ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला लागलेले पावसाचे ग्रहण सुटण्याची चिन्हे नाहीत. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस पद्धतीनुसार सामन्याचा निकाल लावावा लागला होता. आता कोलकाता येथेही पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे भारतीय संघाचे पहिले सराव सत्र रद्द करावे लागले.
त्याच वेळी पहिल्या सामन्यात पराभव झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सरावाचा आग्रह धरल्यामुळे त्यांच्यासाठी इनडोअर सरावाची व्यवस्था करण्यात आली. ईडन गार्डन स्टेडियमची आजची अवस्था पाहून ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने सकाळीच “आज मैदानावर जाता येईल असे वाटत नाही’ अशा अर्थाचे ट्विट केले होते आणि घडलेही तसेच.
मैदानाची अवस्था पाहून भारतीय संघ लगेचच हॉटेलमध्ये परतला. किमान दोन-तीन तास कडक उन्ह पडल्याशिवाय सराव शक्य नसल्याचे भारतीय संघाच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच सामन्याला आणखी दोन दिवस असल्यामुळे आपल्याला पाऊस कमी होण्याची आणि मैदान तयार करता येण्याची आशा असल्याचे पूर्व विभागाचे क्यूरेटर आशिष भौमिक यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून कोलकात्यात पाऊस आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे हा पाऊस होत असल्याचे कोलकाता वेधशाळेचे संचालक गणेश दास यांनी सांगितले. तसेच कमी दाबाचा पट्टा उद्यापर्यंत कमी होणार असला, तरी गुरुवारी, सामन्याच्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.