'फिल्म शाला' द्वारे विद्यार्थी करणार 'पिप्सी' चित्रपटाचे समीक्षण

शुक्रवार, 27 जुलै 2018 (11:18 IST)
आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीदेखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात आहे. मराठी प्रेक्षकांनादेखील ते आवडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप पाडणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आगामी ‘पिप्सी’ सिनेमाचादेखील आवर्जून उल्लेख करता येईल.
 
विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या या सिनेमानिमित्त एक वेगळीच संकल्पना महाराष्ट्रात लवकरच राबविली जाणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या निर्मात्यांद्वारे ‘फिल्म शाला' हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असून. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेमधून राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेअंतर्गत 'पिप्सी' सिनेमाबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत आणि समीक्षण  विचारात घेतले जाणार आहे. त्यासाठी, शाळेतील प्राथमिक विभागासाठी 'टायनी ट्वीट' या उपक्रमाद्वारे अनुक्रमे २०० अक्षरांमध्ये व माध्यमिक विभागासाठी  'राईट व्ह्यू' या उपक्रमाद्वारे अनुक्रमे ५०० शब्दांमध्ये 'पिप्सी' सिनेमा कसा वाटला या विषयावर स्पर्धा घेतली जाईल या स्पर्धेसाठी, अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य आणि लेखक कमलाकर नाडकर्णी परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्यामार्फत निवडण्यात आलेल्या  विजेत्यांना डिजिटल व्हिडियो कॅमेरेद्वारे आकर्षक बक्षिसे दिली जातील. त्यासाठी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळेजवळच्या सर्व सिनेमागृहात हा सिनेमा खास विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात येणार आहे.
 
या स्पर्धेविषयी आणि सिनेमाविषयी बोलताना, पिप्सी सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या आणि निर्मात्या विधि कासलीवाल सांगतात कि, "गतवर्षी झालेल्या मामी चित्रपट महोत्सवाच्या स्क्रीनिंगदरम्यान आणि ट्रेलर लाँच कार्यक्रमात, 'पिप्सी' सिनेमाच्या निमित्ताने अनेक लहान मुलांशी आम्ही जोडलो गेलो आहोत. या सिनेमाबद्दलचे त्याचे कुतूहल आणि त्यांच्या विचारशैलीचा तेव्हा अंदाज घेता आला. त्यामुळे तिथूनच या स्पर्धेची संकल्पना पुढे आली. लहान मुलांचे भविष्य शाळेतूनच घडत असते. पुढची वाटचाल सफल होण्यासाठी, शाळा ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याकारणामुळे भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे". भारतात बरीच वर्ष शाळकरी युनिफॉर्म फॅब्रिक ब्रॅण्डमध्ये आघाडीवर असलेल्या 'एस.कुमार्स' यांनी आणि भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन मनोरंजन तिकीट प्लॅटफॉर्म असलेल्या बुक माय शो यांच्या बुक अ स्माईलने या उपक्रमासाठी पुढाकार घेत, विशेष भागीदारी केली आहे. त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थाचादेखील यात सहभाग आहे.
 
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा २७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लहानग्यांच्या समाजातील वास्तव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष या सिनेमाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे लहान मुलांच्याच नजरेतून 'पिप्सी' सिनेमाचे समीक्षण लोकांसमोर मांडण्यात येणार असल्यामुळे, या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम शाळेतून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका आल्या असून, त्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा देखील सहभाग आहे. शिवाय, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शाळांच्या नोंदणीमध्ये दिवसागणिक वाढदेखील होत आहे. दोन चिमुकल्यांची आणि त्यांच्या 'पिप्सी' नामक माश्याची कथा सांगणारा हा सिनेमा लहान मुलांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना नक्की आवडेल, अशी खात्री आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती