मी यापुढे ही चेन्नईकडून खेळत राहणार : धोनी

बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (11:46 IST)
आयपीएलच्या १३ व्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती. आयपीएलच्या इतिहासात फायनल्सच्या शर्यतीत राहणारा हा संघ यावेळी मात्र साखळी फेरीतच गारद झाला. गुणतालिकेत हा संघ थेट सातव्या स्थानी फेकला गेला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास घेतलेला धोनी पुढे खेळणार की नाही, अशी चाहत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. तथपि नंतर धोनीनेच आपण चेन्नईकडून खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावर माजी खेळाडू आणि सध्या समालोचक असलेला आकाश चोप्रा याने पुढच्या वर्षी आयपीएलसाठी लिलाव झाल्यास सीएसकेने धोनीला सोडून द्यायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

‘माझ्या मते पुढील सत्रात लिलाव झाल्यास चेन्नईने धोनीला सोडून द्यावे. लिलाव झाल्यास पुढील तीन वर्षांसाठी तुम्ही त्या खेळाडूला संघात ठेवू शकता. पण धोनी तीन वर्ष तुमच्यासोबत राहणार आहे का? चेन्नईने धोनीला संघात कायम ठेवले तर प्रत्येक वर्षी १५ कोटी द्यावे लागतील. समजा धोनीने २०२२ पासून न खेळण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण त्या तोडीचा खेळाडू मिळणार आहे का? मेगा ऑक्शनचा हाच फायदा असतो, तुम्ही तुम्हाला हवीतशी टीम तयार करू शकता. धोनीला सोडून दिल्यास पुन्हा खेळाडू अदलाबदल प्रक्रियेनुसार संघात परत घेण्याचा पर्याय खुला राहणारच आहे. सीएसकेने धोनीला सोडणे योग्यच ठरणार आहे,’ असे मत आकाश चोप्राने स्वत:च्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात मांडले.

सध्याच्या आठही संघांपैकी चेन्नईच्या संघाला ऑक्शनची सर्वात जास्त गरज असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. चेन्नईला यंदा अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनुभवी खेळाडूंचे फॉर्मात नसणे संघाला चांगलेच भोवले. पुढच्या वर्षी नव्या दमाच्या खेळाडूंनिशी मैदानात उतरण्याचे संकेत धोनीने दिले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती