... म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला पैसे दिले

सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (15:45 IST)
हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने प्राजक्ता माळी लंडनला गेली होती. लंडनला चित्रीकरणासाठी जाण्यासाठी प्राजक्ता खूपच उत्सुक होती आणि यासाठी दोन कारणे होती. एक म्हणजे लंडनमध्ये चित्रीकरण होते यासाठी आणि दुसरे म्हणजे तिला सौंदर्यप्रसाधनांची आणि इतर बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती. यासाठी ती  भरपूर पैसेही घेऊन गेली होती. मात्र तिची निराशा झाली. ज्या उद्देशाने ती एवढे पैसे घेऊन गेली त्याचा फारसा उपयोगच झाला नाही. तिला चित्रीकरणातून वेळच मिळाला नाही त्यामुळे तिला मनासारखी खरेदीही करता आली नाही. नेमके त्याच वेळी आलोक राजवाडेचे कार्ड बंद पडल्याने आणि प्राजक्ताकडे भरपूर पैसे उरल्याने तिने ते पैसे आलोकला दिले.
याबद्दल प्राजक्ता माळी म्हणते, '' मला लंडनमध्ये खूप खरेदी करायची होती. परंतु माझे चित्रीकरणाचे शेड्युल असे होते, की मला खरेदीसाठी वेळच मिळायचा नाही. माझा शॉट अर्धा तासासाठी असला तरी माझा पूर्ण दिवस जायचा. अखेर जायच्या आधी मला केवळ अर्धा दिवस शॉपिंगसाठी मिळाला. त्यात मी माझ्या भाच्यांसाठी आणि जमेल त्या वस्तू खरेदी केल्या. मनासारखी खरेदी न झाल्याने माझे बरेच पैसे उरले. त्यात आलोकला गरज होती म्हणून मी माझ्याकडचे पैसे दिले. अर्थात आलोकने ते पैसे परत केले.''
 
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य निर्मित या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे,आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती