घर में शेर, बाहर खरगोश, पाक पत्रकाराची भारतीय संघावर टीका

भारतीय संघाने इंग्लंडाविरुद्धची मालिका 4-0 अशी जिंकल्यानंतर पाकिस्तान पत्रकार उमर कुरेशी याचा भलताच जळफळाट झालेला दिसतो आहे. चेन्नई कसोटीत इंग्लंडाविरुद्ध 1 डाव आणि 75 धावांनी विजय प्राप्त केल्यानंतर भारतीय संघाने स्टेडियमवर विजयाचे सेलिब्रेशन केले. संपूर्ण भारतात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील कसोटी संघाचे कौतुक केले जात असताना पाकिस्तानचा पत्रकार उमर कुरेशी याने मात्र भारतीय संघाने मायभूमीत इंग्लंडवर 4-0 अशी मात केली, पण टीम इंडिया घर में शेर, बाहर खरगोश आहे, असे ट्विट उमर कुरेशी याने केले आहे.
 
याशिवाय, भारतीय संघाने इंग्लंडाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतातील प्रसारमाध्यमांना देखील विजयाचा उन्माद झाला आहे, असेही एक ट्विट कुरेशीने केले आहे. भारतीय चाहत्यांनी त्याला फैलावर घेतले आहे. घरच्या मैदानात मालिका जिंकण्याचा आनंद काय असतो हे कुरेशीला समजणार तरी कसे? दहशतवादामुळे कोणताही संघ पाकिस्तानचा दौरा करत नाही, असे प्रत्युत्तर एका नेटिझनने केले आहे. आणखी एक नेटिझनने तर पाकिस्तानने मायभूमीतील क्रिकेट मालिकेबाबत बोलणे म्हणजे एका टक्कल असलेल्या व्यक्तीने कंगव्याबद्दल बोलण्यासारखे असल्याची टीका केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मिळविलेल्या विजयाची आकडेवारी देऊन उमरने केलेले ट्विट कसे हास्यास्पद आहे हे देखील एका नेटिझनने पटवून दिले आहे.
 
भारतीय संघाने लागोपाठ पाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने परदेशातदेखील कसोटी मालिका जिंकली आहे. सप्टेंबर 2015 नंतर भारतीय संघ एकही कसोटी मालिका पराभूत झालेला नाही. 
 
पाकिस्तानात एका फुटबॉल सामन्यादरम्यान गोलरक्षकाने खेळाडूला केलेल्या मारहाणीच्या व्हिडिओचा संदर्भ देऊन एका खेलाडूने पाकिस्तान अशा प्रकारे फुटबॉल खेळून ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहणार का? असा सवाल नेटिझनने उपस्थित केला आहे.

वेबदुनिया वर वाचा