मराठी भाषेला लाभलेला साहित्यिक वारसा जपण्याच्या आणि सातासमुद्रापार पोहोचवण्याच्या दूरदृष्टीने सुरु करण्यात आलेला पहिलेवहिले मराठी ओटीटी 'प्लॅनेट मराठी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी एका नवीन आणि आकर्षक स्वरूपातील लोगोसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी आता सज्ज झाले आहे. यापूर्वी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ने आपल्या आगामी वेबसिरीज, वेबफिल्म्स आणि चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 'जून'. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चा शुभारंभ 'जून' या चित्रपटाने होणार असून यातील गाणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. शाल्मलीच्या सुमधुर आवाजातील 'हा वारा' हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे तर शाल्मलीने संगीत दिले आहे. अवघ्या औरंगाबादची सफर घडवणारे हे गाणे मनाला स्फूर्ती देणारे आहे.
हे एक मोंटाज सॉंग असून औरंगाबादमधील अनेक प्रेक्षणीय स्थळे, मार्केट, गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मुळात नेहा आणि सिद्धार्थ हे दोन्ही चेहरे नावाजलेले असल्यामुळे त्यांच्यासोबत अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे खरंच खूप आव्हानात्मक होते. तरीही प्रॉडक्शन टीमने आणि दिग्दर्शकांनी औरंगाबादकरांचे जनजीवन विस्कळीत होऊ न देता तसेच कलाकारांनाही कोणताही त्रास होऊ न देता या गाण्याचे चित्रीकरण यशस्वीरित्या पार पाडले.
या गाण्याबद्दल शाल्मली म्हणते, '' खरं सांगायचं तर हे गाणे मी गाताना खूपच एन्जॉय केले आहे. मनाला स्पर्श करणारे हे गीत प्रवासादरम्यान सुखद अनुभव देणारे आहे. श्रोत्यांना हे गाणे नक्कीच आवडेल.'' तर या गाण्याबद्दल नेहा आणि सिद्धार्थ सांगतात,'' एखादी व्यक्तिरेखा साकारताना अनेकदा आपण त्यात गुंतून जातो. त्यातही एखादा भावनिक विषय असेल तर आपोआपच आजूबाजूचं वातावरणही नकळत भावनिकच झालेलं असतं. त्यामुळे 'हा वारा' या गाण्याने आम्हाला जरा उत्साही केले. या गाण्यात आम्ही हसतोय, आनंदी आहोत. आमच्यासाठी हा एक ब्रेक होता.''
'प्लॅनेट मराठी' ओटीटीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' आयुष्य किती आनंदाने भरलेले आहे याचे महत्त्व अधोरेखित करणारे हे गाणे आहे. यात औरंगाबादमधील अनेक प्रसिद्ध ठिकाणांची सैर घडवण्यात आली आहे. या वेबफिल्ममधील सगळीच गाणी श्रवणीय आहेत. आम्हाला अत्यंत आनंद होतोय, की इतका दर्जेदार आशय आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. 'जून'मधील नील आणि नेहा यांच्या मैत्रीपलीकडील संवेदनशील नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांनाही नक्की आवडेल.''