मराठी चित्रपटांमधील स्पर्धा टळावी यासाठी या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड, निर्माते दिलीप लालासाहेब पाटील आणि चौकच्या सर्व टीमने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेण्याचे ठरवले.
यासंदर्भात दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की, आमच्याच मित्रांचे बलोच आणि रावरंभा हे चित्रपट मे मध्ये प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चौक चित्रपटाची १२ मे ही तारीख बदलून आता १९ मे करण्यात आली आहे. त्यामुळे १९ मे ला हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच बघा!
तर प्रविण तरडे म्हणाले की, इतर चित्रपटांचा विचार करून, आमचा मित्र दया याने त्याचा चौक हा चित्रपट एक आठवडा पुढे घेत एक अभिमानास्पद पाऊल उचललं आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त चौकच्या टीमने केक कापत आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा दिल्या आणि त्याचवेळी तारीख पुढे घेण्याची घोषणा केली. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड, अभिनेते प्रविण तरडे, रमेश परदेशी, स्नेहल तरडे, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, चित्रपटाचे मार्केटिंग हेड विनोद सातव व आदी मान्यवर उपस्थित होते. आता चौक हा चित्रपट १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.