या वादानंतर शमीने ट्विटरवर याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या बातम्या येत आहेत, त्या सर्वस्वी खोट्या आहेत. हा माझ्याविरोधातील मोठा कट आहे. मला बदनाम करणं आणि माझं खेळावरुन लक्ष हटवण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे”, असं शमीने म्हटलं आहे.
तर शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन यांनी शमीवरील आरोप फेटाळले आहेत. “मोहम्मद शमी हा खूपच लाजरा आणि एकटा एकटा राहणारा मुलगा आहे. मुलींसोबतचे संबंध तर दूरचाच विषय आहे. मी त्याला जवळून ओळखतो. त्याच्या पत्नीने जी पोस्ट लिहिली आहे, तसा शमी अजिबात नाही. जर काही वाद होते, तर ते बंद दाराआड मिटवायला हवे होते. मला वाटत नाही, त्यांच्यात इतके टोकाचे वाद होते. शमी आफ्रिका दौऱ्यावर होता, त्यावेळी माझं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं. आता पुढे भेटेल तेव्हा बातचीत होईल. मात्र शमी त्यातला नाही हा माझा विश्वास आहे” असे म्हटले आहे.