क्रिकेटचे साहित्य बनवणार्यास स्पार्टन कंपनीविरोधातील न्यायालयिन लढ्यात सचिन तेंडुलकरने बाजी मारली आहे. करार संपल्यानंतरही आपल्या नावाचा वापर करत कंपनीने बाजारात उत्पादने प्रमोट केल्याचा आरोप करत सचिनने ऑस्ट्रेलियातील फेडरल कोर्टात दावा ठोकला होता. यावेळी सचिनने कंपनीवर करारामधील नियमांचे पालन न करणे, ब्रँड एंडोर्समेंटसाठी ठरलेली रक्कम न देण्याचाही ठपका ठेवला होता. अखेरीस कंपनीने आपली चूक मान्य करत सचिनची माफी मागितलेली आहे.
स्पार्टन कंपनीच्या प्रमोशनसाठी मुंबई आणि लंडनमध्ये काही कार्यक्रमही केले होते. मात्र कंपनीने करारातील सर्व नियमांचा भंग केल्याचा आरोप सचिनने केला होता. अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या समजुतीनंतर, आपली चूक मान्य करत कोर्टाच्या आदेशानुसार सचिनचे नाव किंवा त्याचा फोटो आपल्या उत्पादनांवर न वापरण्याचे मान्य केले आहे. 17 डिसेंबर 2018 नंतर स्पार्टन आणि सचिन यांच्यातला करार अधिकृतरित्या संपलेला आहे, यानंतरच्या कोणत्याही उत्पादनांसाठी कंपनी सचिनचं नाव वापरणार नाही, असे स्पार्टनचे संचालक लेस गलाब्रेथ यांनी स्पष्ट केले.