बॉलिवूडकरांनाही 'स्माईल प्लीज'ची भुरळ

बुधवार, 10 जुलै 2019 (09:47 IST)
'स्माईल प्लीज' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयामुळे ओळखला जाणारा रितेश देशमुख याने सर्वप्रथम 'स्माईल प्लीज' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले. या पोस्टरला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली. करण जोहर सारख्या नामी दिग्दर्शकाने 'स्माईल प्लीज' चा टिझर रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता अधिकच वाढली. आणि आता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने  'स्माईल प्लीज'चा ट्रेलर रिलीज केल्यानंतर या चित्रपटाविषयची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. "विक्रम आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. विक्रमचा फॅशन डिझायनर ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. हा चित्रपट विक्रमने खूप मनापासून बनवला आहे. चित्रपटातील कसलेले कलाकार, उत्कृष्ट पटकथा, त्याला साजेशी गाणी अशी एकंदरच मस्त भट्टी जमून आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवून चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आणेल.’’असे उद्गार या वेळी शाहरूख खान याने काढले. 
 
आपल्या जीवनात आलेला अंधार आपण आपल्या सकारात्मक विचारांनी दूर सारू शकतो. आपल्या विचारांवर आपलेच नियंत्रण असते. एकंदरच आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारा हा कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणे असून त्यातील 'श्वास दे' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. रोहन प्रधान यांनी स्वरबद्ध केलेले हे गाणे चांगलेच गाजत आहे. 'स्माईल प्लीज' चित्रपटाचे आणखीन एक आकर्षण म्हणजे या सिनेमातील 'अँथम सॉन्ग'. या चित्रपटात एक अँथम सॉन्ग' असून त्यात मराठी सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांची झलक पाहायला मिळणार आहे. लवकरच हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
 
'हृदयांतर' हा यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर पुन्हा एकदा विक्रम फडणीस यांनी 'स्माईल प्लीज' या दर्जेदार चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विक्रम फडणीस यांनी हा चित्रपट त्यांच्या आईला समर्पित केला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाची पटकथा विक्रम फडणीस, इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाला रोहन-रोहन यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांनी समर्पक गीते लिहिली आहेत. तर सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, रोहन प्रधान, मुग्धा कऱ्हाडे यांनी गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को यांनी नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून डीओपीचे काम मिलिंद जोग यांनी पहिले आहे. हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती