शशांक सिंगच्या 25 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 46 धावा आणि आशुतोष शर्माच्या 15 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 33 धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने एका रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जचा दोन धावांनी पराभव केला. उभय संघांमधील सामना शेवटच्या षटकात अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला. पंजाबला विजयासाठी शेवटच्या सहा चेंडूत 29 धावांची गरज होती, पण संघाला केवळ 27 धावा करता आल्या. शशांक आणि आशुतोषच्या स्फोटक खेळीनंतरही पंजाबला सहा गड्यांच्या मोबदल्यात 180 धावाच करता आल्या. हैदराबादकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन बळी घेतले.
नितीश रेड्डीच्या 37 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने केलेल्या 64 धावांच्या बळावर हैदराबादने 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. पंजाबकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने चार, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचा हा सर्वात लहान विजय आहे. यापूर्वी 2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन धावांनी विजय नोंदवला होता.
विजयानंतर हैदराबादचा संघ पाच सामन्यातील तीन विजय आणि दोन पराभवानंतर सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्जचा पाच सामन्यातील हा तिसरा पराभव असून ते टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. या सामन्यात पंजाबच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळाली. पंजाबच्या वेगवान गोलंदाजांनी एकूण 16 षटके टाकली आणि 132 धावा देत नऊ गडी बाद केले. या काळात वेगवान गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट 8.25 होता.