ऐतिहासिक ५००व्या कसोटीत भारताने न्युझीलंडवर १९७ धावांनी विजय मिळवला. दुस-या इनिंग्जमध्ये न्युझीलंडसमोर विजयासाठी ४३४ धावांचे आव्हान असता ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर भारताने न्युझीलंडचे सर्व गडी २३६ धावांत बाद केले आणि पहिली कसोटी जिंकत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. दुस-या इनिंगमध्ये आर. अश्विनने ६, मोहम्मद शमीने २ व सहाने १ बळी टिपला.
वेस्ट इंडिज दौ-यातील शवेटचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिल्याने टेस्ट रँकिंगमध्ये भारताची दुस-या स्थानावर घसरण झाली व पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आला. मात्र न्युझीलंडविरोधातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने आजचा सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतल्याने भारत टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होण्याची दाट शक्यता आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपताना पाहुण्या न्यूझीलंड संघाची आघाडीचे ४ फलंदाज अवघ्या ९४ धावांत तंबूत परतले. मात्र पाचव्या दिवसाचा खेळ सुरू करताना राँची (८०) आणि संटनर (७१) यांनी सावध खेळी करत संघाला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. त्यानंतर अश्विनने पुन्हा एकदा फिरकीचा जादू दाखवत राँचीला बाद करत त्यांची जोडी फोडली. सँटनरने ७१ धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरायचा प्रयत्न केला खरा, मात्र इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने त्यांचे सर्व गडी २३६ धावांत बाद झाले.
न्युझीलंडतर्फे लॅथम (२), गुप्टिल (०), विल्यमसन (२५), टेलर (१७), राँची (८०), सँटनर (७१), वॉटलिंग (१८), क्रेग (१), सोधी (१७), वॅगनर (०) आणि बोल्टने नाबाद २ धावा केल्या.