कोची टस्कर्स केरळ या आयपीएल फ्रँचाईसीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलबिंत केले असून २०१२ मधील हंगामात खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. या फ्रँचाईसीने संघाच्या मालकी हक्कासाठीचे आवश्यक शुल्क बीसीसीआयला दिले नाही.
मुंबईत मंडळाच्या बैठकीतनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी ही माहिती दिली. केरळ फ्रँचाईसीने कराराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
२०११ मधील हंगामात अगोदर ठरल्यापेक्षा कमी सामने खेळायला मिळाल्याने शुल्कात कपात करावी, असा युक्तिवाद केरळ फ्रँचाईसीने केला होता. मात्र बीसीसीयाने त्यांना पूर्ण रक्कम भरण्यास सांगितले. मात्र केरळ संघाच्या मालकाने अद्यापपर्यंत आवश्यक रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
यामुळे आयपीएलमध्ये आता फक्त ९ संघ शिल्लक राहिले असून नवीन संघाच्या समावेशाबाबत आयपीएलची कार्रकारी परिषद निर्णय घेईल, असे सांगण्यात आले.