'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला

शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 (15:38 IST)
रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स  मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’,‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या  म्हणींतून या बॅकबेंचर्सची  मजेशीर ओळख ही करून देण्यात आली आहे.  या म्हणींची भानगड आणि त्यामागची गंमत हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर 28 फेब्रुवारीला चित्रपटगृहात येणारा 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.  
 
शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित करणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये दिसणारा पार्टीतला गोंधळ आणि सोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे अशा कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी काहीतरी धमाल घडवणार हे दाखवतोय. यासोबतच नम्रता संभेराव,वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, चेतना भट, ,निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे  हे कलाकारही  चित्रपटात धमाल आणणार आहेत.
 
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.
 
धमाल मस्तीचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांसाठी एक वेगळीच ट्रीट असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती