आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरुवात होण्यास आता अवघे काही दिवस उरले असून सर्व संघांनी त्याची तयारी पूर्ण केली आहे. IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात, चेपॉक स्टेडियमवर 22 मार्च रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध सामना होईल. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सही नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे, मात्र त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका दुखापतग्रस्त झाल्याने तो आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे. मुंबई इंडियन्सला त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मधुशंका चांगली गोलंदाजी करत होता आणि त्याने 6.4 षटकांच्या स्पेलमध्ये 30 धावांत दोन बळी घेतले. त्याने पहिल्याच षटकात लिटन दासला बाद केले आणि पहिल्या पॉवरप्लेनंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाद केले. मात्र, त्यानंतर दुखापत झाल्याने तो पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही. एमआरआय स्कॅनमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीची पुष्टी झाल्याचे श्रीलंका क्रिकेटने सांगितले. यामुळे मदुशंका पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर राहू शकतो आणि तो 1 एप्रिल रोजी होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होणार की नाही हे पाहणे बाकी आहे.