी बेरस्टो आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाहेर राहिल्यानंतर मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी संघाशी जोडले गेले आहेत. इतकेच नाही तर संघ व्यवस्थापन अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अॅमण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनाही मधल्या  काळात विश्राम देत आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती