रोहित शर्मा : आगामी IPL कुठल्या संघाकडून खेळणार? मुंबई, चेन्नई की..

बुधवार, 20 डिसेंबर 2023 (17:00 IST)
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एक नवं वादळ आलं आहे. त्याचा भारतीय संघाशी संबंध नाही. पण आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्सबरोबर संबंध आहे.या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे रोहित शर्मा.
मुंबई इंडियन्स संघाच्या व्यवस्थापनानं नुकतीच पुढच्या हंगामासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्या कर्णधार असेल अशी घोषणा केली. त्यानंतर इंटरनेटवर जणू भूकंप आला. मुंबई इंडियन्सचे लाखो चाहते यामुळं निराश झाले.
 
याचा परिणाम म्हणजे मुंबई इंडियन्सनं त्यांच्या X आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लाखो चाहते गमावले आहेत. घोषणेच्या पहिल्याच दिवशी चार लाख लोकांनी मुंबई इंडियन्सच्या संघाच्या पेजला अनफॉलो केलं.
 
त्याचबरोबर काही चाहते मुंबई इंडियन्सची जर्सी आणि टोप्या जाळत असल्याचे फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले.
 
चाहत्यांनी त्यांची नाराजी अगदी स्पष्टपणे जाहीर केली. तर माजी क्रिकेटपटुंनीदेखील या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
 
माजी भारतीय क्रिकेटपटू काय म्हणतात?
भारताचे माजी क्रिकेटपटू इरपान पठाण म्हणाले की, रोहित शर्माचं मुंबई इंडियन्स संघातील स्थान हे चेन्नई सुपर किंग्ज संघात धोनीचं जे स्थान आहे त्याच बरोबरीचं आहे.
 
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, "रोहित शर्मा संघात सर्वोच्च स्थानी आहे. माझ्या दृष्टीनं चेन्नईच्या संघात धोनीचं जे स्थान आहे, तसंच रोहितचं आहे. रोहित शर्मानं घाम आणि रक्त गाळून मुंबईचा संघ तयार केला आहे. कर्णधार म्हणूनही त्यानं मोठं योगदान दिलं आहे.
 
दरम्यान, मुंबई इंडियन्स संघातील सदस्य आणि सध्या भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवनं ब्रोकन हार्टचा इमोजी शेअर केला असून, तोही व्हायरल झाला आहे.
 
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र मुंबई इंडियन्सच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. रोहित शर्मा आता थकला असून, संघाला नव्या पद्धतीनं विचार करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचं ते म्हणाले.
 
"हा निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चा करण्याऐवजी, तो संघाच्या चांगल्या भवितव्याचा विचार करून घेतला आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. रोहितचं फलंदाजीतील योगदानही कमी झालं होतं," असं ते स्टार स्पोर्टसबरोबर बोलताना म्हणाले.
 
मुंबईच्या संघाला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं
रोहित शर्माला यावेळी कर्णधार पदावरून हटवलं जाईल असा विचारही कोणी केला नसेल. आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितनं मुंबई इंडियन्सच्या संघाला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे.
 
त्याची फलंदाजीची खास शैली आणि नेतृत्व गुण या जोरावर तो संघातला असा सदस्य बनला, ज्याची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.
 
रोहितनं 2011 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी त्यानं 33.81 च्या सरासरीनं 372 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्ससाठी त्यानं 31च्या सरासरीनं एकूण 5230 धावा केल्या आहेत. त्यात 40 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे.
 
या कामगिरीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 130 होता. त्यामुळं अनेकदा त्यानं संघाला चांगली सुरुवात करण्यात मदत केली. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याची बॅट काहीशी शांत असल्याचं दिसत आहे. पण हा फॉर्म लवकरच परतलाही असता. कारण तो आणखी काही वर्षे टी 20 खेळेल अशी शक्यता आहे.
 
2013 मध्ये रिकी पाँटिंगनं मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्न मध्येच सोडलं होतं, त्यावेळी रोहित शर्माकडं या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली.
 
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघानं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. जवळपास 10 वर्षांमध्ये रोहित शर्मानं 158 सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं. त्यापैकी 87 सामन्यांत संघानं विजय मिळवला तर 67 सामन्यांत मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला.
 
या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचं कारण काय?
रोहितचा फॉर्म हे या निर्णयाच्या मागचं कारण असावं, असं मत क्रिकेटमधील तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
 
हार्दिक पांड्याला दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सनं गुजरातला ट्रेड केलं होतं. हार्दिकच्या नेतृत्वात या नव्या संघानं आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. तर गेल्यावर्षी गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला होता.
 
दुसरीकडं गेल्या काही वर्षांत मुंबईच्या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 2020 मध्ये संघानं विजेतेपद पटकावलं होतं. नंतर गेल्या दोन्ही वर्षांत मुंबईला फायनल गाठता आली नाही. तसंच गेल्या दोन वर्षांत रोहितनंही फार कमी धावा केल्या आहेत.
 
2022 मध्ये रोहितनं 14 सामन्यांत 19 च्या सरासरीनं 268 धावा केल्या. तर 2023 मध्ये 16 सामन्यांत 20.75 च्या सरासरीनं त्यानं 332 धावा केल्या. गेल्या दोन हंगामांमध्ये त्यानं फक्त दोन अर्धशतकं केली आहेत. तर एकही शतक त्याला करता आलेलं नाही.
 
रोहित शर्मानं नोव्हेंबर 2022 पासून भारतासाठीही टी 20 सामना खेळलेला नाही. तसंच या संघाचं नेतृत्वही त्याच्याकडून हार्दिक पांड्याकडं गेलं आहे.
 
त्यासाठी असाही तर्क देण्यात आला की, वन डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी संघ व्यवस्थापनानं रोहित, विराट आणि जडेजा सारख्या खेळाडुंना टी 20 मधून ब्रेक दिला होता. त्यामुळं त्यांची टी 20 मधील कारकिर्द संपुष्टात आली असा त्याचा अर्थ होत नाही.
 
रोहित शर्माचा पुढील निर्णय काय?
आता रोहित शर्माचा पुढचा निर्णय काय असेल याकडं सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
 
तसंच तो हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार की, दुसऱ्या एखाद्या संघाचं नेतृत्व स्वीकारणार याबाबतही प्रश्न केले जात आहेत.
 
आयपीएलचा लिलाव 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळं सर्वच संघाना चांगले खेळाडू घेण्याची संधी असेल. अशा परिस्थितीत दुसऱ्या एखाद्या संघानं रोहितच्या नावाचा विचार केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
 
2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईनं 16 कोटी रुपयांत रोहित शर्माला रिटेन केलं होतं. त्यामुळं ज्या संघाला रोहितला संघात घ्यायचं असेल, त्यांच्याकडं किमान 16 कोटी रुपये असणं गरजेचं आहे.
 
रोहित मुंबई इंडिन्सची साथ सोडणार का?
चेन्नई सुपर किंग्जनं जेव्हा रोहित शर्माला सॅल्युट करणारी पोस्ट केली, तेव्हा रोहितची पत्नी रितिकानंही त्या पोस्टला लाईक केलं. त्यामुळं रोहित शर्माला चेन्नई सुपर किंग्जचा संघ खरेदी करणार अशा आशा चाहत्यांमध्ये निर्माण झाल्या आहेत.
 
तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी एका गोष्टीकडं लक्ष वेधलं आहे. एकिकडं मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनानं गेल्या काही वर्षांत वरिष्ठ खेळाडुंकडं दुर्लक्ष केलं आहे. तर त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जनं अशा क्रिकेटपटुंना खरेदी करत त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतल्याचं पाहायला मिळालं.
 
पण रोहित शर्माला असं करायची इच्छा असेल का? की तो आणखी काही वर्षं त्याच्या आवडत्या संघासाठीच खेळत राहील आणि भविष्यात त्यांचाच मेंटॉर बनेल? या प्रश्नांची उत्तर मिळवायला काही काळ थांबावं लागेल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती