भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला टी-20च्या प्रति असलेला आपला दृष्टिकोन बदलावा, असा सल्ला दिला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकरसह काही माजी क्रिकेटपटूंनी धोनीच्या टी-20 कारकिर्दीबाबत प्रश्न उप स्थित केले होते.
गांगुली म्हणाला, एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत त्याचे टी-20 सामन्यांतील कामगिरी तितकीशी चांगली नाही. मला आशा आहे की, याबाबत कोहली आणि संघ व्यवस्थापक त्याच्याशी चर्चा करतील. धोनीमध्ये खूप क्षमता आहे. त्याने जर टी-20 सामन्यांमध्ये आपला दृष्टिकोन बदलल्यास तो पुन्हा यशस्वी होऊ शकतो, असे गांगुलीने सांगितले.
गांगुलीच्या मते धोनी अजून बराच काळ क्रिकेट खेळू शकतो. विशेष करून एकदिवसीय सामन्यात त्याला खूप संधी आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात खेळने सुरू ठेवले पाहिजे. पण टी-20 मध्ये वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. त्याने टी-20 सामन्यात स्वच्छंदपणे खेळावे. तसेच निवड समितीकडून त्याला काय अपेक्षा आहेत हेही महत्त्वाचे आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला विश्रांती देण्याचा भारताने घेतलेल्या निर्णयावर गांगुलीने आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, मी आश्चर्यचकित झालो आहे. मला कळले नाही की तो जखमी झाला आहे. त्याने केवळ तीन कसोटी सामने खेळले असून त्याचे हे खेळाचे वय आहे, असे गांगुली म्हणाला.