सुनिल मगरे दिग्दर्शित 'फ्री हिट दणका' हा सिनेमा १६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर, कलाकार समोर आल्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'रंग प्रीतीचा बावरा' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे या मुख्य जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे तर संजय नवगिरे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे.
या गाण्याच्या चित्रीकरणाचा एक किस्सा दिग्दर्शक सुनील मगरे यांनी प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे, ''या गाण्याचे चित्रीकरण आम्ही कोरोनाच्या काळात केले आहे. अर्थात सर्व नियम आणि अटींचे पालन करून. 'रंग प्रीतीचा बावरा' हे मॉन्टाज गीत असल्याने आम्हाला ते वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करायचे होते. एका सीनसाठी आम्ही नगर जिल्ह्यातील माणगंगा, पारनेर हा भाग निवडला होता. सकाळी ७ वाजता शूट सुरु होणार होते. त्यानुसार आम्ही शूटिंगच्या स्थळी पोहोचलो. जिथे शूट होणार होते तिथे सापांचा सुळसुळाट होता. त्यामुळे शूट कसे करायचे हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. सापांमुळे अपूर्वाही घाबरत होती. अखेर सुरक्षेच्या दृष्टीने मग काही सर्पमित्र बोलवून आम्ही ती जागा सुरक्षित करून घेतली. या सगळ्यात सातचे शूटिंग बारा वाजता सुरु झाले. या सगळ्या परिस्थितीत कलाकारांसह संपूर्ण टीमने खूप सहकार्य केले. तसे पाहता ही जागा धोकादायक असतानाही सर्वांनीच खूप हिम्मत दाखवली आणि या गाण्याचे चित्रीकरण नीट पार पडले. चित्रीकरणादरम्यान आलेला हा तणाव पडद्यावर प्रेक्षकांना कुठेही जाणवणार नाही.''
एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांची असून चित्रपटाचे निर्माता अतुल रामचंद्र तरडे, आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे आहेत. सहनिर्माता म्हणून नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी काम पाहिले असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे तर चित्रपटाचे छायाचित्रण वीर धवल पाटील यांचे आहे.