T20 World Cup 2022: टीम इंडिया- पाकिस्तान पुन्हा अमोर- समोर, पराभवाचा वचपा भारत काढणार ?

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (13:47 IST)
T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध आहे.2021 च्या टी-20 विश्वचषकातही भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता आणि या सामन्यात भारताला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी भारताने प्रत्येक वेळी एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला होता. अशा स्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा विजय मिळवून दुबईतील पराभवाचा वचपा काढायचा आहे. 
 
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यातील पाच सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे, तर पाकिस्तान संघाने एकदा विजय मिळवला आहे. एकूण T20 मध्ये दोन्ही संघ नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने सात सामने जिंकले असून पाकिस्तानने दोन सामने जिंकले आहेत. सात सामन्यांपैकी एक (2007) भारताने बरोबरीनंतर बॉल आऊटमध्ये जिंकला होता.
 
भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश सह  सुपर 12 मध्ये आहे. तर श्रीलंका, नामिबिया , वेस्टइंडीज  आणि स्कॉटलंड चे चार संघ 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यास पात्र ठरण्यासाठी आमने सामने असतील. या मधून निवड झालेल्या दोन संघाना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. 
 
भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. T20 विश्वचषकाचे सामने 16 ऑक्टोबर  ते  13 नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. 
 
भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड - 23 ऑक्टोबर
भारत विरुद्ध गट अ उपविजेता, सिडनी क्रिकेट ग्राउंड - 27 ऑक्टोबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ स्टेडियम - 30 ऑक्टोबर
भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड ओव्हल -2 नोव्हेंबर
भारत विरुद्ध गट ब उपविजेता संघ, मेलबर्न - 06 नोव्हेंबर

सेमीफायनल आणि फायनल कधी?
T20 विश्वचषक 2022 चे उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. त्याच वेळी, त्याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती