आयपीएल लिलावाबाबत जाणून घ्या या 7 गोष्टी

शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (12:41 IST)
इंडियन प्रीमिअर लीगच्या 16व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 23 डिसेंबरला कोचीत लिलावाची प्रक्रिया होणार आहे.
 
1.लिलावात किती खेळाडू असणार आहेत?
जवळपास एक हजार खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. आयपीएल प्रशासनाने संघांशी चर्चा करुन ही यादी 405 वर आणली आहे.
 
10 संघांनी मिळून 369 खेळाडूंची सूची आयपीएल प्रशासनाला दिली. त्यानंतर संघांनी अंतर्गत बैठकांनंतर आणखी 36 खेळाडूंची नावं लिलावात समावेश करण्यासंदर्भात विनंती केली. त्यामुळे 405 खेळाडूंसाठी लिलाव होईल.
यामध्ये 273 भारतीय तर 132 विदेशी खेळाडू आहेत. असोसिएट संघांचे 4 प्रतिनिधी आहेत. 405 खेळाडूंपैकी 119 खेळाडूंनी आपापल्या राष्ट्रीय संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. 282 असे खेळाडू आहेत जे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळत आहेत. 87 विविध स्लॉट्स अर्थात गट निश्चित करण्यात आले आहेत.
 
2.बेस प्राईज
2 कोटी रुपये ही लिलावातील सर्वोच्च बेस प्राईज आहे.
19 विदेशी खेळाडूंनी आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये पक्की केली आहे. 11 खेळाडूंच बेस प्राईज 1.5 कोटी रुपये आहे.
 
3. दोन कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू कोण आहेत?
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, फिल सॉल्ट, सॅम करन, टॉम बॅन्टन, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, जेमी ओव्हर्टन, क्रेग ओव्हर्टन, टायमिल मिल्स या इंग्लंडच्या खेळाडूंनी बेस प्राईज 2 कोटी रुपये पक्की केली आहे. यांच्यासह ऑस्ट्रेलियाचा कॅमेरुन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस लिन शर्यतीत आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे रायली रुसो आणि रासी व्हॅन डर डूसेचंही नाव आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आणि जेसन होल्डर, न्यूझीलंडचे जेमी नीशाम आणि अडम मिलने हेही रिंगणात आहेत.
 
4. लक्षवेधी खेळाडू
इंग्लंडला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कर्णधार बेन स्टोक्स लिलावाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.
स्टोक्सच्या बरोबरीने अष्टपैलू सॅम करनला कोटीच्या कोटी बोली लागू शकते. नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सॅम करला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
तिन्ही प्रकारात अष्टपैलू कामगिरी करणारा कॅमेरुन ग्रीन संघांच्या रडारवर असू शकतो.
 
ट्वेन्टी20, वनडे आणि टेस्ट अशा तिन्ही प्रकारात धावांची टांकसाळ उघडणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी संघ आतूर आहेत. ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू चमकदार कामगिरी करणारा झिम्बाब्वेचा सिकंदर रझा अनेक संघांच्या रडारवर असू शकतो.
खणखणीत तंत्रकौशल्यासाठी प्रसिद्ध अजिंक्य रहाणे आणि जो रुट यांच्यासह अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकत लिलावात आहेत.
सय्यद मुश्ताक अली तसंच विजय हजारे स्पर्धेत दमदार कामगिरी करणारे भारतीय खेळाडूंवरही लक्ष असणार आहे.
 
5. भारताचे कोणते खेळाडू चर्चेत?
पंजाब किंग्ज संघाचा माजी कर्णधार मयांक अगरवाल, आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू मनीष पांडे यांच्याकडे विविध संघांचं लक्ष असणार आहे.
 
6. कोणत्या संघाकडे किती पैसे आणि किती खेळाडू घेऊ शकतात?
चेन्नई सुपर किंग्सकडे 18 खेळाडू आहेत. त्यांच्याकडे लिलावासाठी 20.45 कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यांना 7 खेळाडू हवे आहेत.
 
दिल्ली कॅपिटल्स संघाने लिलावापूर्वी मर्यादित बदल केले आहेत. त्यांच्याकडे 20 खेळाडू आहेत. लिलावात त्यांच्याकडे 19.45 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 5 खेळाडू खरेदी करायचे आहेत.
 
गतविजेते गुजरात टायटन्स संघाकडे 18 खेळाडू आहेत. लिलावासाठी त्यांच्याकडे 19.25 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 7 खेळाडू खरेदी करायचे आहेत.
 
कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी समीकरण अत्यंत कठीण आहे. त्यांच्याकडे 14च खेळाडू आहेत. त्यांना 11 खेळाडू खरेदी करायचे आहेत पण त्यांच्याकडे 7.05 कोटी रुपयेच आहेत.
 
लखनौ सुपरजायंट्स संघाकडे 15 खेळाडू आहेत. त्यांच्याकडे लिलावासाठी 23.35 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 10 खेळाडूंची आवश्यकता आहे.
 
मुंबई इंडियन्स संघाने लिलावापूर्वी असंख्य खेळाडूंना रिलीज केलं. त्यांच्याकडे 16 खेळाडू आहेत. आता त्यांना 9 खेळाडू हवे आहेत आणि त्यांच्याकडे 20.55 कोटी रुपये आहेत.
 
पंजाब किंग्ज संघाने संघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्याकडे 16 खेळाडू आहेत. लिलावात त्यांच्याकडे 32.2 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 9 खेळाडू हवे आहेत.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने फार मोठे बदल केलेले नाहीत. त्यांच्याकडे 18 खेळाडू आहेत. लिलावासाठी त्यांच्याकडे 8.75 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 7 खेळाडू घ्यायचे आहेत.
 
राजस्थान रॉयल्सकडे 16 खेळाडू आहेत. 9 खेळाडू खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे 13.2 कोटी रुपये आहेत.
 
सनरायझर्स हैदराबाद संघाने सगळा ढाचा बदलून टाकला आहे. त्यांच्याकडे 12 खेळाडू आहेत. लिलावासाठी त्यांच्याकडे तब्बल 42.25 रुपये आहेत आणि त्यांना 13 खेळाडूंची आवश्यकता आहे.
 
7. रिलीज केलेले खेळाडू
 
प्रत्येक संघाने लिलावाच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंना संघातून वगळलं.
 
चेन्नई सुपर किंग्स- अडम मिलने, सी.हरी निसांथ, ख्रिस जॉर्डन, ड्वेन ब्राव्हो, के.भगत वर्मा, के.एम.आसिफ, एन.जगदीशन, रॉबिन उथप्पा
 
दिल्ली कॅपिटल्स- अश्विन हेब्बार, के.एस.भरत, मनदीप सिंग, टीम सैफर्ट
 
गुजरात टायटन्स- डॉमनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग मान, जेसन रॉय, वरुण आरोन
 
कोलकाता नाईट रायडर्स- आरोन फिंच, अभिजीत तोमार, अजिंक्य रहाणे, अलेक्स हेल्स, अशोक शर्मा, बाबा इंदरजीत, चामिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, पॅट कमिन्स, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक धार, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन, शिवम मावी
 
लखनौ सुपरजायंट्स- अँड्यू टाय, अंकित राजपूत, दुश्मंत चमीरा, एल्विन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाझ नदीम
 
मुंबई इंडियन्स- अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बेसिल थंपी, डॅनियल सॅम्स, फॅबिअन अलन, जयदेव उनाडकत, कायरेन पोलार्ड, मयांक मार्कंडेय, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरडिथ, संजय यादव, टायमल मिल्स
 
पंजाब किंग्ज- मयांक अगरवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, वृत्तिक चॅटर्जी
 
राजस्थान रॉयल्स- अनुनुय सिंग, कॉर्बिन बॉच, डॅरेल मिचेल, जेम्स नीशाम, करुण नायर, नॅथन कोल्टिअर नील, रासी व्हॅन डर डुसे, शुभम गहरवाल, तेजस बरोका
 
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- अनीश्वर गौतम, चामा मिलिंद, लुवनिथ सिसोदिया, शेरफेन रुदरफोर्ड
 
सनरायझर्स हैदराबाद- जगदीश सुचिथ, केन विल्यमसन, निकोलस पूरन, प्रियम गर्ग, आर.समर्थ, रोमारिओ शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती