ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' हा चित्रपट येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'एल्गार' हे गाणं नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. गाण्याच्या सुरुवातीलाच एक आई तिच्या पंखांखाली वाढणाऱ्या मुलींना उंच आभाळात उडण्याचे स्वप्न दाखवते. कालांतराने तेजश्री आणि तिच्या आईच्या आयुष्यात घडणाऱ्या एका घटनेमुळे आईला न्याय मिळवून देण्यासाठी तेजश्री तिच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. यात ती अनेक चढ-उतार पार करत आहे. आईला न्याय मिळवून देण्याचा दृढ निश्चय करून आपल्या चालाख वडिलांविरुद्ध तेजश्री 'एल्गार' पुकारते. जावेद अली यांच्या जादुई आवाजात असलेले 'एल्गार' हे गाणं एका मुलीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणारे आहे. या गाण्याला नवल शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे.
या चित्रपटात मंगेश देसाई, तेजश्री प्रधान यांच्या मुख्य भूमिका आहे. सोबतच 'श्री पार्टनर' फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये, महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत. निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या "ऋण" कादंबरीवर आधारित आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे असून सह निर्मात्याची धुरा हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी सांभाळली आहे.